ETV Bharat / state

"तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर तुमची अवस्था काय झाली असती?", अमित शाहांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल

कुबड्या व शिडी वापरायची आणि गरज संपली की, ते फेकून द्यायचं ही भाजपाची नीती असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut
संजय राऊत (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 28, 2025 at 1:24 PM IST

4 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : महाराष्ट्रात आम्ही कोणाच्याही कुबड्यावर अवलंबून नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सोमवारी (27 ऑक्टोबर) केलं होतं. दरम्यान, या वक्तव्याचा शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपासोबत सध्या शिंदे आणि अजित पवार या दोन कुबड्या नाहीत, तर काय नाकात, कानात त्यांनी बुगड्या घातल्या आहेत का? असा सवाल करत भाजपाचं गरज सरो आणि वैद्य मरो, असं आहे. कुबड्या व शिडी वापरायची आणि गरज संपली की, ते फेकून द्यायचं ही भाजपाची नीती असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मंगळवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर...: "आता भाजपानं नव्यानं स्वबळाचा नारा दिला असेल. यापूर्वी 2014 रोजी सुद्धा स्वबळाचा नारा दिला होता. पण परत आम्ही एकत्र आलो. लोकसभेला विधानसभेला गरजेनुसार भाजपाला कुबड्या लागत असतात आणि गरज संपल्यावर ते स्वबळाचा नारा देतात. आता अजित पवारांची गरज आहे. कारण त्यांना शरद पवारांचं घर फोडायचं होतं. मिध्यांची गरज आहे, कारण त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून दाखवायची होती. ते कार्य संपल्यामुळं त्यांना कुबड्यांची गरज नाही, असं अमित शाह म्हणतायेत. अमित शाह व्यापारी असल्यामुळं असं बोलत आहेत. सुरुवातीला थोडं-थोडं करुन राज्य करुन मिळवायचं आणि मग स्वबळाचा नारा द्यायचा हा त्यांचा व्यापारी, गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात राबवू पाहतायेत. पण भाजपा कायम कुबड्यांवरच राज्य करत आला आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपाला पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते. पहिल्या निवडणुकीत जेव्हा शिवसेनेसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाली. तेव्हा भाजपाला या महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हतं. पण बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसैनिकांना आदेश दिले की, भाजपासोबत गेलं पाहिजे. तेव्हा जर आम्ही तुम्हाला कुबड्या दिल्या नसत्या तर तुमची अवस्था काय झाली असती?," असं म्हणत संजय राऊत यांनी अमित शाहांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

अमित शाह हे व्यापारी म्हणून राजकारणात आलेत : "भाजपा जेव्हा महाराष्ट्रात आला, तेव्हा पोस्टर लावायला त्यांच्याकडे माणसं नव्हती. बाबरीनंतर देशभरात उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेश इथं आम्ही देशात 62 ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवणार होतो. बाळासाहेब ठाकरेंची लाट होती. पण बाळासाहेबांना अटलजी, आडवाणींनी निवडणूक न लढविण्याची विनंती केली. मैं आपसे प्रार्थना करता हूँ... की आप अपने उमेदवार पीछे लो... असं आडवाणी म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेबांनी एका क्षणात आम्हाला सगळ्यांना सांगितलं की, माघार घ्या आणि आम्ही माघार घेतली. अमित शाह हे फार उशिरा राजकारणात आलेत. ते व्यापारी म्हणून आलेत. त्यांना समाजासाठी, देश हिताचं काही पडलं नाही. त्यांनी भाजपामध्ये एक व्यापारी वृत्तीची पिढी निर्माण केली आहे. मुलाला क्रिकेटमध्ये घुसवलं आणि आता ते परिवार वादावर बोलतायेत. परिवार वाद म्हणजे हा अमित शाह यांच्यापासून सुरु होतो. कर्तृत्वशून्य, क्षमता नसलेल्या व्यक्तीला तुम्ही पदाचा आणि सत्तेचा गैरवापर करून क्रिकेटमध्ये त्या पदावर बसवलं. यालाही परिवारवाद म्हणतात," असं म्हणत संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

