मेरी आवाज ही पहचान है! सोशल मीडियाच्या काळात रेडिओचं महत्त्व सांगणारा अवलिया, घरात केलं विविध कंपन्यांच्या रेडिओंचं संकलन
आज जागतिक रेडिओ दिन, यानिमित्तानं जुन्या रेडिओंचं संकलन करणाऱ्या नागपूरच्या एका अवलियाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. प्रा. डॉ. अजय कुळकर्णी असं त्यांचं नाव आहे.

Published : February 13, 2026 at 10:13 AM IST
|Updated : February 13, 2026 at 1:56 PM IST
नागपूर : आजची तरुण पिढी सोशल मीडियाच्या मोहात अडकली आहे. मनोरंजनासाठी विविध डिजिटल साधनं उपलब्ध झाली आहेत. अशा स्थितीत रेडिओसारखं पारंपरिक माध्यम काहीसं विस्मरणात जात असल्याचं चित्र आहे. एकेकाळी घराघरात मानाचं स्थान असलेला रेडिओ आज नावापुरताच उरल्याची खंत व्यक्त केली जाते. 'जागतिक रेडिओ दिन'च्या निमित्तानं आज आपण रेडिओच्या सुवर्णकाळाच्या आठवणी जागवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेडिओ हा केवळ मनोरंजनाचं साधन नव्हतं, तर तो घरातील एक जिव्हाळ्याचा सदस्यच होता. त्याद्वारे बातम्या, गाणी, नाटकं, शैक्षणिक कार्यक्रम आणि जगभरातील घडामोडी घरबसल्या ऐकता येत असत.
रेडिओ संकलन करणारा अवलिया : आजच्या पिढीला रेडिओची ओळख व्हावी, त्याचं महत्त्व समजावं या उद्देशाने नागपुरातील रेडिओप्रेमी प्रा. डॉ. अजय दिनकरराव कुळकर्णी यांनी जुने रेडिओ जतन करण्याचं कार्य हाती घेतलं आहं. मागील 30 वर्षांपासून ते रेडिओंचं संकलन करत असून त्यांच्या संग्रहालयात 1970 पासूनच्या विविध कंपन्यांचे 56 पेक्षा अधिक रेडिओ संग्रहित आहेत. रेडिओच्या माध्यमातून जपलेला हा सांस्कृतिक वारसा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मनोरंजनाची शेकडो साधनं उपलब्ध झाल्याने कधीकाळी प्रत्येक घराची शान असलेला रेडिओ आज अडगळीच्या जागी किंवा भंगाराच्या दुकानात दिसू लागला आहे. हे दृश्य प्रा. डॉ. अजय कुळकर्णी यांना अस्वस्थ करून गेलं. त्याच क्षणी त्यांनी जुने रेडिओ जतन करण्याचा निर्धार केला. जिथं कुठं जुने रेडिओ मिळतील ते विकत घेऊन ते घरी आणू लागले. आज त्यांच्या संग्रहात विविध कंपन्यांचे 56 हून अधिक रेडिओ जतन केलेले आहेत.

