मोटोरोलाची नवीन स्मार्टवॉच भारतात लवकरच होणार लॉंच
मोटोरोलाची नवीन स्मार्टवॉच लवकरच भारतात लाँच होणार आहे. सीईएस 2026 मध्ये अनावरण झालेल्या या वॉचला गोलाकार डिस्प्ले, आणि 13 दिवस बॅटरी लाइफ मिळतेय.

Published : January 8, 2026 at 5:42 PM IST
मुंबई : मोटोरोला सीईएस 2026 मध्ये अनावरण केलेली नवीन मोटो वॉच आता भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या टीझरमध्ये गोलाकार डिस्प्लेसह आकर्षक डिझाइन दिसतंय. यात सिलिकॉन आणि मेटल स्ट्रॅप पर्यायांसह प्रीमियम लुक आहे. पोलर कंपनीच्या भागीदारीत तयार झालेली ही स्मार्टवॉच आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी खास आहे. मोटोरोलानं लेनोवो टेक वर्ल्ड शोकेसमध्ये सीईएस दरम्यान अनेक इकोसिस्टम प्रॉडक्ट्स अनावरण केलं. त्यापैकी एका डिव्हाइसच्या लाँचची तयारी कंपनी करत आहे. एक्सवर शेअर केलेल्या टीझर इमेजमध्ये नवीन स्मार्टवॉचचा लुक उघड झाला आहे.
मोटो वॉचचा टीझर आणि डिझाइन
टीझरमध्ये दिसणारी स्मार्टवॉच गोलाकार डिस्प्लेसह येते. वक्र काचेमुळं तिला थोडेसे डोम आकाराचे स्वरूप आलं आहे, जे गूगलच्या पिक्सेल वॉच मॉडेल्ससारखं दिसतं. काचेच्या बाहेरील रिमवर मिनिट मार्किंग किंवा क्रोनोग्राफ डिझाइन कोरलेले किंवा प्रिंटेड दिसतं.
केस मेटल बिल्डची आहे आणि उजव्या बाजूला मोठा क्राउन आहे, जो यूजर इंटरफेस नेव्हिगेशनसाठी असू शकतो. टीझरमध्ये दोन स्ट्रॅप पर्याय दाखवले आहेत. स्पोर्टी लुकसाठी सिलिकॉन बँड आणि पारंपरिक घड्याळ स्टाइलसाठी मेटल लिंक बँड आहे. हे डिझाइन सीईएस 2026 मध्ये 7 जानेवारीला अनावरण झालेल्या नवीन मोटो वॉचशी पूर्णपणे जुळतंय.कंपनीनं सिलिकॉन आणि स्टेनलेस स्टीलसह अनेक स्ट्रॅप पर्याय दाखवले होते. भारतातील लाँच डेट मात्र अद्याप जाहीर झालेली नाही.
किंमत आणि उपलब्धता
मोटो वॉचची किंमत युरोपमध्ये 99 युरो (अंदाजे 10,400 रुपये) ठेवण्यात आली आहे. येत्या काही आठवड्यांत ती युरोप, मध्य पूर्व, आफ्रिका, लॅटिन अमेरिका, आशिया-पॅसिफिक आणि उत्तर अमेरिकेत उपलब्ध होईल. स्ट्रॅप कस्टमायझेशन पर्याय अनेक आहेत : स्टेनलेस स्टील (मॅट ब्लॅक आणि मॅट सिल्व्हर), सिलिकॉन (पॅन्टोन व्हॉल्कॅनिक अॅश, पॅन्टोन पॅराशूट पर्पल, पॅन्टोन हर्बल गार्डन) आणि लेदर-इन्स्पायर्ड पॅन्टोन मोचा मूस.
वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान
मोटो वॉचमध्ये 47 मिमी गोल डायल आहे. अॅल्युमिनियम फ्रेम आणि स्टेनलेस स्टील क्राउन आहे. काचेवर कॉर्निंग गोरिला ग्लास 3 संरक्षण आहे. IP68 रेटिंगसह धूळ आणि पाण्यापासून संरक्षण मिळतं, तसेच 1 ATM सबमर्शन क्षमता आहे. आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंग वैशिष्ट्यांमध्ये स्टेप काउंट, स्ट्रेस डिटेक्शन, स्लीप मॉनिटरिंग यांचा समावेश आहे. ही मोटोरोलाची पहिली स्मार्टवॉच आहे जी फिनिश स्पोर्ट्स आणि फिटनेस टेक कंपनी पोलरच्या भागीदारीत तयार झाली आहे. पोलरच्या तंत्रज्ञानामुळं वर्कआऊट लॉगिंग, हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन मॉनिटरिंग यासारखी प्रगत वैशिष्ट्ये मिळतात.
ब्ल्यूटूथ कॉलिंग, ऑडिओ नोटिफिकेशन अलर्ट आणि मोटो एआय-सपोर्टेड स्मार्टफोनसह ‘कॅच मी अप’ फीचर आहे. ऑलवेज-ऑन डिस्प्ले (AOD) बंद असल्यास 13 दिवस आणि चालू असल्यास 7 दिवस बॅटरी लाइफ मिळते.मोटोरोलाची ही स्मार्टवॉच भारतातील ग्राहकांसाठी परवडणारी आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्याय ठरू शकते.
हे वाचलंत का :

