सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा विजय वडेट्टीवारांचा दावा; वादंग झाल्यानंतर व्यक्त केला खेद
विजय वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळेंबाबीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केलाय.

Published : August 27, 2026 at 1:14 PM IST
|Updated : August 27, 2026 at 3:45 PM IST
नागपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यातील बहुतांश मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा केलाय. राज्यात अर्ध्या अधिक मराठ्यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं आहे, हे मनोज जरांगे पाटलांना माहीत नसेल. पण सुप्रिया सुळे यांच्याकडे सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. ते आज नागपुरात बोलत होते.
27 टक्क्यात घुसखोरी : ''सगळ्या मराठा समाजातील लोकांनी ओबीसींच्या प्रमाणपत्र घेऊन ठेवलं आहे'', असं देखील वडेट्टीवार म्हणाले. ''मला वाटतं आता ओबीसींनी जनरल व्हावं आणि ओबीसी होऊन जावं, त्यांना जायचं, त्यांना देऊन टाका. 27 टक्क्यात घुसखोरी वाढलीय. आरक्षण वाढत नाही, मात्र घुसखोरी झाली आहे त्यामुळे उद्या ओबीसींचं वाटोळं होईल'', असंही ते म्हणाले.
शरद पवारांवर भाष्य : वडेट्टीवार पुढे म्हणाले, ''सगळ्या नेत्यांकडे ,मराठा नेत्यांकडे प्रमाणपत्र आहे. केवळ सुप्रिया सुळे नाही, तर अनेकांकडे प्रमाणपत्र आहे. शरद पवार साहेबांकडे आहे की नाही, हे मला माहीत नाही. प्रमाणपत्र केव्हा घेतलं मला माहीत नाही. पण प्रमाणपत्र आहे.''
ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 27, 2026
मात्र, याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या…
सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर : विजय वडेट्टीवारांच्या दाव्यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता, त्या म्हणाल्या, ''हे सर्व ऐकून मला धक्का बसला. माझ्याकडे माझं जन्म प्रमाणपत्र आहे. माझ्याकडे डिग्रीचं प्रमाणपत्र आहे. त्यानंतर माझ्याकडे माझ्या लग्नाचं प्रमाणपत्र आहे आणि बारामतीची खासदार म्हणून माझ्याकडे प्रमाणपत्र आहे. माझ्याकडे कोणतंच ओबीसीचं प्रमाणपत्र नाही, हे मी नक्की सांगते. त्यामुळे काँग्रेसने माझं ओबीसी प्रमाणपत्र दाखवावं. रोज उठून काँग्रेस अशा प्रकारचे आरोप का करतंय, याबाबत मला आश्चर्य वाटतं.''
वडेट्टीवारांचा वक्तव्याबद्दल खेद व्यक्त : सुप्रिया सुळेंच्या प्रत्युत्तरानंतर वडेट्टीवारांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला. ते म्हणाले, ''ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात माझी भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनावधानाने उल्लेख झाला. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा माझा हेतू नव्हता. अनावधानाने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करतो. मात्र, याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत माझी भूमिका बदललेली नाही. एकीकडे ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसायचा, या भूमिकेचं मी कधीही समर्थन करणार नाही. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी आहे.''
हेही वाचाः

