ETV Bharat / technology

प्लास्टिक वेव्ह 2025: 2040 पर्यंत प्लास्टिक प्रदूषण होणार दुप्पट; ब्रेकिंग द प्लास्टिक वेव्ह 2025 चा अहवाल प्रसिद्ध

प्लास्टिक प्रदूषण 2040 पर्यंत दुप्पट होणार असल्याचा अहवाल प्रसिद्ध (Plastic Wave 2025) झालाय. सुमारे 280 दशलक्ष टन कचरा पर्यावरणात सोडला जाणार आहे.

Plastic pollution,Plastic Wave 2025,Breaking Plastic Wave 2025 Report
प्लास्टिक प्रदूषण (Canva)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : December 6, 2025 at 12:50 PM IST

|

Updated : December 6, 2025 at 12:58 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : द प्यू चॅरिटेबल ट्रस्ट्स आणि सिस्टिमिक यांच्या नव्या “ब्रेकिंग द प्लास्टिक वेव्ह 2025” (Breaking Plastic Wave 2025 Report) अहवालानं जगाला धक्का दिला आहे. 2040 पर्यंत दरवर्षी 280 दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक कचरा पर्यावरणात सोडला जाईल, असं अहवालात म्हटलं आहे. हे प्रमाण दर सेकंदाला एक ट्रक भर प्लास्टिक टाकण्यासारखं आहे. प्लास्टिकमुळं होणारे हरितगृह वायू उत्सर्जन 58 टक्क्यांनी वाढेल, तर मानवी आरोग्यावर होणारा परिणामही 75 टक्क्यांनी वाढून जगाला दरवर्षी 9.8 दशलक्ष निरोगी आयुष्यवर्षे गमवावी लागतील. तरीही आशादायक बाब म्हणजे, आत्ताच कठोर आणि एकत्रित जागतिक कृती केल्यास प्लास्टिक प्रदूषण 83 टक्क्यांनी कमी करता येईल, असं अहवालात म्हटलं आहे.

Plastic pollution,Plastic Wave 2025,Breaking Plastic Wave 2025 Report
प्लास्टिक वेव्ह 2025 (Breaking Plastic Wave 2025 Report)

2020 मध्ये आलेल्या पहिल्या अहवालातून दरवर्षी 29 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा (Plastic pollution) समुद्रात जाण्याचा जाणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. पण गेल्या पाच वर्षांत अपेक्षित बदल झाले नाहीत. उलट 570 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा जमीन, हवा आणि पाण्यात गेला. सध्याही दरवर्षी 130 दशलक्ष टन प्लास्टिक पर्यावरणात मिसळत आहे.

Plastic pollution,Plastic Wave 2025,Breaking Plastic Wave 2025 Report
प्लास्टिक वेव्ह 2025 (Breaking Plastic Wave 2025 Report)

अहवालातील नऊ महत्त्वाचे निष्कर्ष

1. प्लास्टिक प्रदूषण दुप्पट होणार
2025 मध्ये 130 दशलक्ष टन असलेले वार्षिक प्लास्टिक प्रदूषण 2040 पर्यंत 280 दशलक्ष टन होईल.

2. उत्पादन वेगानं वाढणार, कचरा व्यवस्थापन मागं राहणार
2025 मध्ये 450 दशलक्ष टन असलेले प्राथमिक प्लास्टिक उत्पादन 2040 पर्यंत 680 दशलक्ष टन होईल (52 टक्के वाढ). तर कचरा व्यवस्थापन केवळ 26 टक्क्यांनी वाढेल. यामुळं बिनवेचलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा वाटा 19 टक्क्यांवरून 34 टक्क्यांवर जाईल. 2040 पर्यंत कचरा गोळा करणे, नष्ट करण्यासाठी दरवर्षी 140 अब्ज डॉलर (सुमारे 12 लाख कोटी रुपये) खर्च करावा लागेल.

3. प्लास्टिक आरोग्यास प्रत्येक टप्प्यात हानिकारक
उत्पादन, वापर आणि कचऱ्याच्या टप्प्यात प्लास्टिकमधील रसायने आरोग्याला हानिकारक ठरतात. 15 वर्षांत आरोग्यावर होणारा परिणाम 75 टक्क्यांनी वाढेल. केवळ रसायनांमुळं जगाला दरवर्षी 1.5 ट्रिलियन डॉलरचा (सुमारे 125 लाख कोटी रुपये) फटका बसेल.