अमित शाह म्हणजे लोकशाहीचे मालक नाहीत : आगामी निवडणुकात विरोधकांचा असा सफाया करा की, त्यांना दुर्बिण लावून शोधण्याची वेळ येईल, असं अमित शाह यांनी म्हटलं होतं. याबाबत संजय राऊतांना विचारलं असता, ते म्हणाले, "या देशात लोकशाही आहे. अमित शाह म्हणजे लोकशाहीचे मालक नाहीत किंवा सर्वेसर्वा नाहीत. विरोधकांना संपविण्याची त्यांना ती दुर्बिण शोधावी लागेल. एकवेळ अशी येईल की भाजपा हा दुर्बिणीतून काय लोकांनाही दिसणार नाही," असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पुढं ते म्हणाले, "अशी भाषा करणारे मोठ-मोठे आले. पण या देशात गाडले गेले. भले-भले आले आणि या मातीत मिसळले. विरोधी पक्षाला संपविण्याचा भाषा करणाऱ्यांना मी मूर्ख समजतो. हे लोकशाहीला संपवायला निघालेत. म्हणून हे अशी भाषा करत आहेत. आम्ही या महाराष्ट्रात विरोधक म्हणून आवाज बुलंद केला आहे. अमित शाह हे व्यापार करत आहेत. महाराष्ट्रात आम्ही कुबड्यांशिवाय आहोत, असं शाहांनी म्हटल्यानंतर थोडा तरी स्वाभिमान असल्यास अजित पवार आणि शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडावं. तसंच आम्ही सत्ताधाऱ्यांच्या व्होट चोरीला बूच लावतोय, म्हणून त्यांना पराभवाची भीती वाटते," असं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना अजगर असं संबोधलं आहे. याला प्रत्युत्तर देताना बावनकुळेंनी आरशात बघावे म्हणजे समजेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊतांच्या टीकेला भाजपाचा पलटवार : "संजय राऊत यांचा संबंध कुबड्यांशी नाहीतर बुगड्यांशी जास्त आहे. त्यामुळं त्यांना कुबड्यांचा अर्थ कळणार नाही. कारण कुबड्या म्हणजे मित्र पक्षाची साथ न घेणं असा होत नाही. तर आपली विचारधार सोडून दुसऱ्याची विचारधारा अवलंबणे, याचा अर्थ कुबड्या घेणं असा होतो. या विचारधारेबाबत अमित शाह बोलले आहेत. तुम्ही तुमची विचारधार काँग्रेसच्या दावणीला बांधली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हिंदुत्वाचा नारा सोडायचा आणि काँग्रेसच्या दावणीला जाऊन बांधायचा याला कुबड्या म्हणतात. आपली वैचारिक लढाई सोडून दुसऱ्या विचारांच्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसणे. त्यांच्या कुबड्या घेण्याचं पाप आम्ही करत नाही. ते पाप तुम्ही केलात. हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं. कुबड्याची भाषा संजय राऊतांनी करू नये. कारण त्यांना बुगड्यांवर जास्त प्रेम आहे. बुगड्या आणि संजय राऊत यांचं एक समीकरण आहे," असं म्हणत भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे.

राजकीय विश्लेषकांची प्रतिक्रिया : "खरंतर भाजपानं 2024 च्या निवडणुकीत 2029 मध्ये आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू असं म्हटलं होतं. ज्या पद्धतीनं 2024 मध्ये त्यांना जागा मिळाल्यात ते पाहता, त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून 2029 ला ते नक्कीच स्वबळावर निवडणूक लढवतील असं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात सध्या शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याशिवाय सुद्धा अपक्षांच्या साथीनं ते सत्ता स्थापन करू शकतात. एवढं त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळं अमित शाह यांनी आम्ही कुणाच्या कुबड्याशिवाय महाराष्ट्रात आहोत, असं म्हटलं आहे. यात काहीही चुकीचं नाही. ते खरं आहे आणि याबाबत संजय राऊतांनी वाईट वाटून घेण्याची गरज नाही. कारण ती वस्तुस्थिती आहे, तेच अमित शाह बोलले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात सुरुवातीला भाजपाची ताकद नसताना शिवसेनेनं त्यांना साथ दिली. पाठिंबा दिला हे जरी खरं असलं तरी भाजपा देश पातळीवर मित्र पक्षांचा वापर करून घेतोय आणि फेकून देतोय, हे देखील तितकच खरं आहे," अशी प्रतिक्रिया "ईटीव्ही भारत"शी बोलताना राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. 'वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे निधन, मालवणी भाषेचं सौंदर्य वाढवणारा माणूस गेला
  2. लोकशाहीत मतदार सरकार निवडतात, पण आता सरकार मतदारांना निवडतंय, वरळीतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
  3. शिवसेनेसह भाजपाचे ठाण्यात 'जय छठी मैया'; उत्तर भारतीयांच्या 'व्होटबँके'करिता महायुतीत चढाओढ