अंतराळ स्थानकावरून चार अंतराळवीरांचा अकाली परतावा : वैद्यकीय समस्येमुळं निर्णय
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून स्पेसएक्स क्रू 11चे चार अंतराळवीर वैद्यकीय समस्येमुळं लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. मात्र, नासानं आरोग्याचा तपशील गोपनीय ठेवला आहेत.

Published : January 9, 2026 at 11:06 AM IST
हैदराबाद : आरोग्याच्या समस्येमुळं नासानं क्रू 11 च्या सदस्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून लवकर परत येण्याचे आदेश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (ISS) नासाच्या स्पेसएक्स क्रू-11 मोहिमेतील चार अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. एका क्रू मेंबरला उद्भवलेल्या वैद्यकीय समस्येमुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. नासानं गोपनीयतेच्या कारणास्तव समस्येचा तपशील आणि प्रभावित अंतराळवीराचे नाव जाहीर केलेलं नाही. मात्र, संबंधित अंतराळवीराची प्रकृती स्थिर असल्याचं नासानं स्पष्ट केलं आहे.
वैद्यकीय समस्या आणि नासाची भूमिका
नासाचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जेम्स पोल्क यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, अंतराळ स्थानकावर वैद्यकीय सुविधा अत्यंत प्रगत आहे, तरीही काही तपासण्या पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवरील सुसज्ज रुग्णालयाची गरज असते. “या प्रकरणात पूर्ण तपासणी पृथ्वीवर करणे योग्य ठरेल,” असं त्यांनी नमूद केले. विशेष उपचारांची आवश्यकता नसली तरी अंतराळवीराला पृथ्वीवर आणून तपासणी करणे महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. नासाच्या नव्या प्रशासक जेरेड आयझॅकमन यांनी हा परतावा निर्णय घेतला. आयझॅकमन यांनी दोनदा स्पेसएक्सच्या खासगी मोहिमांतर्गत अंतराळ प्रवास केला आहे. त्यांनी सांगितलं की, क्रू-12 मोहिमेतील चार अंतराळवीर काही आठवड्यांत प्रक्षेपित होणार असून ती मोहीम लवकरात लवकर पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. क्रू-11 चे अंतराळवीर “काही दिवसांत” स्थानक सोडतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.
क्रू-11 ची रचना आणि परतावा
परतणाऱ्या क्रू-11 मध्ये अमेरिकन अंतराळवीर माईक फिंके आणि झेना कार्डमन, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे किमिया युई आणि रोस्कॉस्मॉसचे ओलेग प्लॅटोनोव यांचा समावेश आहे. ही मोहीम फेब्रुवारीमध्ये संपण्याची अपेक्षा होती. बुधवारी नासानं एका अंतराळ चाल (स्पेसवॉक) ला स्थगित केलं तेव्हा ही वैद्यकीय समस्या प्रथम समोर आली. “अशा परिस्थितींसाठी नासा आणि भागीदार संस्था अंतराळविरांच्या स्थितीवर लक्ष ठेवून असतात,” असं नासाच्या निवेदनात म्हटलं आहे.
अंतराळ स्थानकावरील उर्वरित कर्मचारी
परताव्यानंतर ISS वर फक्त एकच नासा अंतराळवीर क्रिस विल्यम्स राहतील. विल्यम्स नोव्हेंबर अखेरीस रशियाच्या सोयुझ यानातून पोहोचले होते. अमेरिका-रशिया करारांतर्गत हे क्रॉस-फ्लाइट व्यवस्था आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विल्यम्स एकटे राहूनही सर्व कामे हाताळण्यास सक्षम आहेत आणि लवकरच क्रू-12 चे तिथं पोहचतील. नासाच्या सहयोगी प्रशासक अमित क्षत्रिय यांनी नमूद केलं की, सोयुझ आणि अमेरिकी यानांवर मिश्र क्रू पाठवण्याचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही विभागांचे संचालन सुलभ करणे होतं.
अंतराळातील वैद्यकीय आव्हाने
अंतराळात 320 किलोमीटर उंचीवर वैद्यकीय सेवा देणे अत्यंत आव्हानात्मक असतं. दातदुखी किंवा कानदुखीसारख्या साध्या आजारांचेही निदान, उपचार कठीण होतात. अंतराळाचे अत्यंत तणावपूर्ण वातावरण हृदय, हाडे, डोळे, मूत्रपिंड आणि मनःस्थितीवर परिणाम करतं. नासा नेहमीच अंतराळवीरांच्या वैद्यकीय समस्यांचं तपशील गोपनीय ठेवतो. मागील 25 वर्षांत अनेक वैद्यकीय प्रकरणे स्थानकावर हाताळली गेली, मात्र ती वैज्ञानिक अभ्यासातच उघड केली जातात.
हे वाचलंत का :

