ETV Bharat / state

मुलाच्या ग्रॅच्युईटी रक्कमेवरून सासू-सुनेत वाद; सासूनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं सुनेचा केला ‘गेम’

ठाण्यात सासूनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं सुनेचा गेम केल्यानं मोठी खळबळ उडाली. सुनेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह रेल्वे पुलाखाली फेकण्यात आला होता.

Woman Kills Daughter In Law
मारेकरी सासू आणि तिचा बॉयफ्रेंड (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 4, 2026 at 4:31 PM IST

|

Updated : January 4, 2026 at 7:17 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : मुलाच्या ग्रॅच्युईटीच्या 10 लाख रुपयांच्या वादातून सासूनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं सुनेचा गेम केल्यानं मोठी खळबळ उडाली. पुरवा नष्ट करण्यासाठी सासूनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं सुनेचा मृतदेह घरापासून दोन किलोमीटर लांब असलेल्या एका रेल्वे पुलाखाली फेकल्याचं पोलीस तपासात समोर आलं. ही घटना कल्याण पूर्व कर्पेवाडीतील एका घरात घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हत्येसह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मारेकरी सासू आणि तिच्या बॉयफ्रेंडला बेड्या ठोकल्या आहेत. लताबाई नाथा गांगुर्डे (वय 60, रा. कर्पेवाडी, कोळसेवाडी, कल्याण पूर्व) आणि जगदीश महादेव म्हात्रे ( वय 67, रा. वरपगाव, कल्याण) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर रुपाली विलास गांगुर्डे ( वय 35 ) असं हत्या झालेल्या सुनेचं नाव आहे.

महिलेचा रेल्वे पुलाखाली आढळला मृतदेह : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील वालधुनी रेल्वे पुलाखाली महिलेचा मृतदेह फेकण्यात आल्याची माहिती कल्याण रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी कल्याण पश्चिममधील महात्मा फुले पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणाचा तत्काळ तपास सुरू केला. तर दुसरीकडं पोलीस तपास सुरू असताना आरोपी लताबाई गांगुर्डे महात्मा फुले पोलीस ठाण्यात आल्या. त्यांनी गुरूवारी रात्री आठ वाजतापासून आपली सून रूपाली ही रामबाग इथल्या घरातून निघून गेली आहे. ती घरी परतली नसल्याची माहिती दिली. तिने पोलिसांना सुनेचा फोटो दाखवला असता, तिचा फोटो मृत महिलेच्या चेहऱ्याशी मिळता जुळता असल्याचं समोर आलं. या सगळ्या प्रकारावरून पोलिसांचा सासू लताबाई यांच्याविषयी संशय बळावला.

मुलाच्या ग्रॅच्युईटी रक्कमेवरून सासू-सुनेत वाद; सासूनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं सुनेचा केला ‘गेम’ (ETV Bharat Reporter)

मुलाच्या मृत्यूनंतर सासू सुनेचा ग्रॅच्युईटी पैशावरुन वाद : पोलिसांनी सासू लताबाई हिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. यावेळी रेल्वेमध्ये नोकरी करत असलेल्या मृत रुपालीचा पती विलास यांचा दोन महिन्यापूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर रुपालीला 10 लाखाची अंशदानाची (ग्रॅच्युईटी) रक्कम मिळाली. मृत पतीच्या जागेवर आपल्या नातवाला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करू असं सासुचं मत होतं. मात्र त्याऐवजी सुनेनं स्व:तासाठी रेल्वेत अनुकंपावरील नोकरीसाठी अर्ज केला होता. या विषयावरून आणि अंशदानाच्या रकमेतील काही रक्कम सासूला देण्यासाठी सून नकार देत होती. या रागातून सासूनं आपल्या मित्राच्या साहाय्यानं दोन दिवसापूर्वी कल्याण पूर्वेत जिम्मीबाग, कर्पेवाडी भागात राहत्या घरात सुनेची हत्या केली.

सासूनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं केली हत्या : पोलिसांनी लताबाईंची चौकशी केली. त्या चौकशीत धक्कादायक माहिती पुढं आली. लताबाईंचा मुलगा विलास गांगुर्डे भारतीय रेल्वेत नोकरीला होता. तो सप्टेंबर 2025 मध्ये मरण पावला. मुलाच्या मृत्यूनंतर सून रूपालीला 10 लाखाचं अंशदान मिळालं. विलासच्या जागेवर त्याचा मुलगा वंश यास आपण नोकरीला लावू असं सासू लताबाईंचं मत होतं. पण रूपालीनं सासूचं ऐकलं नाही. अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी तिनं रेल्वेकडं अर्ज केला. त्यामुळे लताबाई आणि रुपाली यांच्यात वाद झाला. पतीची अंशदानाची रक्कम रूपाली सासू लताबाईला देत नव्हती. त्यामुळे लताबाई आणि तिचा बॉयफ्रेंड जगदीश म्हात्रे यांनी रूपालीचा काटा काढण्याचं ठरवलं. गुरूवारी रात्री साडेनऊ वाजता लताबाई आणि जगदीश यांनी रूपाली ही कर्पेवाडीतील घरात असताना तिच्या डोक्यात लोखंडी सळईनं प्रहार करून तिला जागीच ठार मारलं. मध्यरात्रीच्या वेळेत तिचा मृतदेह रिक्षात टाकून वालधुनी रेल्वे पुलाखाली फेकून दिला. दरम्यान पोलीस निरीक्षक विजय नाईक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी लताबाई, जगदीश यांच्या विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं दोघांनाही 4 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बलरामसिंग परदेशी, पोलीस निरीक्षक विजय नाईक, उपनिरीक्षक हिम्मत पवार, दिलीप जाधव आणि इतर पथकानं या तपास प्रकरणात महत्वाची कामगिरी केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.

हेही वाचा :

  1. माता न तू वैरणी... मुलाच्या हव्यासापोटी आईनंच उचललं टोकाचं पाऊल; पोटच्या 6 वर्षीय मुलीची हत्या
  2. बहिणींनी ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला शिकवला चांगलाच धडा, डोळ्यात मिरची पूड टाकून ठार मारलं
  3. नवरा, मुलाला सोडून 'लिव्ह इन'मध्ये राहिली, लग्न ठरताच प्रियकरानं प्रेयसीचा काढला काटा, लग्नमंडपातून आरोपी अटकेत
Last Updated : January 4, 2026 at 7:17 PM IST