ETV Bharat / technology

विज्ञान संवाद विश्वासावर उभा : डॉ. सौम्या स्वामिनाथन

हैदराबादेत विज्ञान संप्रेषण (Science communication) परिषदेत डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं की, विज्ञान संप्रेषणाची केवळ आकडेवारी न देता लोकांचा विश्वास म्हत्वाचा आहे,

Dr. Soumya Swaminathan
डॉ. सौम्या स्वामिनाथन (Etv Bharat English desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : January 8, 2026 at 4:15 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : विज्ञान संप्रेषण केवळ आकडेवारी, ग्राफ आणि तथ्ये देऊन थांबता कामा नये; ते लोकांच्या भावना, विश्वास आणि कुतूहलाशी जोडलं जाणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माजी मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी केलं. पक्षपाती हेतूनं विज्ञान दडपलं जाऊ नये, असं सांगताना त्यांनी कोविड-19 महामारीदरम्यानच्या ‘इन्फोडेमिक’चा अनुभवही सांगितला.

गुरुवारी हैदराबादेतील बी. एम. बिरला विज्ञान केंद्राच्या भास्कर सभागृहात ‘लॅब ते समाज : विकसित भारत 2047 साठी विज्ञान संप्रेषणाची भूमिका’ या विषयावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. अकॅडमी फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन (ASTC) आणि ईनाडू ग्रुप, ईटीव्ही, ईटीव्ही भारत यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद झाली. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया (NASI) – तेलंगणा यांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम पार पडला.

विज्ञान संप्रेषण आणि विश्वासाची गरज (Science communication)
डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी प्रमुख पाहूणे म्हणून भाषण केलं. “रोगजंतूंना पासपोर्टची गरज नसते, हवामान बदलाला देखील राष्ट्रीय सीमा नसतात आणि मानवी कुतूहल-करुणा राजकीय सीमारेषा ओलांडतात,” असं सांगताना त्यांनी विज्ञानचा (Science Diplomacy) आणि संप्रेषण यांचा संबंध स्पष्ट केला.

कोविड-19 च्या काळात लसींबाबत पसरलेल्या अफवा, प्रजननक्षमतेवर होणाऱ्या परिणामच्या खोट्या बातम्या यामुळं लोकांचा विज्ञानावरचा विश्वास डळमळला. “आम्ही गृहीत धरलं होते की फक्त तथ्ये, आकडे आणि ग्राफ दाखवले की लोक तर्कशुद्ध निर्णय घेतील. पण माणूस स्प्रेडशीटमध्ये राहत नाही; तो विश्वासावर निर्णय घेतो,” असं त्या म्हणाल्या.

“माहिती आणि संप्रेषण यात फरक आहे. प्रसारणापासून ऐकण्याकडे वळायला हवे. लोक प्रश्न विचारतात म्हणजे ते विज्ञानविरोधी आहेत असं नाही; ते खरे प्रश्न विचारत आहेत,” असं सांगताना त्यांनी शिक्षक, युवक आणि स्टोरी माध्यमांचा उपयोग सुचवला. मानसिक आरोग्यावर डॉ. मोहन आगाशे यांनी बनवलेले चित्रपट आणि स्थानिक भाषेत स्थानिक संदर्भ जोडण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. आहार आणि वायू प्रदूषण हे आरोग्याचे दोन मोठे जोखीम घटक असल्याचं सांगताना त्यांनी कंपन्यांशी चाललेल्या लढ्याकडंही लक्ष वेधलं.

उद्घाटन आणि प्रकाशन
माजी उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. प्रयोगशाळेतील संशोधनाचं फलित समाजापर्यंत पोहोचले पाहिजे,असं ते म्हणाले. त्यांनी ASTC-कम्युनिकेशन्स हे नवे प्रकाशनही प्रसिद्ध केलं. NASI-तेलंगणा चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. च. मोहन राव यांनी अध्यक्षीय भाषण केलं तर ASTC चे मानद अध्यक्ष डॉ. आर. बी. एन. प्रसाद यांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट केला.

सन्मान सोहळा
परिषदेत अनेक दिग्गज वैज्ञानिक आणि विज्ञान संप्रेषकांचा सन्मान करण्यात आला. यात एलव्ही प्रसाद आय इन्स्टिट्यूटचे माजी संचालक डॉ. डी. बालसुब्रमण्यम, बिरला विज्ञान केंद्राचे माजी संचालक डॉ. बी. जी. सिधार्थ आणि ज्येष्ठ विज्ञान पत्रकार पल्लव बागला यांचा समावेश होता. ‘विज्ञान श्री’ पुरस्कार प्राप्त डॉ. के. थंगराज (CDFD माजी संचालक) आणि डॉ. एस. वेंकट मोहन (CSIR-NEERI संचालक) यांचाही यात सन्मान झाला. या परिषदेला माजी कुलगुरू, माजी DRDO प्रमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, उद्योग नेते आणि माध्यम क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती.

हे वाचलंत का :

वैज्ञानिक शिक्षण चार भिंतींपुरतं मर्यादित नसावं - माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू