शोभायात्रेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचं दर्शन घडवत विश्व मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात
कवी कुसुमाग्रज यांच्या नगरीत चौथं विश्व मराठी साहित्य संमेलन होत आहे. शुक्रवारी कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून भव्य शोभायात्रा निघाली. शोभायात्रेच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचं दर्शन झालं.

Published : February 27, 2026 at 7:39 PM IST
नाशिक : नाशिकमध्ये 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान होणार्या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी 'कविवर्य कुसुमाग्रज नगरी' सज्ज झाली आहे. यासाठी कुसुमाग्रज नगरीमध्ये विविध मंच उभारले आहेत. पुढील चार दिवस या नगरीमध्ये विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिमान मराठी, अभिजात मराठीचा जल्लोष होणार आहे. संमेलनाची सुरुवात शुक्रवारी सकाळी शोभायात्रेनं झाली. कवि कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेचा समारोप मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कुसुसमाग्रज नगरी इथं झाला. मुख्य सभामंडपासह ग्रंथ प्रदर्शन दालन, मराठी भाषा, महाराष्ट्राची महती सांगणारी ऐतिहासिक, सांस्कृतिक प्रतीकं इथं उभारली आहेत. यासह ग्रंथ प्रदर्शनामध्ये 150 ग्रंथ प्रकाशकांचे स्टॉल्स उभारले आहेत.

शोभायात्रेत मराठी संस्कृतीचं दर्शन : शुक्रवारी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा झाला. यानिमित्त नाशिकमध्ये चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन होत आहे. कवी कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी पालखीत ज्ञानेश्वरी ठेवली होती. शोभायात्रेत शेकडोच्या संख्येनं वारकरी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल पथकाच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचं दर्शन घडवून दिलं. शोभायात्रेत सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. विठ्ठलाची प्रतिकृती शोभायात्रेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. हरियाणाहून आलेल्या कलाकारांनी सादर केलेल्या तांडव नृत्यानं उपस्थितांची मनं जिंकली.

यासाठी होत आहे विश्व मराठी संमेलन : "संमेलनात मराठी भाषेचं संवर्धन, नव्या पिढीत भाषेबाबत अभिमान निर्माण करणं, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठीचा वापर वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. जागतिक पातळीवर विखुरलेल्या मराठी बांधवांना एकत्र आणून मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी दिशा ठरवणं हे संमेलनाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. संमेलनादरम्यान विविध विषयांवर परिसंवाद, व्याख्यानं, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, पुस्तक प्रदर्शनं आणि कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार आहे. मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, लोककला आणि लोकपरंपरेचं वैभव या माध्यमातून अधोरेखित केलं जाणार आहे. तसंच परदेशातील मराठी संस्थांशी संवाद साधत मराठीच्या डिजिटल भविष्यासंदर्भात आणि अनुवादाच्या माध्यमातून मराठी साहित्य जागतिक स्तरावर पोहोचवण्याबाबत विचारमंथन होणार आहे," असं स्वागताध्यक्ष नितीन ठाकरे यांनी सांगितलं.
संमेलनासाठी भव्य तयारी : केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात संमेलनासाठी 20 बाय 10 फुटाची 33 दालनं, संमेलनात पुस्तक प्रदर्शन मंडपात 20 बाय 10 फूट आकाराची 33 दालनं उभारली आहेत. यात महाज्योती, सारथी, आर्टी, बर्टी या संस्थांच्या स्टॉलच्या माध्यमातून रोजगार संधी, शासकीय योजना, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, अर्थसहाय्य याबाबत जनजागृती केली जाणार आहे.

यांचा होणार सन्मान : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विश्व मराठी संमेलनात जीवन गौरव, विशेष पुरस्कारांचं वितरण होणार आहे. पहिल्या दिवशी डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य भूषण, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, तर शांतिब्रह्म गुरूवर्य मारुती बाबा कुरेकर यांना विश्व मराठी संमेलनाच्या विशेष पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.
हेही वाचा :

