साहिल मदन आणि यश कुठंय?, अजित पवारांच्या विमान अपघातावर अमोल मिटकरींचे थेट प्रश्न
साहिल मदन आणि यश यांचा ठावठिकाणा समोर आला तर तपासातील अनेक धागेदोरे जुळतील, असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

Published : February 23, 2026 at 7:56 PM IST
|Updated : February 23, 2026 at 9:04 PM IST
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेत भावनिक शब्दांत दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली. तसंच अजित पवार यांच्या निधनाबाबत दोन्ही सभागृहांत शोक प्रस्ताव मांडावा लागेल, अशी वेळ येईल याची कल्पनाही केली नव्हती, असं त्यांनी सांगितलं. अमोल मिटकरी यांनी अजितदादांच्या आठवणी जागवताना, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात त्यांनी अजित दादांना भेटून 23 फेब्रुवारी रोजी दुपारी देवगिरी इथं भेटीची वेळ घेतली होती, असं सांगितलं. मात्र त्याच दिवशी अजितदादांवर शोक प्रस्ताव मांडावा लागेल, ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी अत्यंत वेदनादायी बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं.
जनतेत मोठा संशय : अपघातानंतर राज्यात संतापाचे वातावरण असून लोणी भापकर गाव बंद होते, तर बारामतीतही बंद पाळण्यात आला, असं सांगत अमोल मिटकरी यांनी जनतेत मोठा संशय असल्याचं म्हटलं. तसंच व्हीएसआर विमान कंपनीचे साहिल मदन आणि यश हे दोन पायलट/कर्मचारी नेमकं कुठं आहेत? त्यांची माहिती का दिली जात नाही? तसंच देवगिरीपासून दादा निघाले ते विमानात बसले, त्या संबंधित सीसीटीव्ही फुटेज का समोर आणले जात नाही?, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. तसंच साहिल मदन आणि यश यांचा ठावठिकाणा समोर आला तर तपासातील अनेक धागेदोरे जुळतील, असं त्यांनी सांगितलं.
कंपनी ब्लॅकलिस्ट का केली नाही? : याचबरोबर, पायलटांच्या 50-50 कोटी रुपयांच्या विम्याचा मुद्दाही अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला. संबंधित विमान कंपनीवर अद्याप कारवाई का झाली नाही? एफआयआर का दाखल नाही? कंपनी ब्लॅकलिस्ट का केली नाही? याचं उत्तर सरकारनं द्यावं, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली. तसंच घातपात होता की दुर्घटना, हे स्पष्ट व्हावं, यासाठी तपास जलद गतीने व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय, अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत ते जिवंत असताना अनेक आरोप, मानसिक वेदना आणि राजकीय संघर्षांना सामोरे गेले, पण कधीही खचले नाहीत, असं सांगितलं.
परिणामांची चिंता करणार नाही : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील राजकीय लढ्यांत अजित पवार यांनी मोठी मेहनत घेतली होती, असं अमोल मिटकरी यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भावनिक प्रतिक्रियेचा उल्लेख करत कोव्हिड काळात अजित दादांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं, त्यामुळं त्यांच्या भावना समजून घ्यायला हव्यात, असंही अमोल मिटकरी म्हणाले. याचबरोबर, अपघाताचे गूढ काळाच्या पडद्याआड जाऊ नये आणि सत्य जनतेसमोर यावे, यासाठी आपण कार्यकर्ता म्हणून जे आवाज उठवत असतील, त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेवटपर्यंत लढत राहू, परिणामांची चिंता करणार नाही, असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं.
हेही वाचा :

