बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना शंका, म्हणाले "निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर"
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बिहार निकालावर शंका उपस्थित करत शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

Published : November 14, 2025 at 4:16 PM IST
|Updated : November 14, 2025 at 5:12 PM IST
नागपूर : शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. आत्तापर्यंतच्या आकड्यानुसार बिहारमध्ये भाजपानं मोठी मुसंडी मारली आहे. यावर सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. नागपुरात माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित केली.
देश संविधानावर चालणार का नाही? - विजय वडेट्टीवार : "सर्व गोलमाल आहे. 90 आणि 95 टक्के जनता यांच्या पाठीशी आहे का? पराभव झाल्यानंतर हे म्हणतील की आम्हाला कारणं लागतात. मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ होता. निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक आणि स्वच्छ नव्हती. एवढीच लोकप्रियता होती तर दहा-दहा हजार रुपये महिलांच्या खात्यात का पाठवले. सरकारी तिजोरीची लूट करूनच निवडणुकांचा निकाल असा फिरवला जात असेल तर, 90 टक्के निकाल येणारच. देशात जे काही सुरू आहे ते पारदर्शी नाही. ही लोकशाहीला धोका पोहोचवणारी बाब आहे. देश संविधानावर चालणार की नाही? यावर प्रश्न उपस्थित करायला लावणारा हा निकाल आहे," असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी बिहार विधानसभा निकालावर आपली प्रतिक्रिया दिली.
येणाऱ्या काळात लोकशाही टिकणार नाही : राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्या सभेमध्ये एक-एक लाख लोक येत होते. जनसागर लोटत होता, तर मग असे निकाल कसे लागू शकतात? पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या सभांसाठी गर्दी जमवण्यासाठी लोकांना आणावं लागत होतं. त्यांच्या सभांमध्ये रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या. तरी असे निकाल येणार असतील तर भविष्यात देशाची लोकशाही आहे की नाही अशी चिंता निर्माण होत आहे. तरीही आम्ही निकाल स्वीकारतो, असं विजय वडेट्टीवर म्हणाले.
बिहार निकालानंतर महाविकास आघाडीत धुसफूस : बिहार निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. आघाडीमध्ये जास्त जागा मागून काँग्रेस त्या गमावते, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. यावर वडेट्टीवार यांनी प्रतिउत्तर दिलं. "अंबादास दानवेंना माहीत नाही का? बिहारमध्ये मुख्यमंत्री पदासाठी तेजस्वी यादव यांना उमेदवार म्हणून जाहीर केलं होतं. दानवे यांनी आधी माहिती घ्यावी. अन्यथा काहीही बोलायचं, असं करू नये. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाबद्दल बोलायचं असेल, तर सर्वच जबाबदार आहेत. घोळ कोणी घातला असेल, तर सर्वांनीच घातला. जागा वाटपात समस्या निर्माण झाली होती. आता पुढं जाण्याची गरज आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
जागा वाटप योग्यवेळी करावं : "महाविकास आघाडी म्हणून एकत्र होण्याची गरज आहे. बिहारमध्ये आम्ही कुठं जास्त जागा घेतल्या. आरजेडीनं 150 जागा लढवल्यात. आम्ही 56 जागा लढवल्यात. अंबादास दानवे यांच्या सल्ल्याची गरज वाटली तर आम्ही नक्की घेऊ. आता तरी महाराष्ट्रात महाविकास आघाडीनं योग्यवेळी जागा वाटप करावं. त्यांनी स्वतःवरही खापर फोडलं आहे. वेळेवर जागा वाटप करणं तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे. आचारसंहितेची वाट न पाहता जागा वाटप निश्चित केलं पाहिजे. तेव्हा (विधानसभा निवडणुकीच्या वेळेला) अनेक लोक बैठकांमधून उठून गेले होते. आम्हाला त्यांचं नाव जाहीर करायचं नाही. आता स्वतंत्र लढत आहे. अनेक ठिकाणी निकाल येतील. अंबादास दानवे यांनी जुनं काढण्यापेक्षा नव्यानं सुरुवात करावी. जर जुनं काढायचं असेल तर तिन्ही पक्षाचे नेते त्यासाठी जबाबदार आहेत," असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी दानवेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.
निवडणुकीत पैशांचा वापर : "निवडणुकांमध्ये पैशांचा प्रचंड वापर केला जात आहे. पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा आणि पुन्हा पैशातून सत्ता, असं समीकरण निर्माण केलं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ते वाट्टेल ते करतात आणि निवडणुका जिंकतात, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा :
- बिहारच्या जनतेचं प्रगतीला मत, दिल्लीसह महाराष्ट्राचे 'पप्पू' कोमात; मुरलीधर मोहोळ, रवींद्र चव्हाण, आशिष शेलारांची प्रतिक्रिया
- बिहार विधानसभा निवडणूक निकाल : काँग्रेसच्या चुकांमुळेच बिहारमधे पराभव, अंबादास दानवे यांचा दावा
- ... अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्याची आमची तयारी, आरपीआयच्या कार्यकारिणी बैठकीत रामदास आठवलेंचा भाजपाला इशारा

