ETV Bharat / state

राज्यात पोलीस भरती प्रक्रियेत आणखी एक दुर्घटना, धावण्याच्या चाचणीत युवकाचा मृत्यू

लोहमार्ग पोलीस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना सांगली जिल्ह्यातील संग्राम शिंदे हा तरुण भरतीसाठी धावण्याची चाचणी देत होता. तो मैदानात कोसळला, तिथेच त्याचा मृत्यू झाला.

पोलीस भरती प्रक्रिया
पोलीस भरती प्रक्रिया (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 21, 2026 at 4:08 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

छत्रपती संभाजीनगर - पोलीस भरती प्रक्रियेत काही दुर्घटना घडत असल्याच्या घटना ताज्या असताना अधीक्षक कार्यालय येथे सुरू असलेल्या प्रक्रियेत एका युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय येथे लोहमार्ग पोलीस पदासाठी शारीरिक चाचणी सुरू असताना हा प्रकार घडला. सांगली जिल्ह्यातील संग्राम शिंदे (वय २३) हा तरुण भरतीसाठी धावण्याची चाचणी देत होता. धावत असताना अचानक तो मैदानात कोसळला. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे घाटी रुग्णालय येथे दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळं भरती प्रक्रियेदरम्यान काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.



या आधीही झाल्या तीन घटना - राज्यात पोलीस भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यासाठीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. दरम्यान शारीरिक चाचणी देत असताना चार दुर्घटना राज्यात घडल्या आहेत. त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये पाचवी दुर्घटना शनिवारी भरती सुरू असताना घडली. याआधी पुणे, मुंबई, ठाणे, बीड या ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत.


यापूर्वी घडलेल्या घटना

बीड - परळी येथील दीपक दीपक वाव्हळ या युवकानं सोळाशे मीटर धावण्याची स्पर्धा पूर्ण केल्यावर त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. उपचारासाठी रुग्णालयात दखल केलं असता तिथे त्याचा मृत्यू झाला होता.
ठाणे - येथे एस आर पी एफ पोलीस भरती प्रक्रिया सुरू असताना शारीरिक चाचणी दरम्यान धावत असताना अमळनेर इथला अक्षय बिरहाडे हा युवक अचानक कोसळला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं.
पुणे - शिवाजीनगर मैदानात भरती प्रक्रिया सुरू असताना तुषार भालके या युवकाच्या पायाला क्रँप आल्यानं तो खाली कोसळला होता. त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं.

या अलिकडील घटना पाहिल्यावर राज्यातील भरती प्रक्रियेच्या उमेदवारांच्या मृत्यूंची संख्या वाढत असल्याचं समोर येत आहे.

या कारणांमुळे होत आहेत दुर्घटना - पोलीस भरती सुरू असताना उमेदवारांनी काळजी घेण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात येतं. मात्र त्याकडे कानाडोळा करून भरती होण्यासाठी युवक प्रमाणाच्यावर जाऊन प्रयत्न करतात. अशा प्रक्रियेत खासगी डॉक्टरांकडून प्रमाणपत्र आणली जातात आणि त्यात काही अडचण असल्यास ती लपवली जाते. त्यामुळे ही सगळी प्रक्रिया शासकीय रुग्णालयांमधूनच करणे गरजेचे असल्याचं मत फुलंब्री वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुरेश ताठे यांनी व्यक्त केलं. अशा घटनांमध्ये हिमोग्लोबीन कमी असण्याची शक्यता असते. त्यामुळे ऑक्सिजन मात्रा कमी पडते. मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यास देखील अशा घटना होतात. तर प्रमाणापेक्षा अती वेगाने धावण्याचा प्रयत्न केला तर हृदयाची धडधड प्रमाणापेक्षा अधिक वाढते आणि हृदय बंद पडते. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला डॉ. सुरेश ताठे यांनी दिला.

हेही वाचा...

  1. पोलीस भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू, 1600 मीटर धावताना भोवळ येऊन कोसळला!
  2. नांदेड पोलीस दलात १९९ जागांसाठी पारदर्शक पद्धतीनं भरती प्रक्रिया, पोलीस अधीक्षकांची माहिती