मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांकरिता येत्या 10 जूनला मतदान होणार आहे. शिवसेनेकडून दोन, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी एक तर भाजपाने तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सहाव्या जागेसाठी दोन उमेदवार उतरल्याने निवडणूक अटीतटीची बनली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तर भाजप ( BJP ) सहाव्या जागेसाठी ठाम असल्याने निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीच्या ( Rajya Sabha Election 2022 ) सहाव्या जागेसाठी भाजपा आग्रही असल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. अपक्ष-घटक पक्ष आमदारांवर या निवडणुकीची मदार आहे. त्यामुळे या सर्वांची येत्या सोमवारी ( 6 जून ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी बैठक बोलावली आहे. बैठकीनंतर शिवसेनेच्या ( Rajya sabha Shivsena ) दुसऱ्या आणि राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी निर्णय ठरणार आहे.
या निवडणुकीत मताधिक्य काढण्यासाठी भाजपाला 11 मते कमी पडणार असून सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिलेल्या अपक्ष आणि इतर पक्षांच्या आमदारांना गळाला लावावे लागणार आहे. तर महाविकास आघाडीसमोर मताधिक्य टिकवण्याचे आव्हान आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.