ETV Bharat / state

गरजू मातांसाठी स्मिता पाटील यांच्या 'सखी सुखदा'चा आधार; प्रसूती ते बाळाच्या सहा महिन्यांपर्यंत मोफत सेवा

पुण्यातील 'सखी सुखदा वूमन वेल्फेअर फाउंडेशन' ही संस्था गरजू मातांसाठी आधारवड ठरली आहे. आतापर्यंत या संस्थेनं एक हजार महिलांची मोफत प्रसूती केली आहे.

womens day special
गरजू मातांसाठी सखी सुखदा'चा आधार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 2, 2026 at 1:49 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : समाजात महिलांच्या प्रश्नांवर अनेकजण कार्यरत असले तरी गर्भवती महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या आजही तितक्याच गंभीर आहेत. विशेषतः वस्तीत राहणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत विविध तपासण्या व उपचारांसाठी मोठा संघर्ष करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पाटील यांनी गोरगरीब गर्भवती महिलांसाठी काम सुरू केलं.

बाळ 6 महिन्यांचं होईपर्यंत संस्था उचलते सर्व खर्च : खरं तर, स्मिता पाटील यांच्या 'सखी सुखदा वूमन वेल्फेअर फाउंडेशन' या संस्थेमार्फत कोथरूड परिसरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या महिलांना गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यापासून ते बाळ 6 महिन्यांचं होईपर्यंत संपूर्ण वैद्यकीय मदत मोफत दिली जाते. प्रसूतीसह रुग्णालयाचा सर्व खर्च संस्था उचलते.

गरजू मातांसाठी सखी सुखदा'चा आधार (ETV Bharat)

आतापर्यंत एक हजार महिलांची प्रसूती : या उपक्रमांतर्गत पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. गेल्या दोन वर्षांत सुमारे दोन हजार गर्भवती महिलांनी नोंदणी केली असून त्यापैकी एक हजार महिलांची यशस्वी प्रसूती झाली आहे. संस्थेच्या या कार्यामुळे अनेक गरजू महिलांना दिलासा मिळत आहे.

संस्थेची सुरुवात कशी झाली? : याबाबत 'सखी सुखदा वूमन वेल्फेअर फाउंडेशन'च्या अध्यक्षा स्मिता पाटील यांनी सांगितलं की, २०२४ मध्ये संस्थेची स्थापना करून त्यांनी कामाला सुरुवात केली. कोथरूड परिसरातील गोरगरीब वस्त्यांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर मित्रांकडून त्यांना समजलं की, अनेक महिलांना चौथ्या-पाचव्या महिन्यापर्यंत आपण गर्भवती असल्याचंही कळत नाही. गर्भधारणा समजल्यानंतरही आवश्यक तपासण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. ही गंभीर बाब लक्षात घेऊन संस्थेनं या विषयावर काम सुरू केलं.

चंद्रकांत पाटलांनी केली मदत : या उपक्रमाबाबत कोथरूडचे आमदार तथा भाजपा नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तत्काळ सहकार्य केलं. त्यानंतर संस्थेमार्फत कोथरूड परिसरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या गोरगरीब महिलांच्या आरोग्यासाठी उपक्रम राबविण्यात आला. स्मिता पाटील पुढे म्हणाल्या की, सुरुवातीला गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंत सर्व तपासण्या आणि खर्च संस्था उचलणार असल्यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. मात्र हळूहळू विश्वास निर्माण झाला आणि महिलांनी संस्थेशी जोडले जाण्यास सुरुवात केली. गेल्या दोन वर्षांत सुमारे दोन हजार महिलांनी नोंदणी केली आहे.

womens day special
गरजू मातांसाठी सखी सुखदा'चा आधार (ETV Bharat)

नोंदणी करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते : नोंदणीपूर्वी संबंधित महिलेचा उत्पन्नाचा दाखला आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाते. कागदपत्रं पूर्ण झाल्यानंतर नोंदणी करून गर्भधारणेच्या महिन्यापासून सर्व तपासण्या, औषधं आणि चांगल्या रुग्णालयात मोफत प्रसूतीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हा उपक्रम केवळ कोथरूडपुरता मर्यादित न राहता संपूर्ण पुणे शहरात राबविण्यात यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लाभार्थी महिलांनी काय सांगितलं? :

  • यावेळी एका लाभार्थी महिलेनं सांगितलं की, ती गेल्या चार महिन्यांपासून संस्थेत येत असून येथे सर्व तपासण्या तसेच सोनोग्राफी मोफत केल्या जातात. संस्थेतील सर्वजण सहकार्यशील असून उपचार व्यवस्थित होत असल्याचं तिनं नमूद केलं.
  • धुणीभांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आणखी लाभार्थी महिलेनं सांगितलं की, तिच्या मुलगी आणि सुनेची नोंदणी संस्थेत करण्यात आली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मोठ्या रुग्णालयात उपचार करावे लागल्यास खर्च कसा भागवायचा? याची तिला सतत चिंता होती. मात्र संस्थेत नोंदणी झाल्यापासून तिची काळजी दूर झाली आहे. सर्व तपासण्या योग्य प्रकारे होत असून चांगल्या रुग्णालयात प्रसूतीची व्यवस्था करण्यात आली असल्याचं तिनं सांगितलं.

हेही वाचा