इंधनाच्या वाढत्या किमतींमुळ इलेक्ट्रिक वाहनाची (EV) मागणी वाढली
जागतिक संकटामुळं भारतात इंधनाच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. त्यामुळं भारतीय ग्राहक इलेक्ट्रिक वाहनाकडे वळताय.

Published : June 2, 2026 at 3:02 PM IST
नवी दिल्ली: मे महिन्यात भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनाच्या (EV) मागणीत मोठी वाढ दिसून आली. या वाढीमागे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या किमतींमुळे ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडं वळण्यास प्रोत्साहन मिळालं आहे. नोमुरा (Nomura) आणि एचएसबीसी (HSBC) यांच्या अहवालांनी प्रवासी वाहने आणि इलेक्ट्रिक दुचाकी या दोन्ही क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांला अधिक मागणी असल्याचं अधोरेखित केलं आहे.
नोमुरा आणि एचएसबीसी यांच्या अहवालानुसार, या वर्षी मे महिन्यात भारताच्या इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारपेठेत मागणीत मोठी वाढ नोंदवली गेली. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळं अधिक ग्राहक बॅटरीवर चालणाऱ्या पर्यायी वाहनांकडे वळले, हे या वाढीचं मुख्य कारण ठरले. नोमुराच्या माहितीनुसार, मे महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री एकूण प्रवासी वाहन विक्रीच्या 6.4 टक्क्यांपर्यंत पोहोचली; याउलट आर्थिक वर्ष 2026 मध्ये हे प्रमाण 4 टक्के होतं. त्याच वेळी, इलेक्ट्रिक दुचाकींचा विक्रीतील वाटा 8.9 टक्के राहिला, जो गेल्या वर्षी सुमारे 6.5 टक्के होता. मागणीचा कल आता इलेक्ट्रिक वाहनांकडं अधिक झुकला असून, या वाहनांची लोकप्रियता आणि स्वीकारार्हता सातत्यानं वाढत असल्याचं या ब्रोकरेज संस्थेनं नमूद केलं आहे. त्याचप्रमाणे, एचएसबीसीच्या एका अहवालात म्हटलं आहे की, "इंधनाच्या किमतींमध्ये अलीकडे झालेल्या वाढीमुळं, गेल्या काही आठवड्यांत ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करण्याकडं अधिक वाढला आहे." या ब्रोकरेज संस्थेनं मे महिन्यात इलेक्ट्रिक दुचाकींचा स्वीकार 9.3 टक्के आणि इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांचा स्वीकार 6.6 टक्के राहिल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
EV क्षेत्रात टाटा मोटर्सची दमदार वाढ : वाहन उत्पादकांमध्ये, इलेक्ट्रिक कारच्या मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळं 'टाटा मोटर्स' ही कंपनी सर्वाधिक लाभ मिळवणारी प्रमुख कंपनी ठरली. कंपनीनं इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर (year-on-year) 85 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे, तर गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक वाहनांच्या बुकिंगमध्ये अडीच पटीनं वाढ झाली आहे.
नोमुराच्या माहितीनुसार, 15 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या विभागात (segment) टाटा मोटर्सला विशेषतः जोरदार मागणी दिसून येत आहे. या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी, कंपनी आपली इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता दरमहा 10,000 युनिट्सवरून 15,000 युनिट्सपर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे.
इलेक्ट्रिक दुचाकींच्या बाजारपेठेचा विस्तार : इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्याचा हा कल दुचाकींच्या विभागात तर अधिकच ठळकपणे दिसून आला. मे महिन्यात सुमारे 42,000 इलेक्ट्रिक स्कूटरची नोंदणी करून 'TVS मोटर' ही कंपनी बाजारपेठेत अव्वल स्थानी (market leader) राहिली; त्यानंतर 'बजाज ऑटो' आणि 'एथर एनर्जी' यांचा क्रमांक लागला. नोमुराच्या अहवालानुसार, एथर (Ather) कंपनीच्या विक्रीत वार्षिक आधारावर दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली, ज्यामुळं कंपनीला बाजारपेठेतील 16.5 टक्के वाटा मिळवण्यात यश आलं.
ईव्हीच्या वाढीबाबत ब्रोकरेज कंपन्या आशावादी : वस्तूंच्या वाढत्या किमती उत्पादकांसाठी चिंतेचा विषय असल्या तरी, दोन्ही ब्रोकरेज कंपन्यांच्या मते इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. नोमुराच्या मते, अनुकूल धोरणात्मक उपाययोजना आणि वाढत्या ग्राहक स्वीकृतीमुळं भारतीय बाजारपेठेत 'ईव्ही एका निर्णायक टप्प्यावर' आहेत.
वाढत्या तेलाच्या किमतींमुळं ईव्हीचं आकर्षण वाढलं : तेल विपणन कंपन्यांनी एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रति लिटर सुमारे 8 रुपयांनी वाढवल्या. देशांतर्गत इंधनाच्या किमती ठरवणारी इंडियन क्रूड बास्केट, मे महिन्यात सलग तीन महिने प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर राहिली. याचं कारण म्हणजे मध्य-पूर्वेतील दीर्घकाळ चाललेलं संकट, ज्यामुळं होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे, ज्यामधून जगातील 20 टक्के तेल आणि वायू निर्यात होते. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता वाटाघाटींमध्ये शस्त्रसंधीच्या नियमित उल्लंघनामुळं अधिक अनिश्चितता निर्माण झाली आहे आणि तेलाच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारनं ग्राहकांच्या संरक्षणासाठी भाववाढीवर नियंत्रण ठेवल्यानं, भारतीय तेल कंपन्यांना पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीतून अजूनही दररोज 550 कोटी रुपयांचं नुकसान होत आहे.
हे वाचलंत का :

