ETV Bharat / state

'अजिंक्यतारा'च्या कड्यावरून कामगार पडला २०० फूट खोल दरीत, १२ तासांनी मृतदेह काढला बाहेर

अजिंक्यतारा किल्ल्याच्या कड्यावरून खोल दरीत पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

अजिंक्यतारा, इन्सेटमध्ये मृतदेह वर घेऊन जाताना लोक
अजिंक्यतारा, इन्सेटमध्ये मृतदेह वर घेऊन जाताना रेस्क्यू पथकातील लोक (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 2, 2026 at 4:13 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सातारा - ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याच्या कड्यावरून 200 फूट खोल दरीत पडून कामगाराचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री तो दरीत पडला होता. आज सकाळी ही घटना निदर्शनास आल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स ॲंड रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न करून त्याचा मृतदेह दरीतून वर काढला. नामदेव रमाजी गबाले (वय 58, रा. मंचर, पुणे), असं मृताचं नाव आहे. तो किल्यावर सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामावरील मजूर होता.



सरकारने गड संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत अनेक गड-किल्ल्यांवर संवर्धनाची कामे सुरू आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावर पुणे जिल्ह्यातील दहा-पंधरा कामगार काम करत आहेत. त्यातील नामदेव गबाले हा कामगार रविवारी रात्री कड्यावरून 200 फूट खोल दरीत पडला होता. सोमवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन राबवून मृतदेह दरीतून वर काढण्यात आला.



दरीत ज्या ठिकाणी कामगार पडला होता. त्या ठिकाणी मोठमोठे दगड होते. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे तो रात्रभर दरीतच होता. वेळेवर उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. आज सकाळी दरीतून मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.



अजिंक्यतारा किल्ल्याच्या कड्यावरून पडून पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या यापूर्वीही अनेक घटना घडल्या आहेत. पर्यटकांनी गड-किल्ल्यांच्या कड्यावर उभे राहून सेल्फी काढताना किंवा फिरताना काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातं. मात्र, ते कोणीच गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे जीवाला मुकण्याची वेळ येते.

हेही वाचा...

  1. पत्नीशी वाद, पती गेला अजिंक्यतारा किल्ल्यावर, कड्यावरून उडी मारणार इतक्यात...
  2. अजिंक्यतारा किल्ल्यावरून पडलेला व्यक्ती रात्रभर होता दरीत, रेस्क्यू टीमने काढले बाहेर