'100 रेडिओंचं प्रदर्शन भरवणार' : प्रा. डॉ. अजय कुळकर्णी यांची दिवसाची सुरुवात आजही रेडिओ ऐकण्यापासून होते आणि दिवस संपतोही रेडिओ ऐकण्यानंच. रेडिओबद्दल त्यांना प्रचंड प्रेम आणि आस्था आहे. जिथं मिळतील तिथून जुने आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे रेडिओ विकत घेण्याची तयारी त्यांच्याकडे सदैव असते.
साधारणपणे 100 रेडिओ गोळा झाल्यानंतर, ते तरुण पिढीला रेडिओची ओळख करून देण्यासाठी एक प्रदर्शन भरवणार आहेत. या कार्यात त्यांची पत्नी अपर्णा कुळकर्णी सुद्धा सक्रिय सहभागी आहेत. कुळकर्णी यांच्या संग्रहातील सर्व रेडिओमध्ये मध्यम लहरी (मीडियम वेव्ह) असलेले आहेत. 100 रेडिओ संकलित करण्याचा त्यांचा मानस आहे. डॉ. कुळकर्णी यांचा असा विश्वास आहे की, रेडिओ ही लोकचळवळ व्हायला हवी आणि आजच्या दुभंगलेल्या माणुसकीला जोडण्याचं काम रेडिओ निश्चितच करू शकतो. पुढच्या पिढीला आनंद आणि मानसिक स्थैर्य देणारं माध्यम रेडिओच असणार आहे. कारण आपलेपण आणि जिव्हाळ्याचं माध्यम म्हणजेच रेडिओ. श्राव्य माध्यम असतानाही, द्रुकश्राव्य माध्यमांपेक्षा रेडिओचा गोडवा अधिक असल्याचंही डॉ. अजय कुळकर्णी यांनी व्यक्त केलं आहे.

रेडिओचा सुवर्ण काळ : एकेकाळी भारतातील बहुतांश लोकांची सकाळ रेडिओवरील गाणी आणि बातम्या ऐकण्याशिवाय सुरू होत नसे. तो काळ रेडिओसाठी खरोखरच सुवर्णमय होता. रेडिओ घराचा एक महत्त्वाचा सदस्य मानला जात असे, आणि ज्यांच्याकडे रेडिओ असायचा त्यांची गावात आणि समाजात मोठी प्रतिष्ठा असायची. खांद्यावर रेडिओ रुबाबात मिरवणारे लोक त्या काळी श्रीमंत मानले जात. विशेष म्हणजे, त्या काळात लग्नाच्या हुंड्यात सुद्धा रेडिओची मागणी केली जात असे.
जुन्या पिढीच्या मनोरंजनाचं प्रमुख माध्यम असलेल्या रेडिओचं महत्त्व आजच्या नव्या पिढीला समजलेलं नाही. जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्ताने रेडिओविषयी काही रोचक माहितीदेखील आपण इथं जाणून घेणार आहोत.

रेडिओबाबत या गोष्टी माहीत आहेत का? : जगातील पहिला रेडिओ 1895 साली बनवला गेला. 1920 च्या दशकात रेडिओला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालं. जरी रेडिओची निर्मिती 1895 साली झाली असली, तरी खऱ्या अर्थानं 1950 च्या काळात रेडिओ लोकप्रिय झाले. 13 फेब्रुवारी 1945 रोजी संयुक्त राष्ट्र संघात रेडिओचं पहिल्यांदा प्रसारण झालं. म्हणूनच 13 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक रेडिओ दिन' म्हणून साजरा केला जातो.

भारतातील रेडिओचा प्रवास : भारतात रेडिओची सुरुवात 1920 च्या दशकात झाली. 23 जुलै 1927 रोजी मुंबईतून रेडिओ प्रसारण सेवा सुरू झाली. 'इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेड'नं मुंबई आणि कोलकता इथं रेडिओ स्टेशन सुरू केले. मात्र, 1930 मध्ये ही कंपनी बंद पडली.
त्यानंतर सरकारनं कंपनी आपल्या ताब्यात घेत 'इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस' असं नाव दिलं. नंतर 8 जून 1936 रोजी त्याचं नामकरण 'ऑल इंडिया रेडिओ' असं करण्यात आलं. 1956 साली याचं नाव पुन्हा बदलून 'आकाशवाणी' करण्यात आलं. हळूहळू आकाशवाणीचं जाळे संपूर्ण देशभर पसरले. आज 'ऑल इंडिया रेडिओ' 23 भाषांमध्ये 415 रेडिओ स्टेशनसह जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण सेवांपैकी एक बनली आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे रेडिओ असायचा, त्यांच्याकडून त्या वेळी सरकार कर वसूल करत असे, अशी माहितीदेखील डॉ. अजय कुळकर्णी यांनी दिली.
हेही वाचा

