प्रजासत्ताक दिन 2026 : ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला अशोक चक्रानं सन्मानित
प्रजासत्ताक दिन 2026 निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना अशोक चक्र प्रदान केलं.

Published : January 26, 2026 at 3:45 PM IST
नवी दिल्ली : 77 प्रजासत्ताक दिनानिमित्त भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना शांतिकालीन सर्वोच्च वीरता पुरस्कार अशोक चक्र प्रदान केला. अंतराळात यशस्वी मोहीम पूर्ण करून परतलेले शुक्ला हे भारताचे पहिले अंतराळयात्री ठरले आहेत, ज्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. लखनऊ ते अंतराळवीर अशी त्यांची प्रेरणादायी यात्रा देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. ही कामगिरी केवळ वैयक्तिक यश नाही तर भारताच्या अंतराळ महत्वाकांक्षेचं प्रतीक बनली आहे.
On the occasion of Republic Day 2026, President Droupadi Murmu confers India’s highest peacetime gallantry award, the Ashok Chakra, upon Group Captain Shubhanshu Shukla, who made history as the first Indian to set foot on the International Space Station. Group Captain Shukla has… pic.twitter.com/2jRraeYFja
— President of India (@rashtrapatibhvn) January 26, 2026
अतंराळातील धैर्य आणि अशोक चक्राचा मान
अशोक चक्र हा भारताचा शांतिकालीन सर्वोच्च वीरता पुरस्कार आहे. युद्धजन्य परिस्थितीबाहेर असाधारण साहस, धैर्य किंवा सर्वोच्च बलिदान दाखवणाऱ्या सैनिकांना आणि नागरिकांना तो दिला जातो. गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू यांनी शुक्ला यांच्या नावे अशोक चक्राची घोषणा केली आणि 26 जानेवारी 2026 रोजी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
शुक्ला यांची ही कामगिरी विशेष आहे, कारण त्यांनी अंतराळात 14 दिवसांचं वास्तव्य केलं होतं. त्यांनी एक्सिओम-4 (Axiom-4) मोहिमेचा भाग म्हणून अंतर्राष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) यशस्वी प्रयोग केले. ही मोहीम भारताच्या गगनयान कार्यक्रमाला आणि खाजगी अंतराळ कंपन्यांशी सहकार्याला बळ देणारी ठरली. अंतराळातील कठीण वातावरणात शारीरिक-मानसिक आव्हाने पेलताना त्यांनी दाखवलेले धैर्य यामुळं त्यांना हा पुरस्कार मिळाला. शुक्ला हे भारताचे शांतिकालीन सर्वोच्च वीरता पुरस्कार मिळवणारे पहिलेच अंतराळवीर ठरले आहेत.
एक्सिओम-4
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी नुकतीच एक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत अंतर्राष्ट्रीय अंतराळ स्थानकावर 14 दिवस घालवले. मोहिमेसाठी त्यांना दोन महिने कठोर क्वारंटाइनमध्ये राहावं लागलं होतं. मोहिमेनंतर अमेरिकेत परतल्यानंतर पत्नी डॉ. कामना शुक्ला यांची त्यांच्याशी भावनिक भेट झाली. हा हृदयस्पर्शी क्षण शुक्ला यांनी स्वतःच्या इंस्टाग्राम खात्यावर शेअर केला होता, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
प्रेरणादायी प्रेमकहाणी आणि वैयक्तिक जीवन
शुभांशु शुक्ला यांची पत्नी डॉ. कामना शुक्ला या दंतचिकित्सक आहेत. दोघांचे बालपणीचे मैत्रीचे नाते लखनऊच्या सिटी मॉंटेसरी स्कूलमध्ये शिकताना प्रेमात बदललं. शालेय जीवनातच त्यांच्यातील जवळीक वाढली आणि 2009 मध्ये त्यांनी विवाह केला. शुक्ला यांना दीर्घ प्रशिक्षण आणि मोहिमेमुळं वर्षभर परिवारापासून दूर राहावं लागलं होतं. शुभांशु शुक्ला यांच्या या कामगिरीनं भारतातील लाखो तरुणांना स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा मिळाली आहे. अशोक चक्र हा पुरस्कार त्यांच्या धैर्याचा सन्मान आहे आणि देशाच्या अंतराळ महत्वाकांक्षेचं प्रतीक आहे.
हे वाचलंत का :

