हिरो मोटोकॉर्पची पहिली फ्लेक्स फ्युएल मोटरसायकल 3 जूनला होणार लॉंच
हिरो मोटोकॉर्प आपली पहिली 'फ्लेक्स-फ्युएल' (flex-fuel) मोटरसायकल जी 100 टक्के इथेनॉलवर (E100) चालण्यास सक्षम आहे.

Published : May 29, 2026 at 5:25 PM IST
मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या टू-व्हीलर उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पनं आपली पहिली फ्लेक्स-फ्युएल मोटरसायकल 3 जूनला लाँच करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या उपस्थितीत हे लाँचिंग होणार आहे.
फ्लेक्स-फ्युएल वाहन म्हणजे काय? : फ्लेक्स-फ्युएल वाहन हे असं वाहन आहे ज्याचे इंजिन पेट्रोल आणि इथेनॉलच्या कोणत्याही मिश्रणावर चालू शकतं. E85 (85% इथेनॉल) आणि भविष्यात E100 पर्यंत चालण्याची क्षमता यात आहे. सध्या भारतात E20 इंधन उपलब्ध आहे, पण सरकारचं E100 पर्यंत जाण्याचं ध्येय आहे.
हिरोची पहिली फ्लेक्स-फ्युएल मॉडेल : कंपनीनं अद्याप या दुचाकीचं नाव जाहीर केलं नाही, पण स्प्लेंडर आणि एचएफ डिलक्सवर आधारित हे मॉडेल्स असण्याची शक्यता आहे. 2025 च्या भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये एचएफ डिलक्सवर आधारित फ्लेक्स-फ्युएल प्रोटोटाइप दाखवण्यात आला होता.
भारतातील फ्लेक्स-फ्युएल स्थिती : सुजुकीकडं Gixxer SF 250 फ्लेक्स-फ्युएल मॉडेल उपलब्ध आहे. याची किंमत 1.98 लाख रुपये आहे. होंडानं CB300F मॉडेल लाँच केलं होतं पण नंतर ते बंद केलं. चार-चाकीमध्ये मरुती सुझुकी 5 जूनला (वर्ल्ड एन्व्हायरनमेंट डे) WagonR च्या फ्लेक्स-फ्युएल आवृत्तीचं लाँच करणार आहे.
फ्लेक्स-फ्युएलचे फायदे : फ्लेक्स-फ्युएल मोटरसायकल्समुळं इथेनॉल ब्लेंडिंग वाढेल, आयात तेलावर अवलंबित्व कमी होईल, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल आणि प्रदूषण नियंत्रणात मदत होईल. हिरो मोटोकॉर्पचं हे पाऊल देशाच्या ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण धोरणाला सुसंगत आहे.कॉम्युटर सेगमेंटमध्ये लोकप्रिय मॉडेल्सवर फ्लेक्स-फ्युएल येण्यानं लाखो ग्राहकांना स्वच्छ पर्याय मिळेल. सरकार आणि उद्योग यांचा संयुक्त प्रयत्न भारताला इथेनॉल अर्थव्यवस्थेकडं घेऊन जाईल.
हे वाचलंत का :

