यूआयडीएआय आणि गुगल यांच्यात भागीदारी: अधिकृत आधार केंद्रे गुगल मॅप्सवर दिसणार
यूआयडीएआय आणि गुगल यांच्या भागीदारीनं अधिकृत आधार केंद्रे गुगल मॅप्सवर दाखवली जाणार आहेत. त्यामुळं आधार सेवा आता पारदर्शक होणार आहे.

Published : February 26, 2026 at 3:33 PM IST
|Updated : February 26, 2026 at 3:58 PM IST
नवी दिल्ली : भारतातील लाखो नागरिकांसाठी आधार सेवा अधिक सोपी आणि पारदर्शक होणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) आणि गुगल यांनी भागीदारी केली आहे. यामुळx अधिकृत आधार केंद्रे गुगल मॅप्सवर दाखवली जाणार आहेत. ही सुविधा लवकरच उपलब्ध होईल, ज्यामुळं लोकांना जवळचं आधार केंद्र शोधणं सोपं होईल.
सेवा प्रकार आणि सुविधा
या उपक्रमांतर्गत आधार केंद्रे सेवा प्रकारानुसार ओळखता येतील. उदा. प्रौढ नोंदणी, बाल नोंदणी किंवा फक्त पत्ता आणि मोबाइल अपडेट. तसंच, केंद्राची प्रवेशयोग्यता माहितीही दिसेल, जसं दिव्यांग-अनुकूल रचना, पार्किंग सुविधा, कार्यालयीन वेळा इ. ही सर्व माहिती गुगल मॅप्सवर उपलब्ध होईल. देशभरात 60,000 हून अधिक आधार केंद्रे आहेत, ज्यात अत्याधुनिक आधार सेवा केंद्रे (एएसके) समाविष्ट आहेत. ही भागीदारी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखेल आणि नागरिकांना विश्वासार्ह केंद्रांकडं निर्देशित करेल.
भविष्यातील योजना
पुढील टप्प्यात यूआयडीएआय गुगल बिझनेस प्रोफाइलचा वापर करून केंद्रांची माहिती व्यवस्थापित करेल आणि लोकांच्या अभिप्रायांना थेट प्रतिसाद देईल. यामुळं सेवा अधिक पारदर्शक आणि प्रतिसाददायी होईल. तसंच, गुगल मॅप्सद्वारे थेट अपॉइंटमेंट बुकिंगची सुविधा येण्याची शक्यता आहे, ज्यामुळं भेटींचं नियोजन अधिक कार्यक्षम होईल.
जलद आणि पारदर्शक सेवा
यूआयडीएआयचे सीईओ श्री. भुवनेश कुमार म्हणाले, “यूआयडीएआय नेहमी आधार धारकांच्या सुलभतेसाठी कटिबद्ध आहे. ही भागीदारी अधिकृत आधार केंद्रं शोधणं सोपं, जलद आणि पारदर्शक करेल.” गुगल इंडियाच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्सच्या कंट्री हेड श्रीमती रोली अग्रवाल म्हणाल्या, “यूआयडीएआयसोबत भागीदारीतून लाखो नागरिकांना विश्वासार्ह सेवा सहज उपलब्ध होईल आणि सरकारी सुविधा आणि लोकांमधील दरी कमी होईल.”
हे वाचलंत का :

