ETV Bharat / state

करंट लागून इमारतीवरुन खाली पडल्यानं महिलेचा मृत्यू; कूपर रुग्णालयात नातेवाईकांकडून तोडफोड

मुंबईतील जुहूमध्ये करंट लागून पहिल्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर नातेवाईकांकडून कूपर रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली.

Cooper Hospital
कूपर रुग्णालय (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 1, 2026 at 7:31 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मुंबईतील जुहू परिसरात करंट लागून पहिल्या मजल्यावरून खाली पडल्याने 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (31 डिसेंबर 2025) रात्री घडली. या घटनेनंतर कूपर रुग्णालयात मोठा गोंधळ झाला. उपचारात दिरंगाई झाल्याचा आरोप करत नातेवाईक आणि काही नागरिकांनी रुग्णालयात तोडफोड केली. या संपूर्ण प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं? : एफआयआरमधील माहितीनुसार, सबिना शेख यांना 31 डिसेंबर रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरात काम करत असताना करंट लागला. करंटचा जोर बसल्यानंतर त्यांचा तोल गेला आणि त्या पहिल्या मजल्यावरून खाली पडल्या. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीनं कूपर रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना ‘ब्रॉड डेड’ घोषित केलं.

मृत महिलेच्या नातेवाईकांकडून कूपर रुग्णालयाची तोडफोड (ETV Bharat Reporter)



रुग्णालयात गोंधळ : महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नातेवाईक आणि परिसरातील काही नागरिक मोठ्या संख्येने कूपर रुग्णालय परिसरात जमा झाले. डॉक्टरांनी वेळेत उपचार केले नाहीत, त्यामुळंच मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. या जमावामुळं रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण झाला. तसेच रुग्णालयातील सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झाल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.


मृतदेह जबरदस्तीने नेल्याचा आरोप : "या गोंधळादरम्यान काही व्यक्तींनी मृतदेह जबरदस्तीने ताब्यात घेऊन रुग्णालयाबाहेर नेला. मृतदेह रिक्षामधून जवळच्या एका होमिओपॅथी रुग्णालयात नेण्यात आला, तेथेही डॉक्टरांनी संबंधित महिला ‘ब्रॉड डेड’ असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मृतदेह पुन्हा ताब्यात घेतला," अशी माहिती कूपर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देव शेट्टी यांनी दिली. सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर रुग्णांची सेवा करण्यासाठी नेहमीच अथक प्रयत्न करत असतात. पण रुग्णांच्या नातेवाईकांकडून जर रुग्णालयात असा गोंधळ घातला गेला, तोडफोड केली गेली तर ते योग्य नाही, असं डॉक्टर देव शेट्टी म्हणाले.



गुन्हा दाखल, तपास सुरू : या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 अंतर्गत कलम 324(3), 351(2), 221, 3(5) तसेच सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत रुग्णाचा पती आणि त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 1 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.39 वाजता तोंडी माहितीच्या आधारे गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलं.



रुग्णालय प्रशासनाची भूमिका : "रुग्णालयात दाखल होताच वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार महिलेला तपासण्यात आलं आणि मृत्यूची अधिकृत नोंद करण्यात आली, असं डॉ. देव शेट्टी यांचं म्हणणं आहे. तसेच नियमानुसार शवविच्छेदनाचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळं सुरक्षा यंत्रणेला पाचारण करावं लागलं. सुरक्षा रक्षकांनी तत्परता दाखवत रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या बाहेर काढत शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहता पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली," अशी माहिती शेट्टी यांनी दिली.



पुढील कारवाई सुरू : या प्रकरणाचा पुढील तपास जुहू पोलीस करत असून, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे घटनेची चौकशी सुरू आहे. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असं रुग्णालय प्रशासनाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. एकच कुटुंबातील 5 जणांना विजेचा झटका लागल्याने मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील वरखेडी येथील घटना
  2. 10 dead due to electrocution: कूच बिहारमध्ये बसमध्ये प्रवाशांना विजेचा झटका; 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
  3. विजेचा जोरदार झटका लागून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू