मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया ( BJP Leader Kirit Somaiya ) यांच्यावर शनिवारी शिवसैनिकांनी हल्ला ( Kirit Somaiya Attack Case ) केला होता. या प्रकरणाची केंद्रीय स्तरावर गंभीर दखल घेतली जात आहे. यासाठी किरीट सोमैया हे दिल्ली दरबारी गेले होते. ते मुंबईत परत आले. यावेळी माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर व माझ्या सुरक्षा रक्षकांवर झालेल्या हल्ल्याची केंद्रीय स्तरावर गंभीर दखल घेतली जात असून सीआयएसएफच्या मुख्यालयाकडून यासंदर्भातील सर्व रेकॉर्ड मागवण्यात आले आहेत.
'माझी हत्या करण्याचा कट' -यावेळी बोलताना सोमैया म्हणाले की, "हा हल्ला म्हणजे माझी हत्या करण्याचा कट होता. हा कट पोलीस आणि सरकारने मिळून केला. एक दोन वेळा नाहीतर तीन वेळा माझ्या हत्येचे प्रयत्न झालेत आणि आता तर माझ्यासह माझ्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या कमांडोना देखील लक्ष केले जातेय. आणि हे हल्ला करणारे इतर कोणी नसुन शिवसेनेचे गुंड होते."
CISF ने घेतली गंभीर दखल - "यासंदर्भात आम्ही केंद्रीय गृह विभागाशी सातत्याने संपर्कात आहोत. आम्ही दिल्लीला जाऊन त्या संदर्भात तक्रार देखील केली आहे. याची आता सीआयएसएफच्या मुख्यालयाकडून गंभीर दखल घेतली गेली असून त्यांनी यासंदर्भात सर्व रेकॉर्ड मागवले आहेत. एका झेड प्लस सिक्युरिटी असलेल्या व्यक्तीवर हल्ला होतोच कसा ? असा त्यांचा प्रश्न आहे. त्यासाठीच आज मी खार पोलीस स्थानकात जाणार आहे." असं किरीट सोमैया यांनी म्हटले आहे.