मतमोजणी सर्व निवडणुका झाल्यावरच करावी, श्रीकांत शिंदेंची मागणी
राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेत काही निवडणुका पुढं ढकलल्या आहेत.


Published : December 1, 2025 at 6:36 PM IST
|Updated : December 1, 2025 at 8:16 PM IST
शिर्डी : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांबाबत निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेत काही निवडणुका पुढं ढकलल्या आहेत. यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, "एक दिवस राहिला असताना निवडणूक आयोगानं काही निवडणुका पूर्णपणे रद्द केल्या आहेत, तर हजारो उमेदवारांना स्थगिती दिली. आता त्या निवडणुका 20 तारखेला होतील. निवडणूक आयोगानं अगोदर मतदार याद्यांमध्ये घोळ केला. यानंतर याद्या दुरुस्त करत करत उमेदवारांना शेवटच्याक्षणी याद्या दिल्या. निवडणूक आयोगाचं असं काम कधीच पाहिलं नव्हतं. महाराष्ट्रात असा घोळ पहिल्यांदा पाहिला आहे," असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगावर केलीय.
निवडणूक आयोगानं गांभीर्यानं विचार करायला पाहिजे होता : "निवडणूक आयोगानं निवडणूका जाहीर केल्या आणि एक दिवस अगोदर लोकांना सांगतायेत की निवडणुका नाही. लोकांची थाटा करण्याचं काम निवडणूक आयोगानं केलं आहे. या सगळ्या गोष्टींचा निवडणूक आयोगानं गांभीर्यानं विचार करायला पाहिजे होता. तसंच पुढं जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका येतायेत. त्यामुळं अशा चुका निवडणूक आयोगाकडून व्हायला नको आहेत," अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
लगेच 3 तारखेला मतमोजणी करू नका : "अनेक ठिकाणी सर्वच उमेदवार प्रतिज्ञापत्र लिहून द्यायला तयार होते. निवडणुका 2 तारखेला ठरल्या आहेत. त्यानुसार घ्या तरी देखील निवडणूक आयोग घेत नाही आहे," असं श्रीकांत शिंदे म्हणाले. याचबरोबर, निवडणूक आयोगाला श्रीकांत शिंदे यांनी 2 तारखेला मतदान झाल्यानंतर लगेच 3 तारखेला मतमोजणी करू नका, अशी मागणी केली आहे. कारण या मतमोजणीचा प्रभाव राहिलेल्या मतदारसंघात पडू शकतो. त्यामुळं उद्या झालेल्या मतदानाची मतमोजणी 20 तारखेला होणाऱ्या निवडणूकीनंतर करावी, असंही श्रीकांत शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.
राऊतांना खूप खूप शुभेच्छा...: दरम्यान, शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. तसंच शिंदेंचे (शिवसेना) 35 आमदार फुटणार, असा त्यांनी दावा केला. यावर बोलताना श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की, "राऊतांना खूप खूप शुभेच्छा. त्यांची कमी सर्वांना भासत होती. ते आजारी असतांना देखील माध्यमांसमोर आले आहेत. लवकरात लवकर बरं व्हावं, अशा शुभेच्छा! तसंच, टीकेचं उत्तर टिकेनं देण्यापेक्षा आपण कामातून उत्तर दिलं पाहिजे," असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
संगमनेरात जंगी स्वागत : नगरपालिका निवडणुकीची प्रचाराची तोफ आज थंडवणार असल्यानं संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमदार अमोल खताळ यांची भावजय सुवर्णा खताळ व इतर उमेदवारांच्या प्रचारार्थ श्रीकांत शिंदे आले होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांचं संगमनेरात जंगी स्वागत करण्यात आलं. तसंच शहरातील काही भागात भव्य बाईक रैली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.
हेही वाचा :
- 'शिवसेनेचे 35 आमदार फुटणार', संजय राऊतांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी लगावला टोला, पाहा काय म्हणाले ?
- 'साई मंदिरात मिळणारं अन्न हे प्रसाद नव्हे जेवण'; सुजय विखेंचं वादग्रस्त वक्तव्य, भाविकांच्या तिखट प्रतिक्रिया
- "प्रयागराजप्रमाणं नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार, हवं तर यादी महाजनांना देतो"-संजय राऊत

