सुझुकीनं भारतात सादर केलं पहिलं इलेक्ट्रिक स्कूटर ‘ई-ऍक्सेस’
सुझुकी मोटरसायकल इंडियानं भारतीय बाजारात पहिलं इलेक्ट्रिक स्कूटर ‘ई-ऍक्सेस’ लाँच केलंय. 1.88 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीचं हे स्कूटर गुरुग्राम प्लांटमध्ये उत्पादित होईल.

Published : January 9, 2026 at 2:43 PM IST
मुंबई : सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं भारतीय बाजारात आपली पहिली इलेक्ट्रिक दोनचाकी‘सुझुकी ई-ऍक्सेस’ लाँच केली आहे. तिची एक्स-शोरूम किंमत 1.88 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर कंपनीच्या गुरुग्राम (हरियाणा) प्लांटमध्ये उत्पादित होणार असून, यामुळं सुझुकीचा इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील प्रवेश अधिकृत झाला आहे. बाजारात बजराज चेतक, टीव्हीएस आयक्यूब, अॅथर रिझ्टा यांसारख्या प्रतिस्पर्ध्यांशी थेट स्पर्धा करणारे हे स्कूटर सुझुकीच्या जागतिक इलेक्ट्रिक धोरणातील महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
तांत्रिक वैशिष्ट्ये आणि परफॉर्मन्स
सुझुकी ई-ऍक्सेस अंडरबोन फ्रेमवर आधारित आहे. यात 3.07 किलोवॅट-तास क्षमतेची लिथियम आयर्न फॉस्फेट (एलएफपी) बॅटरी बसवण्यात आली आहे, जी एका चार्जवर 95 किलोमीटरची रेंज देते. ही बॅटरी 4.1 किलोवॅट क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरला ऊर्जा पुरवते, जी 15 न्यूटन-मीटर पीक टॉर्क निर्माण करते. चार्जिंगच्या बाबतीत, पोर्टेबल चार्जरनं 0 ते 80 टक्के चार्ज होण्यास 4 तास 30 मिनिटे लागतात. तर फास्ट चार्जर वापरल्यास पूर्ण चार्ज होण्यास फक्त 2 तास 12 मिनिटे लागतात. हे वैशिष्ट्ये तिला दैनंदिन वापरासाठी सोयीस्कर आणि किफायतशीर बनवतात.
फीचर्स आणि रायडिंग अनुभव
स्कूटरमध्ये पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. यात तीन रायडिंग मोड्स – इको, राइड ए आणि राइड बी – उपलब्ध आहेत. याशिवाय रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग, रिव्हर्स मोड, ब्लूटूथ/ऍप कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट यांसारखी आधुनिक सुविधा आहेत. रिजेनरेटिव्ह ब्रेकिंगमुळं ब्रेक लावताना बॅटरीत काही प्रमाणात ऊर्जा परत येते, ज्यामुळं रेंज आणखी वाढते.
डिझाइन आणि रंग पर्याय
डिझाइनच्या दृष्टीनं ई-ऍक्सेस आधुनिक आणि आकर्षक दिसते. पूर्ण एलईडी लायटिंग, टू-टोन अलॉय व्हील्स आणि प्रीमियम फिनिश यामुळे ते तरुण खरेदीदारांना आकर्षित करेल. नवीन लाँचसोबत ‘मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू विथ मेटॅलिक मॅट फिब्रोइन ग्रे’ हा नवीन ड्युअल-टोन रंग पर्याय जोडण्यात आला आहे.
आता एकूण चार रंग पर्यायात ती उपलब्ध आहे.
- मेटॅलिक मॅट ब्लॅक नं. 2 विथ मेटॅलिक मॅट बोर्डो रेड
- पर्ल ग्रेस व्हाइट विथ मेटॅलिक मॅट फिब्रोइन ग्रे
- पर्ल जेड ग्रीन विथ मेटॅलिक मॅट फिब्रोइन ग्रे
- मेटॅलिक मॅट स्टेलर ब्लू विथ मेटॅलिक मॅट फिब्रोइन ग्रे
लाँच प्रसंगी सुझुकी मोटरसायकल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक केनिची उमेदा म्हणाले, “सुझुकी ई-ऍक्सेस हे सुझुकीचे पहिलं जागतिक धोरणात्मक बॅटरी इलेक्ट्रिक वाहन आहे. यात दीर्घायुषी बॅटरी, सोपी सहज वेगवर्धन आणि उच्च दर्जाची फिट आणि फिनिश आहे. ग्राहक, आनंददायी आणि काळजीमुक्त राहावे यासाठी प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक डिझाइन केली आहे. ‘बाय योर साइड’ या आमच्या ब्रीदवाक्यानुसार आम्ही ग्राहकांच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रवासात नेहमी सोबत राहू.” भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात सुझुकी ई-ऍक्सेस एक विश्वासार्ह आणि प्रीमियम पर्याय म्हणून स्थान मिळवेल. सुझुकीच्या जागतिक दर्जाच्या गुणवत्तेसह आणि किफायतशीर किंमतीमुळं हे स्कूटर पर्यावरणस्नेही पर्याय शोधणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक ठरेल.
हे वाचलंत का :

