ETV Bharat / state

शिर्डी साईबाबांना तब्बल 30 लाखांहून अधिक किमतीच्या वाहनांची देणगी

टीव्हीएस मोटर कंपनीचे कोपरगाव येथील अधिकृत वितरक साईसेवा मोटर्स यांच्या वतीने एकूण 9 लाख 50 हजार रुपये किमतीची चार वाहने संस्थानला देणगी म्हणून देण्यात आली.

Shirdi Vehicle donation
शिर्डी साईबाबांना वाहनांची देणगी (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 25, 2026 at 4:58 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

अहिल्यानगर : शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टला आंध्र प्रदेश आणि कोपरगाव येथील भाविकांकडून सुमारे 30 लाख रुपयांहून अधिक किमतीची वाहने आणि अत्याधुनिक रुग्णवाहिका देणगी स्वरूपात प्राप्त झालीय. या देणगीमुळे संस्थानच्या प्रशासकीय कामकाजाला तसेच आरोग्य सेवांना मोठा हातभार लागणार आहे. टीव्हीएस मोटर कंपनीचे कोपरगाव येथील अधिकृत वितरक साईसेवा मोटर्स यांच्या वतीने एकूण 9 लाख 50 हजार रुपये किमतीची चार वाहने संस्थानला देणगी म्हणून देण्यात आली.

टीव्हीएस 3 व्हीलर कार्गो वाहनांचा देणगीत समावेश : या देणगीत टीव्हीएस अपाचे आरटीएक्स 310, टीव्हीएस एनटॉर्क 150, टीव्हीएस ऑर्बिटर (ईव्ही) आणि टीव्हीएस 3 व्हीलर कार्गो या वाहनांचा समावेश आहे. या वाहनांचे विधिवत पूजन टीव्हीएस मोटर कंपनीच्या प्रीमियम विभागाचे प्रमुख विमल सुमली तसेच संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, अतुल वाघ, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे आदी उपस्थित होते. तसेच कंपनीच्या वतीने गोपाला सर, मोहक द्वार साई टीव्हीएस कोपरगावचे संचालक वीरेंद्र भांडारकर, 3 व्हीलर विभागाचे सौरभ लादगेकर आणि विवेक दवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

टेम्पो ट्रॅव्हलर टीआय रुग्णवाहिका देणगी स्वरूपात दिली : दरम्यान, संस्थानच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या रुग्णालयासाठी आंध्र प्रदेश येथील साईभक्त रवी कुमार आणि सुप्रिया यांनी फोर्स मोटर्स कंपनीची अत्याधुनिक टेम्पो ट्रॅव्हलर टीआय रुग्णवाहिका देणगी स्वरूपात दिली आहे. या रुग्णवाहिकेची किंमत 20 लाख 13 हजार 499 रुपये असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे पूजन करून ती तत्काळ सेवेत दाखल करण्यात आली. यावेळी प्रशासकीय अधिकारी अतुल वाघ यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

वैद्यकीय सेवांसाठी ही रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरणार : साई संस्थानच्या रुग्णालयात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असल्याने आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी ही रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच नव्याने प्राप्त झालेली वाहने संस्थानच्या विविध विभागांच्या कामकाजासाठी सहाय्यभूत ठरणार असून, प्रशासनाची कार्यक्षमता अधिक वाढण्यास मदत होणार आहे.

हेही वाचाः