ETV Bharat / state

पतीने भाजपाविरोधात रणशिंग फुंकताच घरात कलह; पक्षनिष्ठा महत्त्वाची सांगत माजी महापौरांनी सोडलं पतीचं घर

भाजपाने नागपूरचं महापौर पद दिलं आणि नवराच पक्षाच्या विरोधात गेल्याचं पाहून पत्नीनं स्वतःचं घर सोडून थेट माहेर गाठलं. नागपूरच्या अर्चना डेहनकरांच्या घरात हा प्रकार घडलाय.

Former Mayor Archana Dehnkar
माजी महापौर अर्चना डेहनकर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 1, 2026 at 11:20 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर- नागपूर महानगरपालिका निवडणुकीत बंडखोर उमेदवारांनी केवळ राजकीय पक्षांच्या नेत्यांची झोपच उडवली नाही, तर अनेकांच्या नात्यांत आणि कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. या प्रकारचं एक उदाहरण नागपुरात समोर आलंय. भाजपाने उमेदवारी नाकारल्याने प्रचंड नाराज असलेल्या माजी महापौरांच्या पतीराजांनी थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, त्यामुळे त्यांच्या पत्नी नाराज झाल्या. भाजपाने आपल्याला नागपूरचं महापौर पद दिलं आणि नवराच पक्षाच्या विरोधात गेल्याचं पाहून पत्नीनं स्वतःचं घर सोडून थेट माहेर गाठलं. हा प्रकार नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या घरात घडलाय. त्यामुळे या डेहनकर कुटुंबाची नागपूर शहरात जोरदार चर्चा रंगलीय.

माजी महापौर अर्चना डेहनकर (Source- ETV Bharat)

डेहनकर पतीचं घर सोडत माहेरी : भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात नाराज उमेदवार आहेत. त्यामुळे साहजिकच भाजपाचे बंडखोर हे सर्वाधिक मैदानात उतरल्याचे दिसत आहेत. मात्र, पतीनं बंडखोरी केल्याचा परिणाम थेट नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या घरी बघायला मिळालाय. अर्चना डेहनकर या पतीचे घर सोडत माहेरी भावाच्या घरी निघून गेल्या.

माहेरी राहून करणार भाजपाचा प्रचार : प्रभाग 17 मध्ये काँग्रेसमधून भाजपात आलेल्या मनोज साबळे यांना भाजपाने उमेदवारी दिलीय, त्यामुळे अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पक्षनिष्ठा आणि पतीचा निर्णय या दुहेरी कात्रीत सापडल्याने माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी नागपुरात असलेल्या माहेरच्या घरी जाऊन भाजपाचा प्रचार करण्याचा निर्धार केलाय.

पक्षनिष्ठा महत्त्वाची - अर्चना डेहनकर : भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या विनायक डेहनकर यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केलीय. 2009 ते 2012 काळात अर्चना डेहनकर यांना भारतीय जनता पार्टीने महापौरपद दिलं होतं, त्यामुळे पक्षाच्या विरोधात जाणे अर्चना डेहनकर यांना अमान्य असल्यानंच त्यांनी नागपुरातील त्यांच्या भावाचं घर गाठलंय.

दबावतंत्र काम करणार का? : अर्चना डेहनकर यांनी नवऱ्यावर दबाव निर्माण करण्यासाठी आणि पक्षानिष्ठा जपण्यासाठीच पतीचं घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला. मात्र त्याचे हे प्रयत्न कामी येतात की नाहीत हे 2 जानेवारीला म्हणजे उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.

हेही वाचाः

नवीन वर्षात चिखलदरातील देवी पॉईंटच्या विकासाला गती; अंबादेवी संस्थानला जमीन देण्यास मंत्रिमंडळाचा निर्णय

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शिर्डीत भाविकांची विक्रमी गर्दी; लाखो भाविक साईचरणी नतमस्तक