ETV Bharat / state

आलिशान जीवन सोडून आश्रमात वृद्धांची सेवा करण्याचा निवडला मार्ग; जाणून घ्या, सरोज राऊत यांचा प्रेरणादायी प्रवास

सरोज राऊत यांनी मुंबईमध्ये सुखवस्तू आयुष्य जगण्याऐवजी अमरावतीमधील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये कायमस्वरूपी वृद्धांची सेवा करण्याचा संकल्प केलाय. याबाबत 'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट...

SAROJ RAUT AMRAVATI
सरोज राऊत यांचा प्रेरणादायी प्रवास... (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 1, 2026 at 6:33 PM IST

|

Updated : March 1, 2026 at 8:27 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती : ग्रामीण किंवा निमशहरी भागातील अनेक मुली लग्नानंतर मुंबईसारख्या मेट्रो शहरात स्थायिक होतात. तिथंच संसार करण्याची स्वप्न पाहतात. 'आमची मुंबई बरी' असं म्हणणाऱ्या अनेकांपैकी एक सुखवस्तू आयुष्य जगणाऱ्या सरोज राऊत यांनी वेगळा मार्ग निवडला. मुंबईची चकाकी, वरळीतील घर, सोईसुविधा हे सर्व मागं ठेवून त्यांनी अमरावती लगत माळेगाव परिसरातील घनदाट जंगलात वसलेल्या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये कायमस्वरूपी वृद्धांची सेवा करण्याचा संकल्प केला. सरोज राऊत यांच्या या कार्यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट..

मुंबईतला संसार अन् मनातलं सेवास्वप्न : 1997 मध्ये लग्नानंतर सरोज राऊत या मुंबईत स्थायिक झाल्या आहेत. पती चित्रकार प्रा. विजय राऊत यांची नोकरी, दोन मुलींचा सांभाळ, घरची जबाबदारी हेच त्यांचं विश्व होतं. पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात एक विचार सतत डोकावत होता. आपल्याला मुलगा नाही. त्यामुळं मुलींचं लग्न झाल्यावर आपण आजवर आपल्या सासऱ्यांनी सांभाळलेल्या वृद्धाश्रमाची जबाबदारी स्वीकारायची, असे त्यांनी ठरविलं. पती प्रा. विजय राऊत यांनी 1997 मध्ये शासनाच्या योजनेअंतर्गत अमरावती लगत 'मातोश्री वृद्धाश्रम' सुरू केला होतं. त्यानंतर पुढच्याच वर्षी शासनानं या वृद्धाश्रमाला निधी बंद केला. त्यांचे सासरे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक सुखदेव राऊत यांनी पेन्शनमधून आश्रम सांभाळला. पुढं काळ सरकत गेला. सरोज राऊत यांच्या मुलींची लग्न झाली. त्यांनी आयुष्यातील मोठा निर्णय घेतला. त्यांनी मुंबई सोडून अमरावतीला वृद्धांच्या सेवेसाठी जाण्याचानिर्णय आधी पतींना बोलून दाखवला. त्यानंतर सासरे आणि कुटुंबीयांनादेखील कळवला. सुरुवातीला घरच्यांना त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. मात्र, त्यांचा निर्णय ठाम होता. त्यांच्या आत्मविश्वासाला घरातील प्रत्येक सदस्यांना पाठिंबा दर्शवला.

ईटीव्ही भारतशी बोलताना सरोज राऊत, अशोक विंचूरकर आणि शांता ददड (ETV Bharat Reporter)

जंगलातलं नवं आयुष्य : अमरावती शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर माळेगाव या जंगल परिसरात पर्वतरांगांच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात वसलेलं मातोश्री वृद्धाश्रम आज पन्नास वृद्धांना आधार देतोय. सरोज राऊत या वृद्धांना केवळ रहिवासी मानत नाहीत. तर त्या त्यांची मुलगी होतात, कधी सून तर कधी नात बनून त्यांच्यात रमतात. सकाळी चहा प्यायला कोणी आलं नाही, तर त्या स्वतः चौकशी करतात. कोणी व्यवस्थित जेवलं नाही तर त्यांच्या तब्येतीची तपासणी करतात. गरज पडल्यास रात्री-अपरात्री रुग्णालयात घेऊन जातात. आश्रमात आठवड्यातून एकदा डॉक्टरांकडून तपासणी व्यवस्था त्यांनी सुरू केली. विजेची, पाण्याची जेवणगृहाची दुरुस्ती त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन केली. "या ठिकाणी वृद्धांना जे जेवण दिलं जातं, तेच जेवण मी घेते. त्यांच्याशिवाय आता मला करमत नाही," असं सरोज राऊत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

Saroj Raut Amravati
परिसरातील संत गाडगेबाबा यांचा पुतळा (ETV Bharat Reporter)

माझी तब्येत अत्यंत गंभीर होती. मी जगणार की नाही माहित नव्हतं? पण, सरोज ताईंनी बहिणीसारखी सेवा केली. आज मी जिवंत आहे, तो फक्त त्यांच्यामुळं" - अशोक विंचुरकर

Saroj Raut Amravati
वृद्धाश्रम परिसरातील शेती (ETV Bharat Reporter)

