मुंबई -महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते.
चैत्यभूमीवर स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी -
महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वागत केले. तसेच समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांच्या कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात येणार आहे.
असाल तिथून अभिवादन करा -
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखविण्याची ही वेळ आहे. बाबासाहेब आयुष्यभर अन्यायाविरोधात संघर्ष करत राहिले. त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. कोविडचे संकट जाता जात नाही. ते संपले असे मानू नये. चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब याना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ दिला जाणार नाही. यापुर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहे. डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा, असेही मुख्यमंत्र्यानी आवाहन केले.
आजोबा आणि बाबासाहेब यांचे ऋणानुबंध -