इस्रोचं 'विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शन सुरू: विद्यार्थ्यांनी अनुभवला अंतराळाच्या रहस्यांचा प्रत्यक्ष अनुभव
नाशिकमध्ये इस्रोचं विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शन (ISRO Space Exhibition Nashik) सुरू झालंय. यात विद्यार्थ्यांना चंद्रयान, मंगळयान, गगनयानसह 16 मॉडेल्सद्वारे अंतराळ रहस्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतोय.

Published : February 24, 2026 at 10:00 AM IST
नाशिक : भारतीय अंतराळ संशोधन संस्थानं (इस्रो) नाशिक शहरातील विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात घेऊन जाण्यासाठी एक विशेष उपक्रम राबवला आहे. अशोका ग्लोबल अकॅडमी (अशोका विद्यालय), अर्जुन नगर येथे 'विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शनाचं (Vikram Sarabhai Space Exhibition) आयोजन करण्यात आलं. हे तीन दिवसांचं प्रदर्शन (22 ते 24 फेब्रुवारी 2026) पर्यंत विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. या प्रदर्शनात इस्रोच्या विविध मोहिमांचे मॉडेल्स, दृक्-श्राव्य सादरीकरणं आणि थेट मार्गदर्शन उपलब्ध आहे. या प्रदर्शनामुळं ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाबाबत जिज्ञासा आणि करिअरची प्रेरणा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
इस्रोच्या मॉडेल्स आणि प्रदर्शनाचं वैशिष्ट्य
या प्रदर्शनात इस्रोच्या अंतराळ प्रवासातील महत्त्वाच्या घटकांचे 16 सविस्तर प्रमाणबद्ध मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. यात चंद्रयान, मंगळयान, गगनयान, विविध उपग्रह, प्रक्षेपण वाहने (रॉकेट्स), भविष्यातील अंतराळ यान आणि सॅटेलाइट्स यांचा समावेश आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ आणि प्रशिक्षित विद्यार्थी अभ्यागतांना प्रत्येक मॉडेलचं महत्त्व, कार्यपद्धती आणि भारतीय अंतराळ मोहिमांचा इतिहास समजावून सांगत आहेत. याशिवाय प्रभावी व्हिडिओ सादरीकरणांद्वारे इस्रोच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यात येत आहे.अहमदाबाद येथून आलेल्या इस्रोच्या टीमनं हे मॉडेल्स आणले आहेत. गावोगावच्या विद्यार्थ्यांपर्यंत अंतराळ विज्ञान पोहोचवणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

प्रदर्शनाचा उद्देश आणि प्रेरणा
इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ जयंत जोशी यांनी सांगितलं की, "खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढील पिढीला प्रेरित करणे आणि त्यांच्यात जिज्ञासा निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. इस्रो ही संस्था राखेतून उभारी घेऊन महान यश कसं साध्य करता येते, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे." आजच्या 'प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग' आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) युगात पाठ्यपुस्तकाबाहेरील अशा प्रत्यक्ष अनुभवाच्या उपक्रमांची अध्यापन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. विद्यार्थ्यांना अंतराळ शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि इस्रोच्या यशाची प्रेरणा मिळते.

इस्रो टीम आणि स्थानिक विद्यार्थ्यांची भूमिका
इस्रोचे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. पी. व्यास यांनी सांगितलं, "आम्ही अहमदाबादहून 16 मॉडेल्स घेऊन आलो आहोत. चंद्रयान, मंगळयान, गगनयान यांसह भविष्यातील रॉकेट्स आणि सॅटेलाइट्सची माहिती देत आहोत. व्हिडिओद्वारे इस्रोचा प्रवास दाखवतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इस्रोबाबत जागरूक करणे हा उद्देश आहे." अशोका विद्यालयातील विद्यार्थिनी नीता बिजलानी म्हणाल्या, "इस्रो टीमनं आम्हाला प्रथम प्रशिक्षण दिलं. आता आम्ही विविध शाळांतील विद्यार्थ्यांना मॉडेल्सद्वारे रॉकेट लॉंच, यान आणि इस्रोच्या मोहिमांबाबत माहिती देत आहोत."

उत्तर महाराष्ट्रासाठी विशेष प्रयत्न
शिक्षिका अपर्णा मटकरी यांनी सांगितलं की, "आमची संस्था उत्तर महाराष्ट्रातील एकमेव इस्रो सर्टिफाइड स्पेस ट्यूटर आहे. इस्रोची माहिती कानाकोपऱ्यातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण, आदिवासी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, अशी अपेक्षा आहे." हे प्रदर्शन नाशिकसाठी ऐतिहासिक ठरलं असून, विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडं आकर्षित करण्यात यशस्वी ठरलं आहे.
हे वाचलंत का :

