मुंबई - मुंबईतील गोवंडी आणि शिवाजीनगर परिसरातील ५ बोगस डाॅक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. शिवाजीनगर आणि गोवंडी परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना आणि कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय प्रशिक्षण नसताना रुग्णांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बोगस डाॅक्टरवर कारवाईचा बडगा उटलला आहे.
वैद्यकीय परवाना नसतानाही 5 बोगस डाॅक्टरांचा जिवघेणा खेळ
मुंबईतील शिवाजीनगर आणि गोवंडी भागातून या 5 बोगस डाॅक्टरांना अटक करण्यात आली आहे. सतत गजबजलेल्या अशा शिवाजीनगर तसेच गोवंडी भागात हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यातच करोनामुळे कंबरडे मोडल्याने आर्थिक चणचण असलेल्या लोकांच्या मजबूरीचा फायदा घेवून हे 5 मुन्ना भाई MBBS कोरोना बाधित रुग्णांवर देखील उपाचर करत होते की काय असा संशय मुंबई पोलिसांना आहे. कारण कोरोना रुग्णांवर उपचार करण्याकरता वापरली जाणारे औषधे अँन्टीबायोटिक टॅबलेट्स, सर्जिकल टे, पॅरसिटॉमॉल डेक्झा टॅबलेट्स, टोरमॉक्झान 500 एम.जी, सिरिन्स सलायन बॉटल्स्, अन्टॉसिड्स टॅबलेट, बायेमेडीकल वेस्ट मटेरियल, रॅन्टीडाईनहायड़ोक्लोराइड इंजेक्शन ही औषधे पोलिसांनी या बोगस डाॅक्टरांकडून जप्त केली आहेत. यातील एक तरी औषध कमी जास्त दिले गेले तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. याकरता वैद्यकीय शिक्षण गरजेचे असते. पण या 5 बोगस डाॅक्टरांकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसतानाही या 5 बोगस डाॅक्टरांचा हा जिवघेणा खेळ गेली काही वर्षे सुरुच होता.