संयुक्त राष्ट्राच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय AI वैज्ञानिक पॅनलवर प्रो. बी. रवींद्रन यांची नियुक्ती
संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय AI वैज्ञानिक पॅनलमध्ये IIT Madras चे प्रो. बी. रवींद्रन यांची नियुक्ती झालीय.

Published : February 24, 2026 at 4:52 PM IST
हैदराबाद : भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रासचे (IIT Madras) प्राध्यापक डॉ. बालारामन रवींद्रन यांची संयुक्त राष्ट्रांनं (UN) स्थापन केलेल्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पॅनल ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Independent International Scientific Panel on Artificial Intelligence) मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. हे पॅनल कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) समाजावरील प्रभावांचं वैज्ञानिक मूल्यांकन करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. ही नियुक्ती 24 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाली असून, प्रो. रवींद्रन भारत आणि ग्लोबल साउथचं प्रतिनिधित्व कणार आहेत.
पॅनलची स्थापना आणि पार्श्वभूमी
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं 26 ऑगस्ट 2026 रोजी ठराव क्रमांक A/RES/79/325 द्वारे हे पॅनल स्थापन केलं. ही जगातील पहिली वैश्विक वैज्ञानिक संस्था आहे, जी AI वर केंद्रित आहे. यात जगातील 40 आघाडीच्या तज्ज्ञांचा समावेश आहे.
UN महासचिवांचे उद्गार
भारत AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये दिल्लीत बोलताना UN महासचिव अँटोनियो गुटेरेस म्हणाले, “भारतात परिषद होणं विशेष अर्थपूर्ण आहे.या परिषदेमुळं जगाच्या बहुतेक भागातील वास्तविकता जवळ येतेय. गेल्या वर्षी महासभेनं दोन महत्त्वाचे पाऊल उचलले होते. पहिलं, स्वतंत्र आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक पॅनलची स्थापना. मी आनंदानं घोषणा करतो की, हे पॅनल आता नियुक्त होत आहे. यात जगातील 40 तज्ज्ञ अधुनिक समज विकसित करतील. AI सर्वांचं असावं, मी सदस्य राष्ट्र आणि नागरी समाजाला पॅनलच्या कामात योगदान देण्याचं आवाहन करतो,” असं ते म्हणाले होते.
प्रो. रवींद्रन यांचं योगदान
प्रो. बी. रवींद्रन हे IIT Madras येथील सेंटर फॉर रिस्पॉन्सिबल AI चे (CeRAI) संस्थापक प्रमुख आहेत. सध्या ते वढवानी स्कूल ऑफ डेटा सायन्स अँड AI (WSAI) चे प्रमुख आहेत. AI क्षेत्रात तीन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या त्यांच्या संशोधनात जबाबदार AI आणि डीप रिनफोर्समेंट लर्निंग यांचा समावेश आहे. ते म्हणाले, “AI हे पिढ्यान्पिढ्या बदलणारं तंत्रज्ञान आहे. ते प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करतं, कधी जाणीवपूर्वक तर कधी अज्ञानात. UN नं आता AI च्या दूरगामी परिणामांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ पॅनल स्थापन केलं आहे. मी भारत आणि ग्लोबल साउथचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळं मला खूप आनंद होतोय.”
IIT Madras ची प्रतिक्रिया
IIT Madras चे संचालक प्रो. व्ही. कमाकोटी म्हणाले, “प्रो. रवींद्रन यांची या प्रतिष्ठित पॅनलमध्ये निवड झाल्यानं मी अत्यंत आनंदित आहे. ते CeRAI मध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या नियुक्तीमुळं मी आणि IIT Madras चा अभिमान वाढला आहे. हे पॅनल AI च्या सकारात्मक प्रभावासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.”
पॅनलचे उद्दिष्ट
हे पॅनल वैश्विक वैज्ञानिक सहकार्य मजबूत करेल, AI च्या उपयोजनावर पुराव्यावर आधारित अंतर्दृष्टी देईल आणि सामाजिक, आर्थिक, नैतिक परिणामांवर बहुविद्याशाखीय तज्ज्ञता प्रदान करेल. प्रो. रवींद्रन यांची निवड IIT Madras च्या जबाबदार AI संशोधनातील योगदान आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांवरील जागतिक चर्चेत भाग घेण्याचं प्रतिबिंब आहे.
हे वाचलंत का :

