कोठडीतील मारहाण प्रकरण भोवलं, नऊ पोलिसांना वाशिम कोर्टाने सुनावणी जन्मठेपेची शिक्षा
वाशिम जिल्हा सत्र न्यायालयानं एका प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे.

Published : July 2, 2026 at 8:15 PM IST
वाशिम - जिल्हा सत्र न्यायालयानं एका प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. 2011 साली कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणात 9 पोलिसांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. वाशिम जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला असून, या निकालामुळे पोलीस दलाला मोठा धक्का बसला आहे..
काय आहे नेमकं प्रकरण? - 9 मे 2011 रोजी रिसोड पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह 8 पोलीस कर्मचाऱ्यांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकली होती. या धाडीमध्ये बेग्या पवार या तरुणाला एका चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. गुन्हा कबुल करण्यासाठी पोलिसांनी त्याला मारहाण केली होती. केलेल्या मारहाणीत 10 मे 2011 रोजी बेग्या पवारचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सीआयडीने तपास करून पोलिसांवर गुन्हा दाखल केला होता. आता तब्बल 15 वर्षांनी या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.
बेग्या पवारच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नव्हता. फक्त तो पारधी असल्याच्या कारणानं पोलिसांनी त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणात न्यायालयानं रिसोड पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार महादेव धांडे यांच्यासह पोलीस कर्मचारी मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य, वसंत कणिराम जाधव या 9 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा -
- पोलीस हे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांचे नोकर नाहीत तर जनतेचे सेवक आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेवा; हायकोर्टाची चपराक
- मुंबई प्रेस क्लबमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी अध्यक्षांची याचिका न्यायालयाने फेटाळली
- निवृत्त न्यायमूर्ती गौतम पटेलांवरील हल्ल्याचा तपास गुप्त ठेवा, 26/11 प्रमाणे तो जगजाहीर झाला तर हल्लेखोर सावध होतील - हायकोर्ट

