महाराष्ट्रात ‘एआय फॉर एज्युकेशन’ संवाद: शिक्षणात क्रांती आणण्यासाठी 42 कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्रात संपर्क फाउंडेशननं ‘एआय फॉर एज्युकेशन इम्पॅक्ट’ संवाद आयोजित केलाय. एआयद्वारे शिक्षण सुधारण्यासाठी 42 कोटींची गुंतवणूक झाली असून 10 लाख या मुलांना लाभ मिळेल.

Published : March 10, 2026 at 3:48 PM IST
मुंबई: महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी संपर्क फाउंडेशननं ‘एआय फॉर एज्युकेशन इम्पॅक्ट’ राज्य कृती संवादाचं आयोजन केलंय. या कार्यक्रमात एआयचा वापर करून शिक्षकांच्या कौशल्याला बळकटी देण्यावर भर देण्यात आला. राज्यानं 42 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 10 लाखांहून अधिक मुलांना चांगले शैक्षणिक परिणाम मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवलंय.
10 मार्च 2026 रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे या संवादाचा शुभारंभ झाला. प्रधान सचिव श्री. रणजीत सिंग देओल (आयएएस, शालेय शिक्षण आणि क्रिडा विभाग) यांच्या हस्ते उद्घाटन झालं. कार्यक्रमात शिक्षण आयुक्त, जिल्हा प्रमुख, शिक्षक आणि एआय तज्ज्ञ उपस्थित होते. भारतानं प्राथमिक शाळांमध्ये 95% प्रवेश साध्य केले असले तरी, मुले वाचन-गणितासारख्या मूलभूत कौशल्यांशिवाय शाळा सोडत आहेत. या आव्हानावर एआय उपाय शोधू शकतं का, यावर चर्चा झाली. एआयला शिक्षकांच्या जागी नव्हे, तर त्यांच्या मागे काम करून शिकण्याचं वैयक्तिकरण करण्यावर भर देण्यात आला. तीन परिसंवादांमध्ये राष्ट्रीय ध्येयाला राज्यस्तरावर कृतीत उतरवण्यावर विचारविनिमय झाला.
संपर्क फाउंडेशनचे संस्थापक विनीत नायर म्हणाले, “सरकारी शाळेतील प्रत्येक मुलाला खासगी शाळेच्या दर्जाचं शिक्षण मिळावं, ही आमची कल्पना आहे. एआय हा अडथळा नव्हे तर या कल्पनेची अभिव्यक्ती आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांबरोबर आमचा सहयोग वाढत असून, कुतूहलपूर्ण वर्ग तयार करण्याचं उद्दिष्ट आहे.” फाउंडेशन 20 वर्षांत 10 लाख मुलांपर्यंत पोहोचल असून 16,000 शाळांमध्ये 50,000 शिक्षकांना प्रशिक्षण दिलंय.संस्थेन आत्तापर्यंत 17,000 स्मार्ट क्लासरूम्स स्थापन केले आहे. आणखी 15,000 क्लासरूम्सची तयार करण्याची योजना आहे.
यावेळी देओल म्हणाले, “एआय योग्यरित्या वापरल्यास प्रगतीचा वेग वाढेल. महाराष्ट्र एआयच्या परिवर्तनात्मक भूमिकेचं स्वागत करतो.” संवादात संपर्क एआय फ्रेमवर्कची चर्चा झाली. पाठ नियोजन, साहित्य क्रमवारी आणि अहवाल ऑटोमेटेड करून शिकविण्याचा वेळ वाढवला जाईल. फाउंडेशननं 80,000 शाळांमध्ये विनामूल्य एआय-आधारित क्लासरूम मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म सुरू केलंय, ज्यामुळं रिअल-टाइम डेटा ट्रॅकिंग, सहभाग देखरेख आणि पुरावा-आधारित निर्णय शक्य होतील.
हे वाचलंत का :

