छत्रपती संभाजीनगर साड्यांच्या सेलमध्ये तुफान गर्दी, चेंगराचेंगरीमध्ये महिला जखमी
मकरसंक्रांती निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे एका दुकानदारानं साड्यांवर मोठी ऑफर जाहीर केली. यामुळं महिलांनी दुकानाबाहेर गर्दी केली. मात्र या गर्दीत महिलांची चेंगराचेंगरी झाली.

Published : January 5, 2026 at 4:21 PM IST
छत्रपती संभाजीनगर : सणासुदीला अनेक व्यावसायिक सेलचा धमाका आणतात, यावेळी या संधीचा फायदा घेण्यासाठी महिलांची गर्दी होते, त्यात महिलांसाठी विशेषतः स्वस्तात साडी खरेदीसाठी संधी असल्यावर विचारायलाच नको. आकाशवाणी परिसरात अशाच एका दुकानदारानं महाग साडी स्वस्तात देण्याची ऑफर जाहीर केली, मग काय खरेदीसाठी नुसतीच झुंबड उडाली. अफाट गर्दीमुळं चेंगराचेंगरी झाली त्यात काही महिला बेशुद्ध झाल्याची माहिती, जवाहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मारोती गोरे यांनी दिली.
आकाशवाणी भागात होता सेल : मकर संक्रांतीनिमित्त साड्यांवरील मोठ्या सवलतींमुळं रविवारी छत्रपती संभाजीनगरातील आकाशवाणी ते त्रिमूर्ती चौक परिसरात प्रचंड गर्दी उसळली. पाच हजार रुपयांची साडी अवघ्या 599 रुपयांत मिळणार या ऑफरमुळं सुमारे हजार महिलांनी दुकानावर झुंबड घातली. दुकानात महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली, दुपारी चारच्या सुमारास झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरीत तीन महिला बेशुद्ध पडल्या, तर काही लहान मुले आईपासून वेगळी झाली. दुकानासमोर चपलांचा खच पडला, तरी दुकानातील गर्दी कमी व्हायचं नाव घेत नव्हती. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं पोलिसांना बोलावण्याची वेळ आली. सायंकाळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात : दुपारी चारच्या सुमारास अनियंत्रित गर्दी झाल्यानं पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी गर्दी कमी करण्यासाठी आलेल्या लोकांना घरी जाण्यास सांगितलं, त्यातही गर्दी कमी होत नसल्यानं दुकानाचे शटर बंद केले. दुकानदाराला बाहेर बोलावून पोलीस जीपला असलेल्या स्पीकरमध्ये दुकान बंद झाल्याचं जाहीर करायला सांगितलं. दुकानदाराने आलेला माल संपल्यानं पुन्हा माल आल्यावर दुकान सुरू होईल असं सांगितल्यावर लोक परत जाऊ लागले. मात्र, अनेकांना आपल्या चपला देखील सापडल्या नाहीत. परिस्थिती हाताबाहेर जाताच पोलिसांनी हस्तक्षेप करून दुकान तातडीनं बंद केल्यानं संभाव्य मोठा अनर्थ टळला. दुकानाचे उद्घाटन असल्यानं याप्रकरणी गर्दी झाली, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. दुकानचालकाना अधिक गर्दी न होता योजना राबवा अशी सूचना केल्याची माहिती, सहायक पोलिस कर्मचारी मारोती गोरे यांनी दिली.
हेही वाचा -

