बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील युवक शेतकऱ्यांनी फुलवली द्राक्षाची बाग
अंगद जगतापांनी दुष्काळाशी दोन हात करीत कृषी खात्यांतर्गत 34 बाय 34चे शेततळे तयार करून पाण्याचा प्रश्न मिटवला आणि ठिंबक सिंचनाने बागेत पाण्याची व्यवस्था करण्यात आलीय.

Published : March 2, 2026 at 10:47 AM IST
|Updated : March 2, 2026 at 11:36 AM IST
बीड - आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील युवक शेतकरी अगंद जगताप यांनी आपल्या माळरानावर 60 गुंठे क्षेत्रावर 5 वर्षांपूर्वी अनुष्का वाणाच्या द्राक्ष्यांची 1700 रोपांची 8 बाय 4 वर लागवड केलीय. आष्टी तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, पण अंगद जगताप यांनी दुष्काळाशी दोन हात करून अगोदर कृषी खात्यांतर्गत 34 बाय 34 चे शेततळे तयार करून पाण्याचा प्रश्न मिटवला आणि ठिंबक सिंचनाने या बागेत पाण्याची व्यवस्था करण्यात आलीय. यावर्षी 60 गुंठ्यांत चक्क 25 टन द्राक्षे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे, असे शेतकरी अंगद जगताप यांनी सांगितलंय.

अंगद या शेतकऱ्याकडून द्राक्ष लागवड करीत नवा प्रयोग : दुष्काळामुळे शेतकरी संकटात येत असला तरी दुष्काळाच्या झळा मात्र समाजातल्या प्रत्येक वर्गाला सोसाव्या लागतात. दुष्काळ एक दुष्टचक्र सोबत घेऊन येतो आणि त्यामुळे हे संकट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून जरी ओळखला जात असला तरी या तालुक्यात अंगद या शेतकऱ्यानं द्राक्ष लागवड करून एक नवा प्रयोग केलाय, त्याचबरोबर पाण्याची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून शेत तलाव तयार करून घेतलाय. याच शेत तलावाच्या माध्यमातून द्राक्षासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून ठेवण्यात आलंय.
पारंपरिक पिके न घेता फळबागेकडे वळले पाहिजे : तीन वर्षांपासून अंगद द्राक्षाच्या या बागेची जोपासना करीत आहेत, यावर्षी त्याला फळं लागली आहेत, त्यामुळे त्याचा आनंद मला झालाय. इतरही शेतकऱ्यांना माझे असे आवाहन आहे की, तुम्ही नुसते पारंपरिक पिके न घेता फळबागेकडे वळले पाहिजे. एक दोन एकर तरी फळबाग केली पाहिजे, त्यामुळे आपल्याला ठोस उत्पादन मिळू शकते आणि इतर शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेतात फळबाग लागवड करावी ही मी शेतकऱ्यांना विनंती करीत आहे, असंही अंगद जगताप या शेतकऱ्यानं आवाहन केलंय.
हेही वाचाः

