अस्सल पैठणीला मिळणार बारकोडचं कवच; सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचं विणकरांकडून जोरदार स्वागत
महाराष्ट्राची पारंपरिक ओळख असलेल्या पैठणी साडीच्या नावाखाली ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयानं मूळ पैठणीवर अधिकृत बारकोड आणि लोगो अनिवार्य करण्याचा मोठा निर्णय घेतलाय.

Published : September 1, 2026 at 5:39 PM IST
नाशिक : महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणी साडीच्या नावाखाली ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयानं मूळ पैठणी साडीवर अधिकृत बारकोड व लोगो अनिवार्य केला आहे. या निर्णयाचं पैठणीचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या येवला येथील पैठणी विणकारांनी स्वागत केलं आहे.
महाराष्ट्राची शान असलेल्या पैठणी साडीच्या नावाखाली उत्तर आणि दक्षिण राज्यांत तयार होणाऱ्या साड्या पैठणी म्हणून विकल्या जातात, हे अनेकदा समोर आलं आहे. अशात ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनानं मोठा निर्णय घेतला आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयानं मूळ पैठणी साडीवर अधिकृत बारकोड व लोगो अनिवार्य केला आहे. यामध्ये प्रत्येक अस्सल पैठणी साडीवर एक विशिष्ट बारकोड असेल. ग्राहकांनी हा बारकोड मोबाईलवरून स्कॅन करताच साडी अस्सल हातमागावर तयार झाली आहे की यंत्रमागावर, हे स्पष्ट होईल. साडी विणण्यासाठी वापरलेले रेशीम व जरीचा दर्जा आणि पैठणी कोणत्या कुशल विणकारानं साकारली आहे, याची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. त्यामुळे पैठणीच्या नावाखाली ग्राहकांची होणारी फसवणूक आता टाळता येणार आहे.
नाशिक शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर असलेला येवला तालुका हा पैठणी साड्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. येवला तालुक्यात 7 हजारांपेक्षा जास्त कुटुंबं हातमागावर पैठणी विणण्याचा पारंपरिक व्यवसाय करतात. पैठणीवर नक्षीदार कलाकुसर आणि मोराचं नक्षीकाम करण्याची या कारागिरांची विशेष खासियत आहे. आपली खास ओळख असणाऱ्या या पैठणी साडीला जगाच्या कानाकोपऱ्यातून मागणी होत असते. येवला तालुका पारंपरिक पैठणीसाठी प्रसिद्ध असल्यानं पुणे, मुंबई, दक्षिण भारतासह देशभरातून पर्यटक येथे पैठणी खरेदी करण्यासाठी येतात. तसंच येवल्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शिर्डी येथे येणारे भाविकही आवर्जून येवल्यात येतात. दरवर्षी येवल्यात पैठणीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, मागील काही वर्षांपासून पैठणी साड्यांच्या नावाखाली सेमी पैठणी आणि बनावट पैठणी दाखवून ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे हातमागावरील पैठणीचा व्यवसाय अडचणीत सापडला होता. अशात शासनानं मूळ पैठणीवर बारकोड अनिवार्य केल्यानं अस्सल पैठणी साकारणाऱ्या विणकरांच्या कलेला गती मिळेल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
''आमच्या कामाला किंमत मिळेल''
"शासनानं अस्सल पैठणीवर बारकोड आणि लोगो अनिवार्य करण्याचा निर्णय चांगला आहे. यामुळे आमच्यासारख्या विणकारांना याचा फायदा होणार आहे. ग्राहकांनासुद्धा अस्सल पैठणी मिळेल आणि त्यांची फसवणूक टळेल. हातमागावर एक नक्षीकाम केलेली पैठणी बनण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे शासनानं घेतलेल्या निर्णयामुळे आमच्यासारख्या विणकारांना नक्कीच न्याय मिळेल," असं मत पैठणी विणकर कारागीर वैष्णवी डालकरीया यांनी व्यक्त केलं आहे.
हातमाग उद्योगाला ऊर्जित अवस्था...
''शासन हातमाग उद्योगाला ऊर्जित अवस्था देण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अस्सल पैठणीवर बारकोड आणि लोगो अनिवार्य केलाय. अनेकदा ग्राहकांना सेमी पैठणी किंवा खोटी पैठणी दाखवून त्यांची फसवणूक केली जाते, ती आता थांबणार आहे. त्यामुळे हातमाग विणकारांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ग्राहकांना सुद्धा बारकोडच्या माध्यमातून त्या साडीत ताडा आणि बाणा हा धाग्याचा प्रकार आणि साडी विणण्यासाठी लागणारा कालावधी समजणार आहे'',अशी माहिती विणकर प्राकोष्ट प्रांतिक सदस्य मनोज दिवटे यांनी दिली.
हेही वाचा -
बीड : ना शूज, ना ट्रेनिंग... मुलींच्या शिक्षणासाठी माय अनवाणी धावली अन् मॅरेथॉन जिंकली!

