हीरो मोटोकॉर्पनं लॉंच केल्या फ्लेक्स-फ्युएल मोटारसायकल्स, जाणून घ्या किंमत
हीरो मोटोकॉर्पनं नितीन गडकरी आणि हरदीप सिंह पुरी यांच्या उपस्थितीत स्प्लेंडर प्लस फ्लेक्स फ्युएल आणि एचएफ डिलक्स फ्लेक्स फ्युएल मोटारसायकल्स लॉंच केल्या.

Published : June 4, 2026 at 10:40 AM IST
नवी दिल्ली: भारतातील सर्वात मोठ्या दोनचाकी वाहन उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्पनं आपल्या लोकप्रिय मॉडेल्सच्या फ्लेक्स-फ्युएल आवृत्त्या बाजारात आणल्या आहेत. कंपनीने स्प्लेंडर प्लस फ्लेक्स फ्युएल आणि एचएफ डिलक्स फ्लेक्स फ्युएल या दोन नवीन मोटारसायकल्स लॉंच केल्या. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांची उपस्थितीत होती.या फ्लेक्स-फ्युएल बाइक्स E20 ते E85 पर्यंतच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालू शकतात. सध्या भारतात E20 इंधन उपलब्ध आहे, तर E85 ही उच्च इथेनॉल ब्लेंडिंग असलेली इंधन पद्धत आहे. कंपनीनं जाहीर केलं की, या बाइक्स जुलै 2026 पासून महाराष्ट्र आणि दिल्लीत प्रथम विक्रीसाठी उपलब्ध होतील आणि नंतर हळूहळू इतर राज्यांत विस्तार केला जाईल.
किंमत आणि मानक मॉडेल्सशी तुलना : स्प्लेंडर फ्लेक्स फ्युएलची एक्स-शोरूम दिल्ली किंमत 82,810 तर एचएफ डिलक्स फ्लेक्स फ्युएलची किंमत 72,792 ठेवण्यात आली आहे. दोन्ही मॉडेल्स त्यांच्या मानक आवृत्तींपेक्षा सुमारे 4 टक्के महाग आहेत. ही अतिरिक्त किंमत मुख्यतः फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञान, सुधारित इंधन प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (ECU) मुळं आहे. मात्र, दीर्घकाळात इथेनॉल इंधनाचा वापर केल्यास इंधन खर्चात बचत होईल, असं कंपनीचे म्हणणं आहे.
स्प्लेंडर प्लस फ्लेक्स फ्युएलची वैशिष्ट्ये : स्प्लेंडर प्लस फ्लेक्स फ्युएलमध्ये 97.2 सीसी इंजिन बसवण्यात आलं आहे. E85 इंधनावर हे इंजिन 8,000rpm वर 8 एचपी पॉवर आणि 6,000rpm वर 8.3 Nm टॉर्क निर्माण करते. बाइकमध्ये हीरोची पेटंटेड i3S आयडल स्टॉप-स्टार्ट तंत्रज्ञान, नवीन डिजिटल-अॅनलॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ स्विच, ट्यूबलेस टायर आणि इथेनॉल अनुकूल सुधारित फ्युएल सिस्टम आहे.व्हिज्युअल अपील वाढवण्यासाठी कंपनीनं 'ब्लॅक विथ लाईम येलो' नवीन ग्राफिक्स स्कीम दिली आहे. ही बाइक जयपूर येथील कंपनीच्या अत्याधुनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर 'सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी'मध्ये विकसित करण्यात आली आहे.
एचएफ डिलक्स फ्लेक्स फ्युएल : एचएफ डिलक्स फ्लेक्स फ्युएलमध्येही समान 97.2 सीसी इंजिन आणि E85 वर 8 एचपी पॉवर व 8.3 Nm टॉर्क मिळतो. यात डिजिटल-अॅनलॉग क्लस्टर, साइड स्टँड कट-ऑफ, ट्यूबलेस टायर आणि अपग्रेडेड ECU सारखी वैशिष्ट्ये आहेत. देखाव्यासाठी 'ब्लॅक विथ लाईम येलो' ग्राफिक्स देण्यात आले आहेत.
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये एचएफ डिलक्स E85 चे प्रदर्शन करण्यात आलं होतं. दोन्ही मॉडेल्स पर्यावरणस्नेही आहेत आणि इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देतील, ज्यामुळं आयात तेलावरील अवलंबित्व कमी होईल. हीरो मोटोकॉर्पचे हे पाऊल भारत सरकारच्या E20 आणि त्यापुढील इथेनॉल ब्लेंडिंग धोरणाशी सुसंगत आहे. नितीन गडकरी आणि हरदीप सिंह पुरी यांनी या लॉंचला समर्थन देत स्वदेशी इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यावर भर दिलाय.कंपनी भविष्यात आणखी मॉडेल्स फ्लेक्स-फ्युएल तंत्रज्ञानासह आणण्याची तयारी करत आहे. ग्राहकांना स्वस्त इंधन पर्यायाची उपलब्धता होणार असल्याने या लॉंचला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
हे वाचलंत का :

