मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? निलेश राणे यांचा सवाल
विधिमंडळात आज आ. निलेश राणे यांनी मुंबई गोवा महामार्ग संदर्भात प्रश्न विचारला. तसंच काजू उत्पादकांसाठी हमीभावाची मागणीही त्यांनी केली.

Published : February 25, 2026 at 4:54 PM IST
मुंबई - राज्यपालांच्या अभिभाषणात रस्ते विकासासाठी 4478 कोटींची तरतूद केल्याचा उल्लेख आहे. या निधीतून मुंबई गोवा महामार्ग कामासाठी किती रक्कम दिली जाणार, असा थेट सवाल शिवसेना (शिंदे) आमदार निलेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. “या तरतुदीतून काही निधी महामार्गाला मिळाला, तर तो 100 टक्के पूर्ण होऊ शकतो. अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला आहे. कोणीही स्पष्ट उत्तर देत नाही. आता तरी सरकारने भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
राज्यपालांच्या अभिभाषणाला पाठिंबा दर्शवताना राणे यांनी काही मुद्द्यांवर सरकारवरच टीका केली. राज्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीची घोषणा होत असताना सर्वाधिक हरितक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जंगलक्षेत्र घटल्यानं वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत. शेतकरी शेती सोडत आहेत; तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. “वनखात्याचा टांगा पलटी झाल्यासारखी परिस्थिती आहे. कुणाचे कुणावर नियंत्रण राहिलेले नाही,” अशा शब्दांत त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
काजू उत्पादक अडचणीत - राज्यातील काजू उत्पादकांना किमान आधारभूत किंमतीचं संरक्षण नसल्याचा मुद्दाही राणे यांनी उपस्थित केला. “अनेक सुशिक्षित युवक मुंबईतील नोकऱ्या सोडून गावाकडे काजू लागवड करत आहेत; मात्र त्यांना बाजारभावाचा आधार नाही,” असं ते म्हणाले. गोवा सरकार प्रति किलो 170 रुपयांची हमी किंमत देते आणि दर खाली आल्यास भरपाई देते, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
2010 पर्यंत काजूवरील आयात शुल्क 18 टक्के होतं; ते आता 2.5 टक्क्यांवर आणलं आहे. त्यामुळे आफ्रिकन देशांतून मोठ्या प्रमाणावर काजू आयात होत असून स्थानिक उत्पादक अडचणीत सापडले आहेत. आयात शुल्क किमान 20 टक्क्यांवर नेण्याची मागणी राणे यांनी सभागृहात केली.
हेही वाचा..

