ETV Bharat / technology

सायबर गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई: 57 आरोपींना अटक, 132 मोबाइल, सिम कार्ड्स, खोटी ओळखपत्रे जप्त

झारखंड पोलिसांनी उत्तर छोटानागपूरमध्ये सायबर गुन्हेगारीविरोधात मोठी कारवाई केली. 57 आरोपींना अटक करून 4.67 लाख रोख, 132 मोबाइल, सिम कार्ड्स, खोटी ओळखपत्रे जप्त.

CYBER CRIME
प्रातिनिधिक फोटो (Canva)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : February 21, 2026 at 4:58 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

रांची : झारखंड पोलिसांनी उत्तर छोटानागपूर विभागात सायबर गुन्हेगारीच्या संगठित नेटवर्कविरोधात मोठी कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत 57 आरोपींना अटक करण्यात (cyber criminals arrested) आली. रांची येथून समन्वित छापे टाकून पोलिसांनी रोख रक्कम, वाहनं, सिम कार्ड्स आणि डिजिटल पुरावे जप्त केले. ही कारवाई उत्तर छोटानागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील भास्कर यांच्या निर्देशानुसार पार पडली. 'प्रतिबिंब' अ‍ॅपच्या (PRATIBIMB APP) मदतीनं संशयास्पद मोबाइल नंबर ओळखून ही मोहीम राबवण्यात आली.

एकाधिक जिल्ह्यांमध्ये छापे
उत्तर छोटानागपूर परिक्षेत्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापे टाकण्यात आले. ऑक्टोबर 1, 2025 ते फेब्रुवारी 16, 2026 या कालावधीत 'प्रतिबिंब' अ‍ॅपद्वारे फ्लॅग केलेल्या मोबाइल नंबरांची पडताळणी करून 15 सायबर गुन्हेगारीचे गुन्हे दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासात आढळलं की, आरोपी अधिकारी म्हणून बनावट फोन कॉल्स करत, बँकिंग आणि एटीएम फसवणूक, ओटीपी-आधारित घोटाळे आणि ऑनलाइन व्यवहारातील फसवणुकीत सामील होते. हे आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या संगठित सायबर फ्रॉड नेटवर्कचा भाग होते.

छाप्यांमध्ये जप्त केले पुरावे
छाप्यांदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, बँकिंग साधने आणि पुरावे जप्त केले. यात 132 मोबाइल फोन्स, 168 सिम कार्ड्स, 31 एटीएम कार्ड्स, 7 बँक पासबुक, 3 बँक चेक बुक, 23 रजिस्टर आणि नोटबुक्स (व्यवहार नोंदींसह) आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट डेटा यांचा समावेश आहे. याशिवाय 4.67 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तपासात असं दिसून आले की, काही आरोपी खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँक खाती आणि सिम कार्ड्स चालवत होते.

खोटी ओळखपत्रे जप्त
जप्त केलेल्या ओळखपत्रांमध्ये 3 आधार कार्ड्स, 8 पॅन कार्ड्स, 1 लेबर कार्ड, 1 मतदार ओळखपत्र आणि 1 ड्रायव्हिंग लायसन्स यांचा समावेश आहे. या नेटवर्कनं वापरलेली 3 चारचाकी वाहनं आणि ७ दुचाकी वाहनंही जप्त करण्यात आली.

पोलिसांची पुढील कारवाई
'प्रतिबिंब' अ‍ॅपनं संशयास्पद नंबर ओळखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळं पोलिसांना लवकरात लवकर कारवाई करता आली. पोलीस महानिरीक्षक सुनील भास्कर यांनी सांगितलं की, या भागात सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी निरीक्षण वाढवलं जाईल आणि अशा मोहिमा सुरू राहतील. पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. ओटीपी, बँकिंग तपशील शेअर करू नका, संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका आणि कोणत्याही सायबर फसवणुकीची तक्रार तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर क्राइम हेल्पलाइनवर करा, असं अवाहन पोलिसांनी केलंय.

हे वाचलंत का :

  1. गुंतवणूक करताना ज्येष्ठ नागरिकाची ४ कोटींची फसवणूक; पैसे मागताच महिलेच्या साथीदारानं दिली बलात्कार गुन्ह्याची धमकी
  2. युरोपीय अंतराळ संस्थेवर सायबर हल्ले: शेकडो गिगाबाइट संवेदनशील डेटा चोरी
  3. जास्त नफ्याचं आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी 98 लाख केले रुपये लंपास