नाशिकमध्ये मोठा अनर्थ टळला! संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी गेल्यानंतर काही मिनिटांत जीर्ण वाडा कोसळला
नाशिकमध्ये मेनरोडवरील धुमाळ पॉईंट येथे एक जीर्ण वाडा अचानक कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Published : July 1, 2026 at 5:29 PM IST
नाशिक - मेन रोडवरील धुमाळ पॉईंट येथे बुधवारी एक जीर्ण वाडा अचानक कोसळला. विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वीच संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि दिंडी याच मार्गाने पुढे गेली होती. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळं परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मेन रोड परिसरातील हा वाडा गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत होता. याबाबत महानगरपालिकेनं वाडा मालकाला वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय.
इमारतींच्या सुरक्षेबाबत प्रश्न - प्राथमिक माहितीनुसार, आज झालेल्या हलक्या पावसामुळं वाडा कोसळला असावा. घटनेनंतर नागरिकांनी तातडीनं अधिकाऱ्यांना संपर्क साधला. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वाड्याचे अवशेष हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या घटनेनंतर शहरातील जीर्ण वाडे, इमारतींच्या सुरक्षेबाबत प्रश्न पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अन्यथा जीवितहानी झाली असती - मेन रोड भागात जुना वाडा कोसळल्याची घटना घडली. दहा ते पंधरा मिनिटांपूर्वीच या मार्गाने संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मार्गस्थ झाली. जर त्यावेळेस हा वाडा पडला असता तर जीवित हानी झाली असती. आमची प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी हा वाडा तात्काळ उतरून घ्यावा. येथील स्थानिक नागरिक घाबरले आहे. वाडा मालकाला याआधी प्रशासनानं नोटीस बजावली होती. अशी माहिती स्थानिक नगरसेविका आदिती पांडे यांनी दिली.
वाडे मालक आणि भाडेकरूंमध्ये वाद - नाशिकच्या जुने नाशिक, पंचवटी, नाशिक पश्चिम भागात सर्वाधिक धोकादायक वाडे आहेत. अनेक ठिकाणी 50 वर्षापासून भाडेकरू वास्तव्यास असून मालकी हक्कावरून घर मालक आणि भाडेकरूमध्ये न्यायालयीन वाद सुरू आहे. भाडेकरूंची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने पर्यायी निवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी जीव धोक्यात घालून नागरिक मोडकळीस आलेल्या वाड्यात राहत आहेत. यात सर्वाधिक धोकादायक वाडे हे नाशिक पश्चिम विभागात आहेत.
महानगरपालिकेकडून सक्ती केली जात नाही - नाशिक महानगरपालिकेकडून धोकादायक वाडेधारकांना गेल्या दहा वर्षापासून एकाच पद्धतीची नोटीस पाठवली जात आहे. तात्काळ वाडा खाली करा,अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेकडून दिला जातो. मात्र प्रत्यक्षात पाणी-वीज कनेक्शन तोडले जाते ना सक्तीची कारवाई केली जाते. केवळ नोटिसीच्या माध्यमातून इशारे आणि कारवाईचा इशारा देत औपचारिकता पूर्ण केली जाते.
'या' विभागातील धोकादायक वाडे आणि घरांना नोटीस
- नाशिक पश्चिम - 610
- पूर्व विभाग - 127
- पंचवटी विभाग - 176
- सातपूर विभाग - 61
- नाशिकरोड विभाग - 77
- नवीन नाशिक - 50
आम्ही नोटिसा दिल्या : पावसाळ्यात मोडकळीस आलेले जुने वाडे, घरे कोसळून अपघात होण्याची शक्यता असते, अशात आम्ही नाशिक शहरातील 1 हजार 982 वाडे आणि घर मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांनी ही घरे तत्काळ खाली करावीत अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. तरी सुद्धा त्यांनी घरे खाली केली नाही तर आम्ही तेथील वीज आणि नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई करू असं नाशिक महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे अधिकारी सचिन जाधव यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -
- Supreme Court On Bhide Wada Smarak : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकावर सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब; अखेर विजय समतेचाच
- Bhide Wada : भिडे वाड्यात सावित्रीबाई फुलेंचं स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा, भाडेकरूंची १३ वर्षांपासून प्रलंबित याचिका फेटाळली
- Mujumdar Wada मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सवाला आजपासून सुरवात, पाहा काय आहे इतिहास

