ETV Bharat / technology

सिंहस्थ कुंभमेळा 2027: 'कुंभदूत' एजेंटिक AI ॲप 20+ भाषांमध्ये भाविकांना मार्गदर्शन करणार

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी कुंभदूत एजेंटिक AI ॲप लॉंच झालंय. हे ॲप 20+ भाषांमध्ये वैयक्तिक सहाय्यक, व्हॉइस सेवा देईल.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : February 21, 2026 at 5:13 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : 'इंडिया AI इम्पॅक्ट समिट 20236 'मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'कुंभदूत' या एजेंटिक AI आधारित संकल्पनेचं सादरीकरण करण्यात आलंय. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात (Nashik Simhastha Kumbh Mela 2027) येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना सोयीस्कर, वैयक्तिक आणि बहुभाषिक सहाय्य मिळावं या उद्देशानं ही क्रांतिकारी संकल्पना विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली व्हॉइस-फर्स्ट, गोपनीयता जपणारी आणि डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर आधारित आहे, ज्यामुळं डिजिटल साक्षरता नसलेल्या वयोवृद्ध भाविकांनाही याचा फायदा होईल.

एजेंटिक कुंभ
'एजेंटिक कुंभ' या मॉडेलअंतर्गत प्रत्येक नोंदणीकृत भाविकाला स्वतःचा वैयक्तिक AI एजंट 'कुंभदूत' (Kumbhadoot agentic AI app) मिळेल. हा कुंभदूत भाविकाच्या वतीनं काम करेल. प्रवास मार्गदर्शन, निवास व्यवस्था, घाटांची माहिती, आपत्कालीन मदत, डिजिटल पेमेंट (यूपीआयद्वारे), भाषांतर आणि इतर सेवांमध्ये समन्वय साधेल. ही प्रणाली शासन विभाग, आरोग्य सेवा, वाहतूक आणि स्थानिक व्यापाऱ्यांशी जोडलेली असेल, परंतु सर्व कृती भाविकाच्या संमतीनं आणि गोपनीयतेसह होईल. कोणताही केंद्रीकृत डेटाबेस तयार केला जाणार नाही; माहिती मर्यादित कालावधीसाठीच वापरली जाईल.

बहुभाषिक आणि सर्वसमावेशक सेवा
'कुंभदूत' 20 पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये (Kumbhadoot AI app) कार्य करेल. स्मार्टफोन, फीचर फोन किंवा अगदी IVR (इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स) प्रणालीद्वारे कॉल करूनही सेवा उपलब्ध होईल. सोप्या आवाजाच्या माध्यमातून माहिती मिळेल, ज्यामुळं भाषेची अडचण, माहितीचा अभाव किंवा गर्दीतील गोंधळ कमी होईल. 'कुंभ पास' ही ऐच्छिक सुविधा डिजीलॉकरमध्ये सुरक्षित साठवली जाईल, ज्यामुळं प्रवेश, सेवा आणि आपत्कालीन मदत सुलभ होईल.

पायलट प्रकल्प आणि स्केलेबिलिटी
सिंहस्थपूर्वी नाशिकमधील महाविद्यालयांमध्ये 10 हजार सहभागींसह पायलट प्रकल्प राबवला जाईल. ही प्रणाली 1 कोटीपर्यंत भाविक आणि लाखो डिजिटल एजंट्स हाताळण्यास सक्षम असेल. कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितलं की, ही यंत्रणा नियंत्रणासाठी नव्हे, तर समन्वय आणि सेवा वितरणासाठी आहे. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनीही भाषेच्या अडचणी दूर होण्याबाबत भर दिला.

श्रद्धा आणि तंत्रज्ञानाचा संगम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, एजेंटिक कुंभ संकल्पनेमुळं महाराष्ट्र जबाबदार आणि नैतिक AI वापरात आघाडी घेईल. श्रद्धा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम साधून जगातील सर्वात मोठ्या शांततापूर्ण धार्मिक मेळाव्याचं नियोजन अधिक प्रभावी होईल. गोपनीयता जपत एकत्रित मागणी संकेतांवर आधारित अचूक नियोजन शक्य होईल.



कुंभदूत' एजेंटिक AI संकल्पनेची प्रमुख वैशिष्ट्ये

• प्रत्येक नोंदणीकृत भाविकासाठी वैयक्तिक एआय सहाय्यक
• 20 पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये आवाजावर आधारित सेवा
• स्मार्टफोन, फीचर फोन (कॉल) आणि किऑस्कद्वारे उपलब्धता
• ऐच्छिक ‘कुंभ पास’ – डिजीलॉकरमध्ये सुरक्षित साठवण
• यूपीआयद्वारे सोपी डिजिटल पेमेंट सुविधा
• प्रवास, निवास, घाट, आरोग्य व आपत्कालीन मदत मार्गदर्शन
• शासन विभाग, आरोग्य सेवा व व्यापाऱ्यांशी डिजिटल समन्वय
• गोपनीयता जपणारी, संमतीवर आधारित प्रणाली
• सिंहस्थपूर्व 10 हजार जणांसह पायलट प्रकल्प

हे वाचलंत का :

  1. महाराष्ट्राचा जागतिक कृषी एआय आराखडा : भारत एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये फडणवीसांचं सादरीकरण
  2. Google AI Cricket Coach : गुगलनं लॉंच केलं एआय क्रिकेट कोच, खेळाडूंना मिळणार स्मार्ट प्रशिक्षण
  3. एआय फॉर ॲग्री 2026 : मुंबईत जागतिक कृषी-एआय परिषद - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे