ETV Bharat / state

पाणी अडवा, पाणी जिरवा'चा यशस्वी पॅटर्न; नदी खोलीकरणामुळे दुष्काळग्रस्त बीडच्या कुमशी गावात वाढली भूजलपातळी

बीडच्या कुमशी गावात दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या अन्नपूर्णा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे भूजलसाठ्यात वाढ झालीय. समाधानकारक पाऊस नसतानाही गावातील विहिरी, बोअरवेलमध्ये पाणी उपलब्ध आहे.

Water Conservation Success Story
पाणी अडवा, पाणी जिरवा'चा यशस्वी पॅटर्न (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 1, 2026 at 5:40 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

बीड : दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडमध्ये कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. मात्र, या संकटावर मात करण्यासाठी कुमशी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत परिसरातून वाहणाऱ्या अन्नपूर्णा नदीचं खोलीकरण व रुंदीकरण केलं आहे. त्याचबरोबर नदीवर बंधारा उभारून वाहून जाणारा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत असून गावातील विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे.

पाणी अडवा, पाणी जिरवा'चा यशस्वी पॅटर्न (ETV Bharat)

अन्नपूर्णा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे भूजलसाठ्यात वाढ : सुमारे दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या अन्नपूर्णा नदीच्या खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामामुळे भूजलसाठ्यात वाढ झाली आहे. यावर्षी परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसतानाही गावातील विहिरी आणि बोअरवेलमध्ये पुरेसं पाणी उपलब्ध आहे. परिणामी, गावकऱ्यांना पिण्याचं पाणी, जनावरांसाठी पाणी तसेच शेतीसाठी आवश्यक पाण्याची टंचाई भासत नाही.

टंचाईच्या काळातही पाणी उपलब्ध झाल्यानं परिसरात ऊस, मोसंबी यांसारख्या पाण्याची गरज असलेल्या पिकांची लागवडही वाढली आहे. काही वर्षांपूर्वी फेब्रुवारी-मार्च महिन्यातच पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती. मात्र, यंदा अजूनही विहिरी आणि बोअरवेलमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलं. यापुढेही ज्या ठिकाणी पाणी अडवता येईल, त्या ठिकाणी जलसंधारणाची कामं करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. "पाणी अडवा, पाणी जिरवा" ही संकल्पना प्रभावीपणे राबविल्यास भविष्यात पाण्यासाठी कोणापुढे हात पसरवण्याची गरज भासणार नाही, असा संदेशही ग्रामस्थांनी या कामातून इतर गावांना दिला आहे.

"एकमेकांची जिरवण्यापेक्षा 'पाणी अडवा, पाणी जिरवा" : याबाबत बोलताना कुमशी येथील ग्रामथ सदाशिव भगवान प्रभाळे म्हणाले, "पूर्वी आमच्या गावात तीव्र पाणीटंचाई होती. जनावरांना पिण्याचं पाणी मिळत नव्हतं. आमचा दुग्धव्यवसाय असल्याने जनावरांची संख्या मोठी आहे. पाण्यासाठी पंचायत समितीकडे टँकरची मागणी करावी लागायची. मात्र टँकरही सहज उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

यानंतर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातून वाहून जाणारं पाणी अडवून जमिनीत मुरवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नदीचं खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आलं. शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर आपल्या शिवारातील पाणी आपल्या शिवारातच जिरवलं, तर भूजलपातळी वाढेल आणि पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय होईल, हा आमचा उद्देश होता.

या कामामुळे केवळ पाणीपातळीच वाढली नाही, तर नदीच्या दोन्ही बाजूंना रस्तेही मिळाले आहेत. त्यामुळे वाहतुकीचाही प्रश्न मार्गी लागला. इतर गावांनीही या उपक्रमाचा आदर्श घ्यावा. एकमेकांची जिरवण्यापेक्षा 'पाणी अडवा, पाणी जिरवा' ही संकल्पना राबवली, तर पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो". तसेच, "सध्या गावातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असली, तरी सुमारे 25 टक्के अडचण अजूनही आहे. येत्या काळात गावातील छोटे नाले व ओढेही अडवण्याचं काम करण्यात येणार आहे. शिवारातील पाणी शिवारातच मुरवण्यावर भर दिल्यास भविष्यात पाण्यासाठी कोणापुढेही हात पसरवण्याची वेळ येणार नाही", असंही प्रभाळे यांनी सांगितलं.

'विहिरी आणि बोअरवेल यंदा आटल्या नाहीत' : यासोबतच गावातीलच मोहन निकम यांनी म्हटलं की, "नदीचं खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे पूर्वी गुढीपाडव्याच्या सुमारास आटणाऱ्या विहिरी आणि बोअरवेल यंदा आटल्या नाहीत. त्यामुळे गावात पाण्याची उपलब्धता वाढली आहे. या पाण्याच्या जोरावर आम्ही ऊस, मोसंबी यांसारखी पिके घेत आहोत. आम्ही केलेल्या कामाचे समाधान आज प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहे."

'कामाचा खर्च सर्व गावकऱ्यांनी मिळून उचलला' : राजेश निकम म्हणाले, "नदीचं खोलीकरण व रुंदीकरण करण्याचा निर्णय सर्व ग्रामस्थांनी एकत्रितपणे घेतला. या कामासाठी लागणारा खर्चही सर्वांनी मिळून उचलला. गावासाठी आणि शेतीसाठी लागणारं पाणी याच नदीतून मिळतं. या कामामुळे नदीपात्र अधिक खोल व रुंद झालेच, शिवाय भूजलपातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सर्वांनी एकत्र येऊन आर्थिक योगदान दिल्यामुळेच हे काम यशस्वी झाले आणि त्याचा फायदा आज संपूर्ण गावाला होत आहे."

'पाण्यासाठी आता कोणापुढेही हात पसरण्याची गरज नाही' : दरम्यान, बीड जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना येथील शेतकरी करतात. पिण्याच्या पाण्यासाठीही ग्रामीण भागातील नागरिकांना अनेकदा वणवण भटकावं लागतं. मात्र, ग्रामस्थांनी लोकसहभागातून नदीचं खोलीकरण व रुंदीकरण करून 'पाणी अडवा, पाणी जिरवा' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. त्यामुळे गावातील पाण्याची परिस्थिती मोठ्या प्रमाणात सुधारली असून आता पाण्यासाठी कोणापुढेही हात पसरण्याची गरज उरली नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

हेही वाचा

  1. शीळ धरण 'ओव्हरफ्लो'; शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला
  2. अमरावतीत मान्सूनची दमदार एन्ट्री; शासकीय कार्यालयासह जिल्हा सामान्य रुग्णालय जलमय
  3. भर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चिखलदरा तहानलेलाच; पाणी टंचाईमुळे पर्यटनस्थळांना फटका