ETV Bharat / technology

'ड्रायव्हर आता मालक...' 500 रुपये गुंतवून व्हा मालक, अमित शाहांचा भारत टॅक्सी चालकांशी संवाद

केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ( Amit Shah) यांनी आज दिल्लीत भारत टॅक्सी (Bharat Taxi) चालकांशी संवाद साधला.

Union Home Minister Amit Shah
अमित शाह (Amit Shah X Account)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : February 23, 2026 at 3:13 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी दिल्लीतील भारत टॅक्सी चालकांशी संवाद (Amit Shah Bharat Taxi interacts) साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, सहकारी क्षेत्र हे सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. 5 फेब्रुवारी रोजी अमित शाह यांनी दिल्ली येथे भारतातील पहिला सहकारी-आधारित राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म, भारत टॅक्सी लाँच केला. हा देशातील पहिला सहकारी टॅक्सी सेवा प्रकल्प आहे, ज्याचा उद्देश चालकांना थेट फायदा पोहोचवणे आहे.

भारत टॅक्सी चालकांशी संवाद
कार्यक्रमादरम्यान, अमित शाह यांनी भारत टॅक्सी (Bharat Taxi ) चालकांशी मोकळेपणानं संवाद साधला. यावेळी बोलतान त्यांनी सांगितलं की, सहकारी क्षेत्राला बळकट करणे ही आमच्या सरकारची प्राथमिकता आहे. अमित शाह म्हणाले, "जर तुम्ही सहकार्याचं तत्त्वज्ञान आणि पद्धती योग्यरित्या समजून घेतल्या तर, प्रश्न उद्भवणार नाहीत. सहकार्य म्हणजे एकत्र काम करणे आणि एकत्र नफा मिळवणे. अमूल हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. गुजरातमधील 36 लाख माता आणि भगिनी अमूलच्या सदस्य आहेत. ही एक सामान्य लोकांनी स्थापन केलेली सहकारी संस्था आहे. या 36 लाख माता आणि भगिनींनी सुरुवातीला अमूलमध्ये फक्त 50 रुपये गुंतवले होते. काही कालावधीत अधिक महिला सामील झाल्या आणि संघटना अधिक मजबूत झाली."

1.25 ट्रिलियन रुपयांची उलाढाल
ते पुढे म्हणालं, "आज, 36 लाख माता आणि भगिनींचा सहकारी प्रकल्प आज अंदाजे 1.25 ट्रिलियन रुपयांची उलाढाल करत आहे. यावरून असं दिसून येतं की जेव्हा लोक एकत्र काम करतात तेव्हा लहान सुरुवात देखील मोठ्या यशात बदलू शकते. मी सहकार विभागाला विनंती करेन की त्यांनी आमच्या वेबसाइटवर अशा 25 माता आणि भगिनींची यादी टाकावी ज्यांनी एका वर्षात डेअरीला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दूध पुरवलं आहे, म्हणजेच त्यांचं उत्पन्न 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे."

"तुम्ही मालक आहात"
अमित शाह म्हणाले, "कंपन्या चालवण्याचा उद्देश मालकाला श्रीमंत बनवणे आहे. आमचं ध्येय मालकाला समृद्ध करणे देखील आहे. फरक एवढाच आहे की येथे मालक दुसरं तिसरं कोणी नसून तुम्ही आहात. तुम्हाला फक्त 500 गुंतवावे लागतील. समजा, तीन वर्षांनी भारत टॅक्सी 25 कोटी रुपये कमवते, तर त्यातील 20 टक्के, किंवा 5 कोटी, तुमच्या भांडवलाच्या स्वरूपात संस्थेच्या खात्यात जमा होतील. उर्वरित 80 टक्के रक्कम कोणी किती किलोमीटर टॅक्सी चालवली यावर आधारित असेल." ते म्हणाले, "याचा अर्थ असा की तुम्हाला एक निश्चित भाडं मिळेल, परंतु तुम्ही मालक असल्यानं, नफ्यात तुमचाही वाटा असेल. तुम्हाला हा वाटा मिळेल, परंतु तुम्हाला पहिली तीन वर्षे थोडा धीर धरावा लागेल."

'खाजगी कंपनी नाही, तर लोकांना सक्षम करण्याचा प्रयत्न'
अमित शाह म्हणाले, "भारत टॅक्सीचं उद्दिष्ट कोणत्याही खाजगी कंपनीप्रमाणे नफा कमविणे नसून लोकांना सक्षम करणे आहे. सर्व खाती स्वच्छ आणि पारदर्शक असतील. तुम्हाला सर्व माहिती आगाऊ दिली जाईल. ही प्रणाली खाजगी कंपनीसारखी चालणार नाही, तर सहकारी तत्त्वांवर चालेल. भारत टॅक्सी कधीही तुमचं शोषण करणार नाही."

'पाच मोठ्या सहकारी संस्थांपासून सुरुवात'
गृह मंत्री म्हणाले, "आपल्याकडं स्वतःहून एवढी मोठी संस्था उभारण्यासाठी भांडवल नाही. म्हणून, आम्ही देशातील पाच मोठ्या सहकारी संस्थांचं विलीनीकरण करून हे सुरू केलंय. तुमची संख्या वाढत असताना, भागीदार बनू इच्छिणारा कोणताही सारथी 500 रुपयांचा वाटा घेऊन मालक बनू शकेल. भारत टॅक्सीचं संचालक मंडळ निवडून आल्यावर, सारथी सदस्यांसाठी काही जागा राखीव ठेवल्या जातील. ते तुमच्या हिताची पूर्ण काळजी घेतील.

'भाडे निश्चित दरापेक्षा कमी नसतील'
केंद्रीय मंत्री म्हणाले, "भारत टॅक्सी काहीही लपवणार नाही. सर्व माहिती तुम्हाला एक आठवडा आधी अधिसूचनेद्वारे दिली जाईल. तुमच्या किमान भाड्यावर नफा जोडला जाईल. आम्ही कधीही मूळ दरापेक्षा कमी भाडे आकारणार नाही."

हे वाचलंत का :

  1. नवीन Isuzu D Max V Cross भारतात लॉंच; 4x4 ड्राइवट्रेन, 10.3 इंच स्क्रीन आणि 360° कॅमेरा
  2. Xiaomi 17, Xiaomi 17 Ultra आणि Xiaomi Pad 8 : 28 फेब्रुवारीला होणार भारतात लॉंच
  3. नासाच्या आर्टेमिस II मोहिमेसाठी तारीख पे तारीख : हेलियमच्या समस्येमुळं पुन्हा विलंब