17 वर्षीय हितेननं रचला जागतिक इतिहास: सर्वात लहान रोबोटिक आर्मनं मोडला गिनीज विक्रम
17 वर्षीय हितेन धारपुरे यानं जगातील सर्वात लहान 39.250 मिलिमीटर रोबोटिक आर्म विकसित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडलाय.

Published : July 4, 2026 at 3:40 PM IST
नागपूर: महाराष्ट्रातील स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेचा 17 वर्षीय विद्यार्थी हितेन धारपुरे यानं अभूतपूर्व यश संपादन केलंय. त्यानं जगातील सर्वात लहान पूर्णपणे कार्यक्षम रोबोटिक आर्म विकसित करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. केवळ 39.250 मिलिमीटर आकाराच्या या रोबोटिक आर्मनं अमेरिकेतील पूर्वीचा 44.49 मिलिमीटरचा विक्रम मोठ्या फरकानं मोडला आहे. या यशानं केवळ नागपूर आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारताचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे. मर्यादित संसाधन, नावीन्यपूर्ण कल्पना आणि दृढ निश्चयानं मोठं यश मिळवता येते, असं हितेनच्या या प्रकल्पानं दाखवून दिलं आहे. या रोबोटिक आर्मची निर्मिती केवळ दोन महिन्यांत पूर्ण झाली. ही कामगिरी युवा भारतीयांच्या वैज्ञानिक क्षमतेचं उत्तम उदाहरण आहे.
अमेरिकेचा विक्रम मोडला : यापूर्वी हा विक्रम अमेरिकेतील इंडियाना येथील केल्टन सेरा यांच्या नावे होता. त्यांनी तयार केलेल्या 44.49 मिलिमीटर आकाराच्या 3डी-प्रिंटेड रोबोटिक आर्मला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळाला होता. हितेननं मात्र केवळ 39.250 मिलिमीटर आकारात अत्यंत अचूक आणि कार्यक्षम रोबोटिक आर्म तयार करून हा विक्रम खूप मोठ्या फरकानं मोडला. हा रोबोटिक आर्म पूर्णपणे इलेक्ट्रोमेकॅनिकल आहे. तो मानवी हाताप्रमाणे विविध गुंतागुंतीची कार्ये करू शकतो. त्यात मायक्रो सर्वो मोटर्स आणि उच्च अचूकतेचं पीडब्ल्यूएम (PWM) कंट्रोल मॉड्यूल वापरण्यात आलं आहेत. हा आर्म तीन स्वतंत्र अक्षांवर (axes) हालचाल करू शकतो आणि अतिशय लहान वस्तूही अचूकपणे पकडण्याची क्षमता त्याच्यात आहे.

तंत्रज्ञान आणि प्रकल्पातील आव्हाने : हितेननं या प्रकल्पासाठी सहज उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर केला. एफडीएम (FDM) 3डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे त्यानं स्वतः कस्टम चेसिसची रचना तयार केली. संपूर्ण मॉडेलची रचना अत्याधुनिक CAD (Computer Aided Design) सॉफ्टवेअरच्या साहाय्यानं सुरुवातीपासून तयार करण्यात आली. सर्वात मोठे आव्हान होतं ते म्हणजे अत्यंत छोट्या जागेत सर्वो मोटर्स, वायरिंग आणि इतर घटकांची अचूक मांडणी करणे. मायक्रो-मॅन्युफॅक्चरिंगच्या भौतिक मर्यादा ओलांडून उच्च अचूकता साधणे हे हितेनसमोरचं मुख्य आव्हान होतं. मात्र, त्यानं अपार मेहनत आणि सर्जनशीलतेनं ते यशस्वीरित्या पूर्ण केलं.

“सहज उपलब्ध तंत्रज्ञान वापरूनही मायक्रो-मॅन्युफॅक्चरिंगच्या मर्यादा ओलांडता येतात, हे सिद्ध करणे हा माझा मुख्य उद्देश होता. विकसित भारताच्या उभारणीत हे माझे छोटेसे योगदान आहे. जागतिक दर्जाचे नवोन्मेष आपल्या घरातून आणि शाळांमधूनही घडू शकतात.” -हितेन धारपुरे, संशोधक विद्यार्थी

विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यश : हितेनचं हे यश STEM (Science, Technology, Engineering and Mathematics) क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी प्रेरणा आहे. मर्यादित जागेत आणि उपलब्ध साधनांसह उच्च दर्जाचे रोबोटिक्स विकसित करता येते, हे या प्रकल्पानं सिद्ध केलं आहे. पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रात्यक्षिक आणि नवोन्मेष करणे किती महत्त्वाचे आहे, हे यावरून दिसून येतं. दृढ निश्चय, नावीन्यपूर्ण विचार आणि तांत्रिक कौशल्य यांच्या बळावर जगात आपली ओळख निर्माण करता येते, हा संदेश हितेनच्या यशातून मिळतो. सध्या हितेनच्या या ऐतिहासिक कामगिरीचं विविध स्तरांतून कौतुक होत आहे. महाराष्ट्र सरकार, शिक्षण संस्था आणि विज्ञान प्रेमींकडून त्याला शुभेच्छा मिळत आहेत. हितेनचे हे यश केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण युवा पिढीला प्रोत्साहन देणारे आहे.

हे वाचलंत का :

