'संचार साथी'ची विक्रमी कामगिरी: जुलैमध्ये 77,692 हरवलेले मोबाईल फोन मिळवले परत!
जुलै महिन्यात 'संचार साथी'च्या माध्यमातून 77,692 हरवलेले मोबाईल फोन परत मिळवण्यात यश आलंय. एकाच महिन्यात 75,000 चा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Published : August 29, 2026 at 4:29 PM IST
नवी दिल्ली : दूरसंचार विभागाचा (DoT) नागरिकाभिमुख आणि महत्त्वाचा उपक्रम असलेल्या 'संचार साथी'नं जुलै महिन्यात हरवलेले किंवा चोरीला गेलेले 77,692 मोबाईल हँडसेट परत मिळवले. एकाच महिन्यात 75,000 चा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. दूरसंचार मंत्रालयानं शुक्रवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, ही कामगिरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रशंसा: केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी या यशाचं कौतुक केलं. त्यांनी नमूद केलं की, हा टप्पा या प्लॅटफॉर्मवरील लोकांचा वाढता विश्वास आणि दूरसंचार विभाग (DoT), दूरसंचार सेवा प्रदाते (TSPs), विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील पोलीस विभाग यांच्यातील भक्कम समन्वय दर्शवतो. मंत्रालयानं सांगितलं की, यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी आणि मोबाईल परत मिळवण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी दूरसंचार विभाग सातत्यानं संबंधित घटकांकडून (स्टेकहोल्डर्स) अभिप्राय घेत असतो.
एप्रिलपासून 201% वाढ: मोबाईलचा शोध घेण्यासाठी आणि ते त्यांच्या मालकांना परत करण्यासाठी दूरसंचार विभागाच्या 'डिजिटल इंटेलिजन्स युनिट'नं आणि त्यांच्या क्षेत्रीय युनिट्सनी स्थानिक पोलिसांशी जवळून समन्वय साधून काम केलं. परिणामी, एप्रिल ते जुलै या काळात दरमहा परत मिळवल्या जाणाऱ्या हँडसेटच्या संख्येत 201% वाढ नोंदवण्यात आली. प्रभावी समन्वय आणि तंत्रज्ञानाचा वापर यामुळे ही वाढ शक्य झाली.
नागरिकांसाठी थेट माहिती आणि पोलिसांची मदत: या उपक्रमात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. 'ट्रेसिबिलिटी रिपोर्ट'चा (शोध अहवाल) भाग म्हणून नागरिकांना एसएमएस, ईमेल, पोर्टल आणि ॲपद्वारे संबंधित पोलीस ठाण्याबाबतची माहिती दिली जाते. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलमध्ये सिम कार्ड टाकल्यास पोलीस अधिकाऱ्यांना त्याबाबतची माहिती पुरवली जाते. याव्यतिरिक्त, पर्यायी मोबाईल क्रमांकही उपलब्ध करून दिले जातात, ज्यामुळं मोबाईल परत मिळण्याची शक्यता वाढते. 'संचार साथी' आता नागरिकांसाठी एक विश्वासार्ह आणि प्रभावी साधन बनलं आहे. दूरसंचार विभागाचे हे प्रयत्न असेच सुरू राहिल्यास, भविष्यात आणखी मोठ्या संख्येनं मोबाईल फोन परत मिळण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :

