नासाच्या 'आर्टेमिस करारांवर' स्वाक्षरी करणारा तुर्की हा 71 वा देश बनला; चंद्र आणि मंगळ मोहिमांमध्ये सहभागी
वॉशिंग्टन येथील नासाच्या मुख्यालयात सोमवारी आयोजित एका समारंभात तुर्की प्रजासत्ताकानं 'आर्टेमिस करारांवर' स्वाक्षरी केली.

Published : September 1, 2026 at 10:40 AM IST
वॉशिंग्टन: सोमवारी नासाच्या मुख्यालयात झालेल्या समारंभात तुर्की प्रजासत्ताकानं आर्टेमिस करारांवर स्वाक्षरी (NASA Artemis Accords ) केली. नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाद्वारे, शांततापूर्ण आणि पारदर्शक अंतराळ संशोधनासाठी समर्पित असलेल्या आंतरराष्ट्रीय गटात नवीन सदस्य देशाचं स्वागत करण्यात आलं.
Welcome to the Artemis Accords, Republic of Türkiye 🇹🇷
— NASA (@NASA) August 31, 2026
By signing the Artemis Accords, Türkiye has joined 70 other nations that have committed to the peaceful and prosperous exploration of space: https://t.co/sXqJuYoMQQ pic.twitter.com/P3KBjWIjGE
तुर्कीची भूमिका बळकट : नासाचे प्रशासक जेरेड आयझॅकमन म्हणाले, "आर्टेमिस करारांवर स्वाक्षरी करणारा 71 वा देश म्हणून तुर्की प्रजासत्ताकाचं स्वागत करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. गेल्या वर्षी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नासाला चंद्रावर परत जाण्याचे, तिथं मानवाची पहिली कायमस्वरूपी उपस्थिती निर्माण करण्याचे आणि मंगळावरील (Mars missions) मानवी संशोधनाचा पाया रचण्याचे निर्देश दिले होते. अशा मोठ्या उपक्रमांमध्ये नासा कधीही एकटं काम करत नाही. आम्ही चंद्रावरील तळावर आर्टेमिस करारांमधील तत्त्वांची अंमलबजावणी करत आहोत. नासाच्या या प्रयत्नात सहभागी होण्यासाठी करारावर स्वाक्षरी करणाऱ्या प्रत्येक देशाला आमंत्रित केलं जात आहे." तुर्कीचे उद्योग आणि तंत्रज्ञान मंत्री मेहमत फातिह कासिर यांनी देशाच्या वतीनं स्वाक्षरी केली. या कार्यक्रमाला तुर्की अंतराळ संस्थेचे अध्यक्ष युसूफ किराच आणि अमेरिकेचे उप-सहाय्यक परराष्ट्र मंत्री कॉनर टॉमलिन्सन हे देखील उपस्थित होते.
ॲक्सिओम मिशन : 2024 मध्ये, तुर्कीचे पहिले अंतराळवीर अल्पर गेझराव्जी यांनी 'ॲक्सिओम मिशन-3' द्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा प्रवास केला आणि नासाच्या अंतराळवीरांसोबत संशोधन केलं. त्याच वर्षी, दुसरे अंतराळवीर तुवा अतासेव्हर यांनी 'व्हर्जिन गॅलेक्टिक'च्या सब-ऑर्बिटल मोहिमेत सहभाग घेतला. देशाची पहिली चंद्र मोहीम, 'IAP-1', लवकरच प्रक्षेपित होणार आहे. या ऑक्टोबरमध्ये अंताल्या येथे होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय अंतराळ काँग्रेस'मध्येही करारावर स्वाक्षरी करणारे अनेक देश सहभागी होणार आहेत. 2020 मध्ये, नासा आणि अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं सात संस्थापक देशांच्या भागीदारीसह आर्टेमिस करार सुरू केला. या करारांमध्ये शांततापूर्ण संशोधन, परस्पर सहकार्य, वैज्ञानिक माहितीची उपलब्धता, हस्तक्षेप टाळणे आणि ऐतिहासिक स्थळांचं जतन यांसारख्या तत्त्वांचा समावेश आहे.
हे वाचलंत का :

