महाराष्ट्र

maharashtra

कोरोना संकट: तेलंगाणामध्ये दहावीच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलल्या

By

Published : Jun 7, 2020, 5:24 PM IST

तेलंगाणा उच्च न्यायालयाने दहावीच्या परीक्षा आयोजित करण्याबद्दल सूचना केल्यानंतर सोमवारपासून सुरु होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शिक्षणमंत्री पी.सबिता इंद्रा रेड्डी यांनी परीक्षांबाबत मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव सोमवारच्या बैठकीत निर्णय घेतील, असे सांगितले.

telangana again postpone class x exams
तेंलगाणामध्ये दहावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

हैदराबाद- तेलंगाणा राज्यातील दहावीच्या परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबत तेलंगाणाच्या शिक्षणमंत्री पी.सबिता इंद्रा रेड्डी यांनी घोषणा केली आहे. सोमवारपासून दहावीच्या परीक्षा सुरु होणार होत्या. मात्र, तेंलगाणा उच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याबाबत सरकारला दिलेल्या निर्देशांनतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

तेलंगाणा उच्च न्यायालयाने हैदराबाद महानगरपालिका क्षेत्र वगळून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या काळजी घेत परीक्षा घेण्यास संमती दिली होती. हैदराबादमधील विद्यार्थ्यांसाठी नंतर पुरवणी परीक्षा घेऊन त्यास मुख्य परीक्षेचा दर्जा देण्यास संमती दिली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अभ्यास केल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

परीक्षा आयोजनासंदर्भात सोमवारी घेणाऱ्या बैठकीत मुंख्यमंत्री के.चंद्रशेखर राव पुढील निर्णय घेतील, असे शिक्षणमंत्री म्हणाल्या आहेत. परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेताना उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षातील कामगिरीचा विचार करुन ग्रेड देण्याचाही विचार करता येईल, असे सुचवले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती परीक्षा घेण्याऐवजी या पर्यायाचा देखील विचार करता येईल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, तेलंगाणा सरकारने हैदराबादसहीत सर्व ठिकाणी परीक्षा घेण्याची तयारी असल्याचे न्यायालयात सांगितले होते. मात्र, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले. परीक्षा देताना एखाद्या विद्यार्थ्याला कोरोना संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल न्यायालयाने विचारला. एखादे परीक्षा केंद्र कंटेनमेंट झोनमध्ये असल्यास परीक्षा कशी घेणार, असेही सरकारला विचारण्यात आले.

सरकारने यावर वारंवार परीक्षांचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला येणाऱ्या अडचणी न्यायालयाला कळवल्या. मात्र, विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा तांत्रिक अडचणी महत्वाच्या नाहीत, असे न्यायालयाने सुनावले. 8 जून ते 5 जुलै या कालावधीमध्ये दहावीच्या परीक्षा घेण्याचे 22 मेला जाहीर करण्यात आले होते. सरकारने सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details