सोनीपत (हरियाणा) -गन्नौर येथील बाय रोड परिसरातील जीवानंद शाळेचे छत आज (मंगळवार) दुपारी कोसळले. यात सुमारे २५ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. तसेच छतावर काम करत असलेले ३ मजूरही गंभीर जखमी झाले आहेत. छताचे बांधकाम सुरु असताना ही दुर्घटना घडली. काही मुलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले.
5 विद्यार्थ्यांची स्थिती नाजूक -
गंभीर जखमी विद्यार्थ्यांवर गन्नौर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत. त्यातील ५ विद्यार्थ्यांची स्थिती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यावर खानपूर पीजीआय येथे उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गन्नौर पोलीस स्टेशनची तुकडी लगेच घटनास्थळी दाखल झाली. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत आहे. शाळेच्या व्यवस्थापनाची निष्काळजी यात पुढे आली आहे. छताचे काम सुरु असताना मुलांना त्याच्या खाली का बसविण्यात आले असा प्रश्न विचारला जात आहे.