4. हरितगृह वायू उत्सर्जन 58 टक्क्यांनी वाढणार
2040 पर्यंत प्लास्टिक उद्योगातून 4.2 गिगाटन CO₂ समतुल्य वायू निघेल.

5. कठोर कृती केल्यास 83 टक्के प्रदूषण कमी शक्य
उत्पादन कपात, पुन्हा वापरता येण्याजोगी यंत्रणा, चांगले कचरा व्यवस्थापन आणि रिसायकलिंग यामुळं 2040 पर्यंत प्लास्टिक प्रदूषण 83 टक्के, हरितगृह वायू 38 टक्के आणि आरोग्यावर होणारा परिणाम 54 टक्क्यांनी कमी होईल. त्यामुळं सरकारचे दरवर्षी 19 अब्ज डॉलर (सुमारे 1.6 लाख कोटी रुपये) वाचतील.

6. पॅकेजिंगमधील प्लास्टिक प्रदूषण जवळपास संपवता येईल
पॅकेजिंग हा प्लास्टिक कचऱ्याचा सर्वात मोठा स्रोत आहे. सध्याच्या गतीनं 66 दशलक्ष टन कचरा होतो; तो 1.7 दशलक्ष टनापेक्षा कमी करता येईल (97 टक्के कपात). पॅकेजिंगसाठीचे प्राथमिक प्लास्टिक उत्पादन 76 टक्क्यांनी कमी होईल.

7. मायक्रोप्लास्टिक समस्या कठीण
2025 मध्ये 17 दशलक्ष टन असलेले मायक्रोप्लास्टिक प्रदूषण 2040 पर्यंत 26 दशलक्ष टन होईल. या कचऱ्याचा मुख्य स्रोत टायर घर्षण, रंग आणि शेती आहे. श्रीमंत देशांत 2040 पर्यंत एकूण प्लास्टिक प्रदूषणापैकी 79 टक्के मायक्रोप्लास्टिकच असतील.

8. नव्या व्यवस्थेत रोजगार वाढतील
प्लास्टिक व्यवस्था बदलल्यास 86 लाख नवे रोजगार निर्माण होतील. मात्र जुन्या व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांना पर्यायी व्यवस्था करावी लागेल.

9. उशीर महागात पडेल
फक्त पाच वर्ष उशीर केल्यास 1100 दशलक्ष टन जादा प्लास्टिक उत्पादन, 540 दशलक्ष टन जादा प्रदूषण आणि 5.3 गिगाटन जादा हरितगृह वायू निघेल. यावर सरकाराला दरवर्षी अतिरिक्त 27 अब्ज डॉलर खर्च करावे लागतील.

Plastic pollution,Plastic Wave 2025,Breaking Plastic Wave 2025 Report
प्लास्टिक वेव्ह 2025 (Breaking Plastic Wave 2025 Report)

उपाययोजना आणि आव्हान
अहवालात सुचवलेले उपाय आधीपासून उपलब्ध आहेत. प्लास्टिक उत्पादन कमी करणे, पुन्हावापर आणि रिफिल सिस्टीम वाढवणे, सुरक्षित रसायने वापरणे, मायक्रोप्लास्टिक रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणणे. पण हे सर्व एकत्र आणि तातडीनं करावे लागतील. पाच वर्षांचाही उशीर 540 दशलक्ष टन जादा प्लास्टिक पर्यावरणात सोडेल. काही पर्यावरणसंस्थांनी अहवालावर टीका करताना म्हटलं आहे की, रिसायकलिंगच्या क्षमतेबाबत अहवाल अतिआशावादी आहे. तरीही सर्वमान्य बाब म्हणजे, प्लास्टिक प्रदूषण रोखण्याची संधी आणि तंत्रज्ञान दोन्ही उपलब्ध आहेत; फक्त राजकीय इच्छाशक्ती आणि जागतिक सहकार्याची गरज आहे.

Last Updated : December 6, 2025 at 12:58 PM IST