मुंबई - सहा जानेवारी हा राज्यभर पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 साली 'दर्पण' नावाचे नियतकालीक पहिल्यांदा सुरू केले. त्या स्मरणार्थ हा दिवस "पत्रकार दिन" म्हणून साजरा केला जातो.
'दर्पण'कार जांभेकर -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभूर्ले या गावी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 या साली झाला. 1825 साली बाळशास्त्री जांभेकर हे मुंबईत आले आणि त्यांनी इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश घेतला. वयाच्या केवळ 13 व्या वर्षी त्यांनी रामदास स्वामी, मोरोपंत संत तुकाराम त्यांच्या मराठी साहित्याच्या कृतीचा त्यांनी अभ्यास केला. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी'चे उपसचिव झाले. त्यानंतर 6 जानेवारी 1832 साली त्यांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र 'दर्पण' हे सुरू केले. आठ पानी असलेल्या या वृत्तपत्राची किंमत त्यावेळी सहा रुपये एवढी होती. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये दर्पण हे वृत्तपत्र प्रकाशित होत होते. दर्पण हे वृत्तपत्र काढल्यामुळेच बाळशास्त्री जांभेकर यांना 'दर्पणकार' असेही म्हणण्यात येते.
वाचनाची आवड -
1840 साली काही कारणांमुळे दर्पण वृत्तपत्र बंद पडले. मात्र त्यानंतर लगेचच बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दिग्दर्शन' हे मासिक सुरू केले. या मासिकाच्या माध्यमातून भौतिकशास्त्राचा अभ्यास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस बाळशास्त्री जांभेकर यांचा होता. ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून त्यांना 1840 साली "जस्टिस ऑफ पीस" ही पदवी बहाल करण्यात आली होती. मात्र वयाच्या केवळ 36 व्या वर्षी म्हणजे 1846 साली बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू झाला. आपल्या छोट्याशा आयुष्यात त्यांनी शून्यलब्धी, बाल व्याकरण, सार संग्रह, हिंदुस्थानचा इतिहास, इंग्लंड देशाची बखर, हिंदुस्तानचा प्राचीन इतिहास, भूगोल विद्या व ज्योतिषशास्त्र यांचा अभ्यास केला.