भटक्या श्वानांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर का? विधानपरिषदेत विरोधकांचा सवाल
भटक्या श्वानावर नियंत्रण ठेवण्यासाठी जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आल्यावरून आमदार अनिल परब यांनी सरकारवर निशाणा साधला.

Published : February 28, 2026 at 4:23 PM IST
मुंबई : विधानपरिषदेत शनिवारी राज्यातील शाळांच्या परिसरात वाढत चाललेल्या भटक्या श्वानांच्या समस्येबाबत चिंता व्यक्त करत या संदर्भात विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानं 7 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार शैक्षणिक संस्था, बस स्थानक, बस डेपो, बस स्थानक परिसर तसंच रेल्वे स्थानक या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या श्वानांची निर्बीजीकरण लसीकरण प्रक्रिया राबवून त्यांना डॉग शेल्टर केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार अंमलबजावणी झाली आहे का? तसंच भटक्या श्वानांच्या नियंत्रणाची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून आमदार अनिल परब यांनी सरकारवर निशाणा साधला.
शैक्षणिक परिसरात वाढत आहे भटक्या श्वानांची संख्या : अनिल परब यांनी कोर्टानं दिलेल्या निर्देशांची आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे का? याबाबत प्रश्न उपस्थित केला. तसंच शिक्षण संस्थांच्या परिसरात भटक्या श्वानांची संख्या वाढत असल्याकडं लक्ष वेधलं. "शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असताना शिक्षकांना श्वानांच्या नियंत्रणाची जबाबदारी देणं चुकीचं आहे. आधीच अनेक शिक्षणेत्तर कामाचा भार शिक्षकांवर वाढत असताना शिक्षकांना असल्या कामांना लावणं अत्यंत असंवेदनशील आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत शाळांच्या परिसरात भटक्या श्वानांचा वावर रोखण्यासाठी जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे. प्रत्येक शाळेत एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून श्वानांची संख्या, संरक्षण, निर्जंतुकीकरण, प्रवेशबंदी, कचरा व्यवस्थापन तसंच श्वान चावल्यास प्रथमोपचार आणि खबरदारी याबाबत सविस्तर माहिती ठेवण्याचे आदेश दिलेत, हे कितपत योग्य आहे?," असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.
शिक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी : "शिक्षकांचं मुख्य कर्तव्य शैक्षणिक असल्यांमुळं त्यांच्यावर श्वान नियंत्रण, स्वच्छता व सुरक्षा यांसारख्या अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकण्यात आल्यात. त्यामुळं शिक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी आहे. या आदेशांबाबत शासनामार्फत चौकशी केली आहे का? तसंच शिक्षणाशी संबंध नसलेल्या जबाबदाऱ्या शिक्षकांकडून काढून घेऊन भटक्या श्वान नियंत्रणासाठी महानगरपालिका स्तरावर स्वतंत्र यंत्रणा सुरू करण्याबाबत काय कारवाई केली आहे? असा प्रश्न अनिल परब यांनी विचारला.
दरम्यान, याबाबत सरकारकडून माहिती देण्यात आली की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्वानांचं निर्गमन आणि त्यांना श्वान निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्याची प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षकांना श्वानांच्या नियंत्रणाची जबाबदारी देण्यात येणार आहे ही बाब तथ्यहीन आहे. या संपूर्ण प्रकरणामुळं शाळा परिसरातील सुरक्षितता, विद्यार्थ्यांचं संरक्षण आणि शिक्षकांवरील अतिरिक्त प्रशासकीय याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू : ठाण्यात एका नागरिकाचा भटक्या श्वाननं चावा घेतला होता. यानंतर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. त्यानंतर नागरिकानं सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्याची घटना ठाण्यात काही दिवसांपूर्वी घडली होती. त्या पाठोपाठ 7 वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्रानं हल्ला करून त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील मोहाने - गाळेगाव भागात असलेल्या आदिवासी पाड्यात घडली आहे.
हेही वाचा :