शेती, सण अन् संस्कार : "या वृद्धाश्रम परिसरात शेती केली जाते. तूर, पालक, भाजीपाला आणि कांदा या पिकांमुळं आश्रम स्वावलंबनाकडं वाटचाल करत आहे. मी स्वतः या ठिकाणी या शेतात काही महिलांसोबत शेती करते. यावर्षी आम्हाला तुरीचं भरपूर उत्पन्न झालं. आमच्या वर्षभरासाठी लागणाऱ्या तुरीच्या व्यतिरिक्त उरलेली तूर आम्ही बाजारात नेऊन विकली. या ठिकाणी सण उत्सव या वृद्धांसोबतच मी साजरा करते. काकड आरती, अधिक मास यादरम्यान विशेष पूजादेखील आम्ही करतो. भविष्यात या ठिकाणी संत गजानन महाराजांचं मंदिर उभारण्याचा मानस आहे. यामुळं आश्रमातील वृद्धांना आध्यात्मिक आधार मिळेल," असं सरोज राऊत यांनी सांगितलं.

Saroj Raut Amravati
मातोश्री वृद्धाश्रम (ETV Bharat Reporter)

अर्ध्या रात्री फोन केला तरी त्या धावून येतात. आम्हाला कधीच परकेपणा वाटत नाही. मी सव्वीस वर्षांपासून या आश्रमात राहते. पूर्वी राऊत बाबा आमची काळजी घ्यायचे. आता सरोज ताई माया लावतात. आमचं सगळं करतात. - शांताबाई भुयारकर

वृद्धांच्या नातेवाईकांनी जपावा ओलावा : "विविध कारणांमुळं अनेक मुलं आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडतात. या ठिकाणी आम्ही वृद्धांची मनापासून सेवा करतो. असं असलं तरी या वृद्धांपैकी कोणाची प्रकृती खालवली तर आम्ही त्यांच्या नातेवाईकांना कळवतो. निदान अशा वेळेस त्यांच्या नातेवाईकांनी भेटण्यासाठी यावं. आजारपणात त्यांची मदत करावी, अशी छोटीशी अपेक्षा आहे. आपल्या माणसांबाबत थोडा तरी ओलावा नातेवाईकांमध्ये असावा," अशी अपेक्षादेखील सरोज राऊत व्यक्त करतात.

Saroj Raut Amravati
Saroj Raut Amravati (ETV Bharat Reporter)

त्या आमच्या सोबतच जेवतात. शेतात काम करतात. स्वयंपाक घरातही मदत करतात. प्रत्येकाच्या तब्येतीवर त्यांचं लक्ष असतं. - शोभा उगले

Saroj Raut Amravati
ईटीव्ही भारतशी बोलताना सरोज राऊत (ETV Bharat Reporter)

पतीलाही पत्नीचा अभिमान : "मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये स्थायिक झालेल्या अनेक महिला परत गावाकडं यायला तयार नसतात. पण सरोजनं स्वतःहून हा निर्णय घेतला. आज मला वाटतं तिचा हा निर्णय योग्यच होता. आता मीदेखील तिच्यासोबत याच वृद्धाश्रमात राहतो. अनेकदा कामानिमित्त मुंबईला वगैरे जातो. मात्र सरोज या वृद्धाश्रमातच रमली याचा, आनंद वाटतो," अशी भावना सरोज राऊत यांचे पती प्रा. विजय राऊत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

Saroj Raut Amravati
वृद्धाश्रमातील महिला (ETV Bharat Reporter)

सरोज राऊत यांच्या कार्याचं वैशिष्ट्य :

  1. वृद्धांच्या सेवेसाठी वृद्धाश्रमातच थाटलं घर.
  2. वृद्धांसाठी स्वयंपाकाच्या तयारीत घेतात सहभाग.
  3. वृद्धांसोबतच घेतात जेवण.
  4. वृद्धाश्रम परिसरात करतात शेतीची कामं.
  5. दिवसभर वृद्धांसोबत साधतात संवाद.
Saroj Raut Amravati
मातोश्री वृद्धाश्रम (ETV Bharat Reporter)

वृद्धाश्रमाचं वैशिष्ट्य :

  1. वृद्धाश्रम शांत जंगल परिसरात, निसर्गरम्य ठिकाणी वसलं आहे.
  2. वृद्धाश्रम परिसरात संत गाडगेबाबा यांची छानशी मूर्ती सेवाकार्याचा संदेश देते.
  3. संत गाडगेबाबा यांचा संदेश देणारं शिल्प लक्ष वेधणारं.
  4. वृद्धाश्रम परिसरात स्वतंत्र ध्यान केंद्र आणि सभागृह आहे.
  5. प्रा. विजय राऊत यांनी वृद्धाश्रम परिसरात काढलेली चित्र लक्ष वेधातात.
  6. निसर्गरम्य असं एकांतवासाचं हे स्थळ आहे.

हेही वाचा :

  1. दुष्काळी आष्टी तालुक्यात चिंचाळा येथे शेतात फुलवली केळीची बाग; अडीच एकरात तब्बल 70 टन केळीचे उत्पादन
  2. झोपडपट्ट्यांत शिक्षणाची नवी वाट; 'ग्लोबल टीचर' विजेत्या रूबल नागी काय काम करतात?
  3. बारामतीच्या पठारावर स्ट्रॉबेरीचा गोडवा; प्रयोगशील शेतकरी दीपक जगताप यांची यशोगाथा
Last Updated : March 1, 2026 at 8:27 PM IST