एमजी हेक्टर टॉमाहॉक ईव्ही भारतात लॉंच; ईटीव्ही भारतचे अॅप पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कारच्या डॅशबोर्डवर
JSW MG Motor India नं बुधवारी भारतात 'MG Hector Tomahawk EV' लाँच केली. तुम्ही या कारमध्ये ETV Bharat च्या अधिकृत न्यूज ॲपद्वारे बातम्या ऐकू शकाल.

Published : August 26, 2026 at 4:44 PM IST
मुंबई : बुधवारी जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियानं आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही एमजी हेक्टर टॉमाहॉक ईव्ही भारतात उपलब्ध करून दिली. या लॉंचसोबत ईटीव्ही भारतानं ऑटोमोबाइल क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय कार ब्रँडच्या इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये अधिकृत न्यूज अॅप म्हणून ईटीव्ही भारतचं अॅप्लिकेशन समाविष्ट झालं आहे. हे अॅप ईटीव्ही भारतासाठी एक मानाचा तुरा ठरलं आहे.

ईटीव्ही भारतचा मानाचा तुरा : भारतातील आघाडीच्या वृत्तसंस्थांपैकी एक असलेल्या ईटीव्ही भारतानं कोणत्याही कार ब्रँडच्या स्क्रीनवर अधिकृतपणं आपलं अॅप झळकावण्याचा मान मिळवला आहे. अचूक बातम्या आणि व्यापक नेटवर्कमुळं ओळखल्या जाणाऱ्या ईटीव्ही भारताच्या क्षमतेला मान देत एमजी मोटर्सनं हेक्टर टॉमाहॉक ईव्हीच्या इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये ईटीव्ही भारत अॅप समाविष्ट केलं आहे. आता या गाडीतून प्रवास करताना ड्रायव्हर आणि प्रवाशांना एका क्लिकवर महत्त्वाच्या अपडेट्स मिळू शकतील.
हेक्टर टॉमाहॉक ईव्हीची किंमत आणि तांत्रिक वैशिष्ट्ये : या आलिशान इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 19.49 लाख ते 23.49 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस (BaaS) प्रोग्राम अंतर्गत निवडक ग्राहकांना ती 13.99 लाख रुपयांपासून उपलब्ध होणार आहे. गाडीत 69.2 kWh चा बॅटरी पॅक आहे, जो एका चार्जवर सुमारे 517 किमी रेंज देतो. ही मोटार 201 एचपीची ताकद निर्माण करते आणि 0 ते 100 किमी/तास वेग अवघ्या 8.1 सेकंदात गाठते. गाडी 5-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात 15.6 इंचाची टचस्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ आणि लेव्हल 2 एडीएएस सुरक्षा प्रणाली आहे. हायब्रिड व्हेरियंटमध्ये पूर्ण रेंज सुमारे 1000 किमीपर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळं मोठ्या कुटुंबांसाठी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ती उपयुक्त ठरते.
"गेल्या महिन्यात 'ADAPT' लाँच केल्यानंतर, सर्वांना असं वाटलं की आम्ही केवळ बॅटरीवर चालणारी ईव्ही (BEV) सादर करू; कोणालाही PHEV ची अपेक्षा नव्हती, पण आम्ही सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. शिवाय, या ईव्हीसाठी इतकी आकर्षक किंमत असेल याचीही कदाचित कोणाला अपेक्षा नव्हती; परंतु आम्ही देशाला परवडणाऱ्या दरात उच्च-गुणवत्तेची 'न्यू एनर्जी वाहनं' (new energy vehicles) उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ही दोन्ही वाहने प्रभावी रेंज, उत्कृष्ट दर्जा आणि दमदार कामगिरी देतात. आम्ही ईव्ही क्षेत्रात लवकरच अव्वल स्थान गाठण्याच्या तयारीत आहोत. सध्या टाटा पहिल्या क्रमांकावर आहे, परंतु या दोन वाहनांच्या लाँचिंगसह, भारतातील आघाडीची 'न्यू एनर्जी वाहन' कंपनी बनण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ईव्ही आणि PHEV लाँच करून, आम्ही भारतीय ग्राहकांसमोरील दोन प्रमुख आव्हानांवर उपाययोजना केली आहे. पहिले म्हणजे, जर तुम्हाला 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज असलेली पूर्णपणे इलेक्ट्रिक गाडी (pure EV) हवी असेल, तर तुम्ही 'हेक्टर टोमाहॉक ईव्ही' (Hector Tomahawk EV) निवडू शकता. दुसरं म्हणजे, जर तुम्ही 1,100 किलोमीटरपर्यंतची विस्तृत रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनाच्या शोधात असाल किंवा तुम्ही पहिल्यांदाच ईव्ही खरेदी करत असाल आणि तुम्हाला रेंज, चार्जिंग किंवा 'न्यू एनर्जी वाहनां'च्या इतर बाबींबद्दल काही शंका असतील तर 'हेक्टर टोमाहॉक PHEV' हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे". - पार्थ जिंदाल, संचालक, JSW MG मोटर इंडिया
आकर्षक बाह्यरूप: एमजी हेक्टर टॉमाहॉक ईव्हीचं डिझाइन आधुनिक आणि एरोडायनॅमिक ठेवण्यात आलं आहे. दर्शनी भागात क्लोज्ड-ऑफ ग्रिल, आयताकृती एलईडी हेडलॅम्प्स आणि एच-आकाराचे सिग्नेचर एलईडी डीआरएल आहेत. बाजूला ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, बॉडी क्लॅडिंग आणि रूफ रेल्स दिसतात. मागच्या भागात कनेक्टेड एलईडी टेललॅम्प्स आणि नवीन बंपर आहे.
आधुनिक केबिन आणि सुरक्षा वैशिष्ट्ये : आतील केबिनमध्ये प्रवाशांच्या सुविधेला प्राधान्य दिलं आहे. प्रशस्त लेगरूम आणि हेडरूमसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो तसेच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल या सुविधा उपलब्ध आहेत. सुरक्षेसाठी लेव्हल-2 अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (एडीएएस), 360-डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा, मल्टिपल एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट्स यांचा समावेश आहे. एमजी हेक्टर टॉमाहॉक ईव्हीची हे लॉंच आणि ईटीव्ही भारत अॅपचं समावेशन भारतीय ऑटो आणि मीडिया क्षेत्रातील एक महत्त्वाची घटना ठरली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आणि व्यावहारिक रेंज यामुळं ही एसयूव्ही बाजारात लक्ष वेधून घेणार आहे.
हे वाचलंत का :

